गेल्या अनेक वर्षांपासून लहान मुलांचे मनोरंजन आणि प्रबोधन करणार्या किशोर मासिकाच्या सुवर्ण महोत्सवानिमित्त बालभारतीने किशोर गोष्टी हा अनोखा कार्यक्रम हाती घेतला आहे.’ या उपक्रमात मान्यवर बालसाहित्यिक ‘किशोर’मध्ये प्रकाशित झालेली त्यांची गोष्ट मुलांना सांगणार असून, २७ मार्चपासून दर शनिवारी ११ वाजता मुलांना गोष्ट ऐकता आणि पाहता येईल.
‘किशोर’सुवर्णमहोत्सवी वर्षाचा भाग म्हणून ‘किशोर गोष्टी’ हा उपक्रम सुरू करण्यात येत आहे. ई-बालभारतीच्या अत्याधुनिक स्टुडिओमध्ये या गोष्टींचे ध्वनिचित्रमुद्रण करण्यात येत आहे. मुलांचे भावविश्व समृद्ध करण्यासाठी विज्ञान, साहस, अद्भुतरम्यता, निसर्ग, प्रेरणादायी व्यक्तिमत्त्वे अशा विविध विषयांवरील गोष्टी या उपक्रमात सांगितल्या जातील. ‘किशोर’चे कार्यकारी संपादक किरण केंद्र उपक्रमाविषयी म्हणाले, की उत्तम साहित्य मुलांपर्यंत पोहोचवण्यासाठी किशोर गोष्टी हा अभिनव उपक्रम सुरू करण्यात येत आहे. या माध्यमातून राज्यभरातील मुलांना गोष्टी ऐकता येतील. बालभारतीच्या ई-बालभारती-एमबीसीटी या यूट्यूबवरील वाहिनीवर गोष्टी ऐकता-पाहता येतील.
गेल्या ५० वर्षांत ‘किशोर’ मासिकाने अनेक पिढ्यांवर वाचनाचे, ज्ञान-विज्ञानाचे आणि मूल्यांचे संस्कार केले आहेत. सुवर्णमहोत्सवी वर्षाच्या औचित्याने ‘किशोर गोष्टी’ हा अभिनव उपक्रम बालभारतीकडून राबवण्यात येणार आहे. या उपक्रमातील गोष्टी मुलांच्या सर्जनशील भावविश्वाला समृद्ध करणाऱ्या आहेत. पूर्वीच्या काळातील गोष्ट सांगण्याचा आजी-आजोबांचा वारसा या माध्यमातून पुढे नेण्याचा प्रयत्न आहे.