आचार्य रजनीश यांच्या पुण्यातील आश्रमात जमीन घोटाळा

आचार्य रजनीश उर्फ ओशो यांच्या आश्रमात भूखंड घोटाळा झाला आहे. पुण्यातील ओशो आश्रामांच्या संचालकांनी आश्रमाच्या 20 एकर जमिनीपैकी 8 एकर जमीन विकली असून आश्रमात अनेक गैरकारभार होत आहेत. त्याची केंद्र सरकारने चौकशी करावी, अशी मागणी ओशोंच्या अनुयायांनी केली आहे. ओशोंच्या अनुयायांनी तसे साकडेच रिपाइं नेते आणि केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांना घातले आहे.

केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले, ओशो अनुयायांचे प्रमुख योगेश ठक्कर उर्फ स्वामी योगेश, रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय उपाध्यक्ष कृष्ण मिलन शुक्ला, रिपाइं राज्य उपाध्यक्ष विलास तायडे, माँ आरती राजधान, हेमा बावेजा ठक्कर, आदींच्या प्रमुख उपस्थितीत यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान येथे ओशो अनुयायांची बैठक आयोजित करण्यात आली होती. त्यावेळी ओशो आश्रमात होत असलेले गैरव्यवहार, आर्थिक घोटाळा, तसेच राज्य आणि केंद्र सरकारला मिळू शकणारा कोट्यावधी रुपयांचा महसूल ओशो आश्रम बुडवीत असल्याकडे रामदास आठवले यांचे लक्ष वेधण्यात आले. त्यानंतर घेतलेल्या पत्रकार परिषदेत त्यांनी ही मागणी केली आहे.

आचार्य रजनीश तथा ओशो यांचे निधन होऊन 21 वर्षे लोटली आहेत. या काळात त्यांच्या पुण्यातील ओशो आश्रमात संचालकांनी अनेक गैर कारभार केले आहेत. मागील 50 वर्षे जे अनुयायी ओशोंची सेवा करीत होते अशा अनुयायांना ही पुण्यातील ओशो आश्रमात प्रवेश दिला जात नाही. ओशो आश्रमाची पुण्यात एकूण 20 एकर जमीन असून त्यातील 8 एकर जमीन ओशो आश्रमाच्या विद्यमान संचालकांनी विकली आहे. त्या व्यवहारास 3 हजार 200 लोकांनी आक्षेप घेतले असून धर्मदाय आयुक्तांकडे अर्ज दाखल केले आहेत. ओशो आश्रमाचे नाव बदलून ओशो रिसॉर्ट करण्यात आले आहे. त्यामुळे ओशो अनुयायांच्या भावना दुखविण्या बरोबर आश्रमाच्या नावाने मोठे गैरव्यवहार ओशो आश्रम संचालक करीत असून याची भारत सरकारने सखोल चौकशी करून न्याय द्यावा अशी मागणी ओशो अनुयायांनी आज आठवलेंकडे केली आहे.

पुण्यातील कोरेगाव पार्क येथे ओशो आश्रमाची 20 एकर जागा आहे. ती बेकायदेशीरपणे विकण्याचा डाव आश्रम संचालकांचा आहे. जमीन विकल्यानंतर त्याचा पैसा थेट परदेशात पाठविण्यात येत आहे. ओशो आश्रमात प्रवेशासाठी घेण्यात येणाऱ्या 5 हजार रुपये शुल्कातून आश्रमाला कोट्यावधींचा निधी मिळत असून तो निधी भारतातील बँकांमध्ये न ठेवता परदेशातील बँक खात्यात पाठविला जात आहे. पुण्यातील ओशो आश्रमातील बुद्धा हॉलमधील बुद्ध मूर्ती आश्रम संचालकांनी गायब केली आहे. त्या बुद्ध मूर्तीची पुन्हा बुद्धा हॉलमध्ये स्थापना करण्यात यावी, अशी मागणी ओशो अनुयायांनी केली आहे.

ओशोंनी लिहिलेली पुस्तके आणि इतर वस्तूंची रॉयल्टी स्वरूपात कोट्यावधी रुपये ओशो आश्रमास मिळत आहे. पण ती रक्कम भारतात येत नसून ओशो इंटरनॅशनलच्या नावाने परदेशात जात आहे. ओशो हे जन्माने कर्माने भारतीय आहेत. त्यांच्या ज्ञानाचा उपदेशाचा कमाईसाठी वापर करणे चुकीचे आहे. त्यांच्या पुस्तकांवर रॉयल्टी असू शकेल पण विचारांवर रॉयल्टी कशी मागू शकाल? असा सवाल करीत ओशो यांनी नि:स्वार्थ सेवेला महत्व दिले आहे.मात्र ओशो इंटरनॅशनल ही ट्रस्ट ओशो यांच्या आश्रमाच्या पवित्र्याचा भंग करीत आश्रमाला रिसॉर्ट करून कमाई चे सधन करीत आहेत. त्याचा ओशो अनुयायांनी निषेध केला आहे.

ओशो आश्रमात येणारा पैसा, होणारे व्यवहार, जमीन विक्री आदींची केंद्र सरकारने सखोल चौकशी करून ओशो आश्रम भक्तांसाठी अनुयायांसाठी विनामूल्य खुला करावा, अशी मागणी ओशो अनुयायांनी केली असून या प्रकरणी आठवले यांनी लक्ष घालण्याचे आवाहन केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

scroll to top
error: आपल्याला माहिती कॉपी करण्याची परवानगी नाही.