बुधवारपासून ऑल इंग्लंड खुल्या बॅडमिंटन अजिंक्यपद स्पर्धेचा प्रारंभ होत आहे. या स्पर्धेपूर्वी तीन भारतीय बॅडमिंटनपटूंना कोरोनाची लागण झाली असून, एक सहाय्यक कर्मचारी देखील संक्रमित आढळला आहे. कोरोनाची लागण झालेल्या खेळाडूंची नावे जाहीर करण्यात आलेली नाहीत.
पॉझिटिव्ह आलेल्या अहवालाबद्दल भारतीय प्रशिक्षक मॅथेस बो यांनी आश्चर्य व्यक्त केले आहे. ते म्हणाले, ”दोन आठवड्यांपूर्वी स्विस ओपन सुरू झाल्यापासून आम्ही ज्युरिखमध्ये क्वारंटाइन होतो. मागील 14 दिवसांत आमची 5 वेळा चाचणी झाली आहे आणि सर्व चाचण्या निगेटिव्ह आल्या आहेत. मग आता अचानक पॉझिटिव्ह कसे आलो?”
या स्पर्धेमध्ये विश्वविजेत्या पी. व्ही. सिंधूवर भारताची भिस्त असेल. स्विस खुल्या स्पर्धेच्या अंतिम फेरीतील पराभवातून सावरत जेतेपदांचा दुष्काळ संपवण्यासाठी ती उत्सुक आहे. पुरुष एकेरीत किदम्बी श्रीकांतकडून भारताच्या पदकाच्या प्रमुख आशा आहेत. श्रीकांतची पहिली लढत इंडोनेशियाच्या टॉमी सुगियार्तोशी असेल, तर जागतिक कांस्यपदक विजेत्या बी. साईप्रणितला फ्रान्सच्या टॉमा ज्युनियर पुपोव्हशी भिडावे लागेल. पुरुष दुहेरीत जागतिक पुरुष दुहेरी क्रमवारीत सध्या १०व्या स्थानावर असलेल्या सात्त्विक साईराज रन्कीरेड्डी आणि चिराग शेट्टी यांच्यावर भारताची मदार असेल.