काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि राज्यसभा खासदार ऑस्कर फर्नांडिस यांचं मंगळुरूमध्ये निधन झालं. ते 80 वर्षाचे होते. जुलैमध्ये योगा करत असताना पडल्यामुळे त्यांना डोक्याला मार लागला होता. त्यामुळे त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. तेव्हापासून त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू होते. त्यांच्या निधानावर काँग्रेससह विविध राजकीय पक्षांकडून शोक व्यक्त करण्यात आला आहे.
जुलै महिन्यात घरात योगा करत असताना ऑस्कर फर्नांडिस पडले होते. त्यामुळे त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्यांच्या डोक्याला मार लागल्याने मेंदूमध्ये रक्त जमा झाले होते. त्यांच्यावर एक सर्जरीही करण्यात आली होती. त्यानंतर त्यांना आयसीयूमध्ये भरती करण्यात आले होते. मात्र, उपचार सुरू असतानाच आज त्यांची प्राणज्योत मालवली.
फर्नांडिस यांना रुग्णालयात दाखल केल्यानंतर काँग्रेसचे ज्येष्ठ नेते सिद्धरमय्या आणि डी. के. शिवकुमार त्यांना पाहण्यासाठी रुग्णालयात गेले होते. त्यांच्यावर होत असलेल्या उपचाराची माहितीही त्यांनी घेतली होती.
फर्नांडिस यूपीए सरकारमध्ये केंद्रीय परिवहन मंत्री होते. राहुल गांधी यांचे निकटवर्तीय म्हणून त्यांची ओळख होती. त्यांनी राजीव गांधी यांचे संसदीय सचिव म्हणूनही काम पाहिलं होतं. ते अखिल भारतीय काँग्रेस कमिटीच्या केंद्रीय निवडणूक प्राधिकरणाचे अध्यक्ष होते.
फर्नांडिस यांनी 1980मध्ये कर्नाटकाच्या उड्डपी मतदारसंघातून लोकसभेची निवडणूक लढवली होती. या निवडणुकीत ते विजयी झाले होते. त्यानंतर याच मतदारसंघातून त्यांनी 1984, 1989, 1991 आणि 1996 मध्ये विजय मिळवला होता. 1998मध्ये ते राज्यसभेवर गेले होते. 2004मध्ये पुन्हा त्यांची राज्यसभेवर वर्णी लावण्यात आली होती.
फर्नांडिस यांच्या निधनावर काँग्रेसने ट्वीट करून शोक व्यक्त केला आहे. ऑस्कर फर्नांडिस यांच्या निधनाने आम्हाला तीव्र दु:ख झालं आहे. त्यांच्या कुटुंबाप्रती आमची संवेदना आहे. ते दिग्गज काँग्रेस नेते होते. त्यांच्या सर्वसमावेश भारताच्या दृष्टीकोणाचा आमच्या काळातील राजकारणावर मोठा प्रभाव पडला होता. काँग्रेसला त्यांच्या मार्गदर्शनाची कमतरता नेहमीच जाणवेल, असं काँग्रेसने म्हटलं आहे.
माजी केंद्रीय मंत्री आणि ज्येष्ठ काँग्रेस नेते ऑस्कर फर्नांडिस यांच्या निधनाचं वृत्त ऐकून दु:ख झालं. प्रचंड बुद्धिमान आणि दृढ संकल्प असलेले नेते म्हणून ते प्रसिद्ध होते. तितकेच ते प्रेमळही होते. तसेच काँग्रेसचे कट्टर शिपाईही होते, अशा शब्दात काँग्रेस नेते श्रीनिवास बीवी यांनी शोक व्यक्त केला आहे.