कोरोना विषाणूच्या संसर्गानं साधारण वर्षभराहून अधिक काळापासून सर्वांच्याच आयुष्याची आणि जगण्याची गणितं बदलली आहेत. अशाच परिस्थितीमध्ये आता कुठे कोरोना नियमांमधून उसंत मिळाल्याचं चित्र होतं. पण, पुन्हा एकदा सर्वांचाच बेजबाबदारपणा कोरोना संसर्फ फोफावण्यास कारणीभूत ठरत आहे. मुंबईला याचा तडाखा बसला असल्याचं आता पाहायला मिळत आहे.
कोरोना नियमांमध्ये आलेली शिथिलता आणि त्यानंतर मिळालेली मोकळीक या साऱ्याचा परिणाम म्हणजेच मुंबईत पुन्हा एकदा कोरोना संसर्ग अधिक वेगानं फोफावण्याची चिन्हं आहेत. आरोग्य विभागाच्या माहितीनुसार एका व्यक्तीकडून इतरांना कोरोना संसर्ग होण्याचा धोका अधिक वाढला असून, मुंबईत कोरोनाची आर व्हॅल्यू पुन्हा एकदा 1 हून अधिक झाली आहे.
आर व्हॅल्यू अर्थात रिप्रोडक्शन व्हॅल्यूमध्ये झालेली वाढ कोरोनाचा धोका अधिक वाढवून जात आहे. ज्यामुळं मुंबईकरांची चिंता वाढली आहे.
मुंबईत सप्टेंबर महिन्याच्या अखेरीस 28 ते 30 सप्टेंबरदरम्यान संसर्ग पसरण्याला गती मिळाल्याची माहिती मिळत असून, सणासुदीच्या दिवसांमध्यो कोरोना नियमांचा विसर पडल्यामुळे आणि लसीकरणामुळं कोरोनाची दहशतच काहीशी कमी झाल्यामुळे रुग्णांची संख्या वाढल्याचं म्हटलं जात आहे.
कोरोना अद्यापही संपलेला नाही, अशी वारंवार सूचना करुनही नागरिकांमध्ये बेजबाबदारपणाचा कळस पाहायला मिळत आहे. त्यातच अनेक ठिकाणी सातत्यानं गर्दीही केली जात असल्यामुळं कोरोना रुग्णवाढीला आलेख पुन्हा एकदा उंचावू लागला आहे. परिस्थिती अशीच राहिल्याश शहरात ऐन दिवाळीमध्ये निर्बंध आणखी कठोर केले जाऊ शकतात ही बाब नाकारता येत नाही.