ओमिक्रॉनच्या वाढत्या रुग्णसंख्येच्या पार्श्वभूमीवर काळजी वाढवणारी आकडेवारी समोर आली आहे. महाराष्ट्रात ओमिक्रॉनच्या विक्रमी रुग्णांची नोंद करण्यात आली आहे. ओमिक्रॉन रुग्णसंख्येनं नवा उच्चांक गाठला असून नव्या 31 रुग्णांची (New Cases) दिवसभरात नोंद करण्यात आली आहे. आतापर्यंत महाराष्ट्रात एकूण 141 रुग्णांची नोंद करण्यात आली असून त्यापैकी 61 रुग्ण हे उपचारानंतर बरे झाले आहेत.
ओमिक्रॉनचे सर्वाधिक रुग्ण हे मुंबईत आढळून आले आहे. राज्यातील 31 पैकी 27 रुग्णांचं निदान एकट्या मुंबईत झालं आहे. दरम्यान, गेल्या 24 तासात मुंबईतील कोरोना रुग्णवाढही चिंताजनक मानली जाते आहे. बीएमसीनं दिलेल्या आकडेवारीनुसार, मुंबईत रविवारी संध्याकाळी 6 वाजेपर्यंत तब्बल 922 नव्या रुग्णांची भर पडली असून एकूण 326 रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. सध्या मुंबईत कोरोनाचे एकूण 4295 सक्रिय रुग्ण आहेत.
मुंबई पाठोपाठ पुणे, ठाणे आणि आता अकोल्यातही ओमिक्रॉनच्या रुग्णांची नोंद करण्यात आली आहे. दरम्यान ठाण्यात दोन आणि पुणे ग्रामीणमध्ये एका ओमिक्रॉन रुग्णाची नोंद करण्यात आली आहे.
अकोल्यातही कोरोनाच्या ओमिक्रॉननं धडक दिली आहे. दुबईवरुन आलेल्या एका महिलेला कोरोनाची लागण झाली होती. ही महिला ओमिक्रॉन पॉझिटिव्ह असल्याचं आता स्पष्ट झालं आहे. 18 डिसेंबरला दाखल झालेल्या या कोरोना बाधित महिलेचा ओमीक्रॉन चाचणी अहवाल आता पॉझिटिव्ह आल्यानं सगळेच धास्तावले आहे. सध्या ही महिला होम आयसोलेशनमध्ये आहे. दरम्यान आज अकोल्यात एका 60 वर्षीय व्यक्तीचा मृत्यू झाला आहे. तर सध्या अकोल्यात 6 सक्रिय रुग्णांवर उपचार सुरु आहे.