अल्पवयीन मुलीच्या हत्येनं पुणे हादरलं आहे. एकतर्फी प्रेमातून एका 14 वर्षांच्या मुलीची हत्या झाल्याची धक्कादायक घटना पुण्यात घडली आहे. क्षितिजा व्यवहारे असं मृत मुलीचं नाव असून ती आठवीत शिकत होती. एकतर्फी प्रेमातून हा खून झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे. क्षितिजा कबड्डीपटू होती.
बिबवेवाडीतील यश लॉन समोरील मैदानावर क्षितीजा मैत्रिणींसोबत कबड्डी खेळत होती. त्याचवेळी एक तरुण तिथे आला. तो तिला बाजूला घेऊन गेला आणि तिच्यावर कोयत्याने सपासप वार केले. या हल्ल्यात क्षितिजाचा जागेवरच मृत्यू झाला. साथीदारांसह मोटरसायकलवरुन आलेल्या आरोपीने क्षितीजावर हल्ला केला. हल्ला केल्यानंतर आरोरी फरार झाले असून बिबवेवाडी पोलीस याप्रकरणी अधिक तपास करत आहे.
आरोपींच्या शोधासाठी पोलीस पथकं रवाना करण्यात आली आहेत. एकतर्फी प्रेमातून हा हल्ला झाल्याची शक्यता पोलिसांनी व्यक्त केली आहे. मिळालेल्या माहितीनुसार आरोपीकडे पिस्तुलदेखील होतं. हल्ल्या केल्यानंतर त्याने पिस्तुल घटनास्थळीच फेकून देत पळ काढला. या हत्येनं पुण्यात एकच खळबळ उडाली आहे.