आयपीएलच्या 35 व्या सामन्यात शुक्रवारी (24 सप्टेंबर) चेन्नई सुपर किंग्सने रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु संघाला सहा विकेट्सनी मात दिली. या पराभवामुळे आरसीबी संघाचे सर्वच खेळाडू निराश झालेले दिसून आले. पण त्यांच्या हर्षल पटेलने (Harshal Patel) मात्र त्याचे पर्पल कॅपच्या शर्यतीतील अव्वल स्थान कायम ठेवले आहे. चेन्नई विरुद्धच्या सामन्यात दोन विकेट्स घेत एकूण 19 विकेट्स स्वत:च्या नावे केले आहेत.
हर्षलने याआधी 8 सामन्यात 17 विकेट्स घेत पहिलं स्थान मिळवलं होतं. त्यानंतर चेन्नईविरुद्ध आणखी दोन विकेट घेतल्याने त्याने त्याचे पहिले स्थान आणखी मजबूत केले आहे. या सामन्यात त्याने मोईन अली आणि अंबाती रायडू यांच्या विकेट्स घेतल्या. त्याच्या या विकेट्समुळे एकाक्षणी सामना चुरशीच्या स्थितीत आला होता. पण फिनिशर धोनी आणि रैना जोडीने अप्रतिम फलंदाजी करत विजय चेन्नईच्या नावे केला.
सामन्यात चेन्नईने नाणेफेक जिंकत गोलंदाजी घेतल्याने आरसीबीने प्रथम फलंदाजी केली. ज्यामध्ये सलामीवीर विराट कोहली आणि देवदत्त पडीक्कल यांनी सुरुवातीपासूनच फटेबाजी करण्यास सुरुवात केली. यावेळी आधी देवदत्तने आणि नंतर विराटने अर्धशतकाची नोंद केली. देवदत्तने 50 चेंडूत 70 धावा केल्या ज्यामध्ये त्याने 5 चौकार आणि 3 षटकार ठोकले. तर दुसरीकडे भारतीय कर्णधार विराटने देखील दमदार अर्धशतक लगावलं. त्याने 41 चेंडूत 53 धावा केल्या. या खेळीत विराटने 6 चौकार आणि एक षटकार ठोकला. पण त्या दोघानंतर एकाही खेळाडूला खास फलंदाजी करता आली नाही. डिव्हीलीयर्सने 12 आणि मॅक्सवेलने 11 धावा केल्या तर बाकी खेळाडूंना दुहेरी संख्याही गाठता न आल्याने आऱसीबी केवळ 157 धावाचं करु शकले.
त्यानंतर चेन्नईला विजयासाठी 157 धावांचे आव्हान मिळाले असताना चेन्नईची तगडी फलंदाजी पाहता त्यांच्यासाठी हे अधिक अवघड नव्हते. त्यात पर्वाच्या सुरुवातीपासून चांगल्या फॉर्ममध्ये असणारे चेन्नईचे सलामीवीर ऋतुराज गायकवाड (38) आणि फाफ डुप्लेसी (31) यांनी आजही उत्तम सुरुवात करुन दिली. ज्यानंतर मध्यल्या फळीत मोईन अली (23) आणि अंबाती रायडू (32) यांनी विजयाच्या जवळ संघाला नेऊन ठेवले. पण दोघेही बाद होताच आरसीबी कमबॅक करेल असे वाटत होते. त्याच क्षणी फिनिशर जोडी महेंद्रसिंह धोनी आणि सुरेश रैना यांनी अनुक्रमे नाबाद 11 आणि नाबाद 17 धावा करत संघाला सहा गडी राखून विजय मिळवून दिला
पर्पल कॅपच्या शर्यतीतील टॉप-5 गोलंदाज
- हर्षल पटेल (आरसीबी) – 9 सामने 19 विकेट-
- आवेश खान (दिल्ली कॅपिटल्स)- 9 सामने 14 विकेट
- ख्रिस मॉरिस (राजस्थान रॉयल्स)- 8 सामने 14 विकेट
- अर्शदीप सिंग (पंजाब किंग्स)- 7 सामने 12 विकेट
- राशिद खान (सनरायजर्स हैद्राबाद)- 8 सामने 11 विकेट