मुंबईत आज दाट धुक्यांची चादर पसरलीय. पश्चिम उपनगरात आज हवेत गारवा तर आहेच, त्याच बरोबर धुक्याची चादर ही पसरलीय. गेले तीन दिवस अवकाळी पावसानंतर मुंबईचा पारा बऱ्यापैकी खाली आला असून धुरकट वातावरण निर्माण झालंय. सकाळी दृष्यमानताही कमी झाली असून इंडीकेटर देत गाड्या मार्ग काढू लागलेयत.
मुंबई मध्ये हे प्रचंड धुके पसरल्याने आज पहाटे पासून मुंबईचे वातावरण आल्हाददायक वाटत आहे. मात्र, याचा परिणाम वाहतुकीवर होत आहे. या वातावरणात मुंबईकर मात्र पहाटे या धुक्याचा आणि थंडीचा आस्वाद घेण्यास बाहेर पडले आहेत. व्यायाम आणि जॉगिंग करण्यासाठी आणि या वातावरणात फिरण्यासाठी मुंबईकर मोठया प्रमाणत बाहेर पडले आहेत.
पुणे आणि डोंबवलीत पसरली दाट धुक्याची चादर
अवकाळी पावसानं उघडीप दिल्यानंतर पुणे आणि डोंबविलीत धुक्याची चादर पाहायला मिळाली. धुक्यामुळे वाहतुकीचा वेग मंदावल्याचं दिसून आलं आहे. पुण्यात आज दिवसभर ढगाळ हवामानासह काही भागात हलक्या पावसाचा इशारा वेधशाळेनं दिला आहे.
आजपासून पावसाळी वातावरण दूर होणार
आता अरबी समुद्रातील निर्माण झालेली कमी दाबाची स्थिती निवळत आहे. त्याचप्रमाणे कुठेही नव्याने कमी दाबाचा पट्टा निर्माण झालेला नाही. त्यामुळे राज्यात सर्वत्र पावसाळी वातावरण दूर होऊन कोरडे हवामान निर्माण होण्याचा अंदाज आहे.
सध्या ढगाळ हवामानामुळे दिवसाच्या कमाल तापमानात सरासरीच्या तुलनेत मोठी घट झाल्याने दिवसाचा गारवा कायम आहे. रात्रीचे किमान तापमान मात्र सरासरीपेक्षा अधिक आहे. 5 डिसेंबरपासून हवामान कोरडे झाल्यानंतर दिवसाचे कमाल तापमान सामान्य स्थितीत येऊन रात्रीच्या किमान तापमानात घट होईल. अशी माहिती हवामान विभागाने दिली आहे.