माणसाच्या शरीराला डुकराची किडणी जोडण्यात यश आलंय. अमेरीकेतल्या शास्त्रज्ञांनी हे यश मिळवलंय. माणसाचं जीवन पूर्णपणे बदलणारा शोध म्हणून ह्या घटनेकडं पाहिलं जातंय. कारण ह्या एका सर्जरीमुळे आगामी काळात प्राण्यांचे अवयव माणसाच्या शरीरात जोडण्याचा मार्ग मोकळा होऊ शकतो. दुसऱ्याची किडणी मिळणं एवढं सोप्पही नाही. त्यामुळेच डुकरासारख्या प्राण्याची किडणी ट्रान्सप्लांट करण्यात यश मिळालेलं आहे. सध्या तरी ती किडणी सामान्यपणे कामही करतेय. आणखी काही काळ ती कसं काम करते हे पहाणं औत्सुक्याचं आहे. ती खरोखरच आतासारखीच नॉर्मल राहीली तर हा एक मोठा शास्त्रीय चमत्कार ठरू शकतो. सध्या तरी ह्या सर्जरीचा सविस्तर रिपोर्ट अजून प्रकाशित झालेला नाही पण प्राथमिक माहिती हाती आलेली आहे.
जागतिक वृत्तसंस्था रॉयटर्सनं ही बातमी दिलीय. अमेरीकेतल्या न्यूयॉर्क सिटीत एनवायई लँगन हेल्थ सेंटर आहे. (NYU)याच सेंटरच्या शास्त्रज्ञांच्या एका टीमनं ह्या अशक्यप्राय वाटणाऱ्या सर्जरीला यशस्वी केलंय. त्यासाठी अतियश काटेकोरपणे नियोजन करण्यात आलं. त्या त्या टप्यावर हवी असलेली काळजी घेतली गेलीय. ह्या सर्व तयारीसाठी मोठा काळही घेतला गेला. कुठेही घाई करण्यात आली नाही. कारण एक छोटीसी चूकही महागडी ठरू शकली असती.
माणसाला डुकराची किडणी जोडणं एवढं सोप्पं नव्हतं. डुकराची किडणी आणि माणसाचं शरीर हे खूप भिन्न आहे. त्यासाठी डुकराच्या जीनमध्येच बदल करण्यात आला. तोही अशा पद्धतीनं केला गेला की, माणसाचं शरीर लगेचच ते नाकारणार नाही. त्यामुळेच जीन मध्ये बदल केल्यामुळे डुकराच्या किडणीनेही माणसाचं शरीर स्वीकारलं. आता हा प्रश्नही पडू शकतो की तो माणूस कोण होता, ज्याला पहिल्यांदा डुकराची किडणी बसवली गेली? तर हा एक ब्रेन डेड पेशंट होता. सर्जरी करण्यापूर्वी त्याच्या कुटूंबाची रितसर परवानगी घेतली गेली. त्यानंतर त्या ब्रेन डेड पेशंटवर ही सर्जरी केली गेली. विशेष म्हणजे तीन दिवसांपासून ही किडणी व्यवस्थित काम करतेय. पेशंटच्या शरीरात रक्ताभिसरणही व्यवस्थित होतं आहे. आणि आश्चर्य म्हणजे डुकराची ही किडणी सध्या तरी शरीराच्या बाहेरच ठेवली गेलीय.
डॉक्टर ह्या सर्जरीवर अर्थातच खुश आहेत. कारण याआधी जेव्हा कधी माणसाच्या शरीरात अशी किडणी बसवण्याचा प्रयत्न केला गेला तेव्हा तो अयशस्वी झालाय. आता एवढ्या प्रयत्नानंतर डॉक्टरांना यश आलेलं आहे. डुकराच्या किडणीचं प्रत्यारोपन यशस्वी झालंय. हे माणसासाठी वरदान ठरू शकतं.