15 डिसेंबरला उत्तर प्रदेशातील चित्रकूट येथे ‘हिंदू एकता महाकुंभ’ आयोजित करण्यात आला आहे. यामध्ये देशभरातील साधू-संत सहभागी होणार आहेत. याशिवाय राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे (RSS) वरिष्ठ अधिकारीही या कार्यक्रमात उपस्थित राहणार असून राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत (Mohan Bhagwat) प्रमुख पाहुणे आहेत. दरम्यान, हिंदू एकता महाकुंभचे अध्यक्ष जगद्गुरू स्वामी रामभद्राचार्य यांनी मोठे वक्तव्य केले आहे. जगद्गुरू स्वामी रामभद्राचार्य म्हणाले की, देशात होत असलेल्या धर्मांतरामुळे हिंदूंची लोकसंख्या झपाट्याने कमी होत आहे. त्यामुळे हिंदूंचे अस्तित्व धोक्यात आल्याचे ते म्हणाले. “इथे दोन मुले जन्माला येतात, तर दुसरीकडे 20-25 मुले जन्माला येतात,” असं वादग्रस्त विधान त्यांनी केलं.
“100 कोटी हिंदूंनी एकत्रितपणे आवाज उठवावा”
रामभद्राचार्य असंही म्हणाले की, “संघप्रमुख मोहन भागवत यांच्यासमोर समान नागरी संहितेचा मुद्दा उपस्थित केला जाणार आहे. समान नागरी संहिता विधेयक 2024 पूर्वी संसदेत आणले पाहिजे. 100 कोटी हिंदूंनी एकत्रितपणे आवाज उठवला तर संसदही मंजूरी देईल.” उत्तर प्रदेशात पुढील वर्षी होणाऱ्या विधानसभा निवडणुकीपूर्वी आरएसएसचा अजेंडा पुढे नेण्याचाही भाजपचा हा प्रयत्न आहे. समान नागरी संहिता लागू करण्याची मागणी भाजपकडून अनेक दिवसांपासून केली जात आहे. हिंदू एकता महाकुंभमध्ये संत, राजकारण्यांसह बॉलिवूड सेलिब्रिटीही सहभागी होणार आहेत.
या कार्यक्रमाच्या निमित्ताने आणि देशातील अनेक मान्यावर लोकांच्या उपस्थितीत, भाजपला उत्तर प्रदेश निवडणुकीपूर्वी ही मागणी पुन्हा मांडण्याची चांगली संधी मिळाली आहे. नुकतेच अलहाबाद न्यायालयाने आदेश दिला आहे की समान नागरी संहिता ऐच्छिक करता येणार नाही, देशाच्या हितासाठी ती अनिवार्य करणे अवश्यक आहे.
15 डिसेंबर रोजी पद्मविभूषण जगद्गुरू स्वामी रामभद्राचार्य यांच्या अध्यक्षतेखाली हिंदू एकता महाकुंभ कार्यक्रम होणार आहे. या कार्यक्रमासाठी देशभरातून पाच लाख हिंदू श्री राम तपोभूमीला भेट देणार आहेत. तुलसीपीठाचे उत्तराधिकारी आचार्य रामचंद्र दास (जय महाराज) यांनी सांगितले की, हिंदू महाकुंभात मठ, मंदिरे, आखाडे, संत, महात्मे यांचे धर्मगुरूही सहभागी होत आहेत. कार्यक्रमासंदर्भात शहरापासून गावोगावी लोकांना निमंत्रणे पाठवण्यात आली आहेत. यामध्ये लव्ह जिहाद, लोकसंख्या नियंत्रण कायदा यासह हिंदुत्वाच्या रक्षणाशी संबंधित 12 मुद्द्यांवर चर्चा होणार आहे.