विलिनीकरणाच्या मुख्य मागणीसह आपल्या अन्य मागण्यांसाठी गेल्या महिन्याभरापासून एसटी कर्मचाऱ्यांचा संप चालू आहे. यादरम्यान अनेकांनावर निलंबनाची कारवाई देखील करण्यात आली आहे. मात्र जे कर्मचारी कामावर परततील त्यांच्यावरील सर्व कारवाया मागे घेण्यात येतील, असे अश्वासन परिवहन मंत्री अनिल परब यांनी दिले होते. परब यांच्या आवाहनाला प्रतिसाद देत गेल्या दोन दिवसांमध्ये दोन हजारांपेक्षा अधिक कर्मचारी कामावर परतले आहेत. कर्मचाऱ्यांना कामावर परतण्यासाठी 23 डिसेंबरची मुदत देण्यात आली होती. आता ही मुदत संपल्याने जे एसटी कर्मचारी अद्यापही कामावर परतले नाहीत, त्यांच्यावर आजपासून पुन्हा एकदा करवाईचा बडगा उगारण्यात येणार असून त्यांना बडतर्फ करण्यात येणार आहे.
दरम्यान ताज्या आकडेवारीनुसार राज्यातील 250 आगारांपैकी 148 आगार काही प्रमाणात सुरू आहेत, तर 102 आगार अद्याप पूर्णपणे बंद असल्याने प्रवाशांचे हाल सुरू आहेत. संपाची नोटीस देणाऱ्या महाराष्ट्र राज्य कनिष्ठ वेतनश्रेणी एसटी कर्मचारी संघटनेने सोमवारी संप मागे घेण्याची घोषणा एसटी महामंडळासोबत झालेल्या बैठकीनंतर केली होती.
यावेळी निलंबन, बडतर्फी, सेवा समाप्ती कर्मचाऱ्यांवर करण्यात आलेल्या या प्रकरच्या कारवाया मागे घेण्यावर देखील चर्चा झाली. निलंबन मागे घेतले जाईल, मात्र दोन दिवसांमध्ये कामावर रुजू व्हा असे आवाहन एसटी महामंडळाच्या वतीने कर्मचाऱ्यांना करण्यात आले होते. मात्र अंतिम मुदत संपल्यानंतर देखील अनेक कर्मचारी कामावर गैरहजर आहेत. त्यामुळे आता त्यांच्यावर बडतर्फीची कारवाई करण्यात येणार आहे.
राज्य परिवहन महामंडळाचे राज्य सरकारमध्ये विलिनीकरण करण्यात येऊन, एसटी कर्मचाऱ्यांना क वर्गाचा दर्जा देण्यात यावा, ही त्यांची मुख्य मागणी आहे. त्यासोबतच वेतन आणि महागाई भत्त्यात वाढ करावी, घरभाडे भत्ता वाढवावा अशा विविध मागण्या त्यांनी केल्या होत्या. यातील अनेक मागण्या मान्य करण्यात आल्या आहेत. मात्र तरी देखील एसटी कर्मचारी हे विलिनीकरणाच्या मुद्द्यावर अडून बसल्याचे दिसून येत आहे. जोपर्यंत विलिनीकरण नाही, तोपर्यंत संप मागे घेणार नसल्याची भूमिका त्यांनी घेतली आहे.