आज दि.२ सप्टेंबर च्या दिवसभरातील ठळक घडामोडी अशा…

महाराष्ट्रातील ‘या’ दोन शिक्षकांचा राष्ट्रीय पुरस्कारनं होणार सन्मान; देशातील 44 शिक्षकांचा समावेश

अवघ्या महाराष्ट्राची मान आपल्या कर्तृत्वानं आणि परिश्रमानं उंचावणाऱ्या दोन शिक्षकांना यंदा राष्ट्रीय शिक्षक पुरस्कार जाहीर झाला आहे. यंदा देशात 5 ते 17 सप्टेंबर दरम्यान शिक्षक पर्व साजरं केलं जाणार आहे. त्या अनुषंगानं देशभरातील तब्बल 44 शिक्षकांना राष्ट्रीय पुरस्कारानं सन्मानित केलं जाणार आहे. यामध्ये महाराष्ट्रातील दोन शिक्षकांचा समवेश आहे.

यंदा या राष्ट्रीय शिक्षक पुरस्कारांसाठी महाराष्ट्रातील दोन शिक्षकांची निवड करण्यात आली आहे.विद्यार्थ्यांना शिक्षण देण्याची त्यांची जिद्द आणि मेहनत यामुळे त्यांना हा पुरस्कार मिळाला आहे. यात गडचिरोली जिल्ह्याच्या सिरोंचा तालुक्यातील अस्रल्ली गावाच्या श्री खुर्शीद कुतुबुद्दीन शेख या जिल्हा परिषदेच्या शाळेतील शिक्षकाचा समावेश आहे. तर उस्मानाबाद जिल्ह्यातील कडोर या गावातील जिल्हा परिषद शाळेतील शिक्षक श्री उमेश रघुनाथ खोसे यांनाही राष्ट्रीय पुरस्कार जाहीर झाला आहे.देशभरातून निवड झालेल्या या 44 शिक्षकांपैकी 5 शिक्षकांचा सन्मान शिक्षक दिनाच्या दिवशी म्हणजेच 5 सप्टेंबरला करण्यात येणार आहे. तर 7 सप्टेंबर रोजी ‘शिक्षा संमेलनात’ पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत शिक्षकांसाठी राष्ट्रीय पुरस्कार देण्यास सुरुवात होणार आहे.

२०२०-२१ आर्थिक वर्षानंतर पीएफ
खात्यांवर मिळणारे व्याज करपात्र असेल

केंद्र सरकारने नवीन आयकर नियमावली अधिसूचित केली आहे ज्या अंतर्गत विद्यमान भविष्य निधी खाती (PF) दोन स्वतंत्र खात्यांमध्ये विभागली जातील. केंद्रीय प्रत्यक्ष कर मंडळाने (CBDT) या संदर्भात अधिसूचना जारी केली आहे. अधिसूचनेनुसार, पीएफवरील व्याज मोजण्यासाठी पीएफ खात्यातच एक वेगळे खाते उघडले जाईल. २०२०-२१ आर्थिक वर्षानंतर पीएफ खात्यांवर मिळणारे व्याज करपात्र असेल आणि त्याची स्वतंत्र गणना केली जाईल. पीएफ खात्यात २०२१-२२ आणि त्यानंतरच्या वर्षांमध्ये वेगवेगळी खाती असतील.

पुढील दोन दिवसांत शाळा सुरु करण्याबाबत निर्णय घेणार; बच्चू कडूंची माहिती

गेल्या दीड वर्षांपासून देशभरात कोरोनानं अक्षरशः थैमान घातलं आहे. या महामारीमुळे लाखो लोकांनी आपले प्राण गमावले आहेत. त्यामुळे शाळा, कॉलेजेस गेल्या दीड वर्षांपासून बंद आहेत. सर्व विद्यार्थ्यांना ऑनलाईन पद्धतीनं शिक्षण दिलं जातं आहे. मात्र आता हळूहळू सर्व निर्बंध शिथिल  होऊ लागले आहेत. दुकानं आणि मॉल्सही सुरु करण्यात आले आहेत. मात्र शाळा कधीपासून सुरु होणार हा प्रश्न शाळांना, शिक्षकांना आणि पालकांना पडला आहे. यावर आज राज्यमंत्री बच्चू कडू  यांनी माहिती दिली आहे.

येत्या दोन दिवसांमध्ये राज्यातील शाळा सुरु करण्यासंदर्भात योग्य तो निर्णय घेतला जाईल अशी माहिती बच्चू कडू यांनी दिली आहे. पत्रकारांशी संवाद साधताना त्यांनी ही माहिती दिली आहे. शाळा सुरु करण्याचा विचार राज्य सरकार करत आहे. मात्र इतर राज्यांमध्ये कोरोना प्रभाव पुन्हा वाढताना दिसत आहे. त्यामुळे योग्य तो निर्णय घेतला जाईल अशी माहिती बच्चू कडू यांनी दिली आहे.

जागतिक आरोग्य संघटनेने करोनाच्या
व्हेरिएंटसंदर्भात दिला धोक्याचा इशारा

जागतिक आरोग्य संघटनेनं आता करोनाच्या नवीन व्हेरिएंटसंदर्भात धोक्याचा इशारा दिलाय. कोलंबियामध्ये आढळून आलेला या विषाणूच्या नव्या व्हेरिएंटचं नाव म्यू असं आहे. या विषाणूचं शास्त्रीय नाव बी वन ६२१ असं आहे. पहिल्यांदा यासंदर्भात जानेवारीमध्ये माहिती मिळाली होती. या विषाणूचा संसर्ग झालेल्या रुग्णांची संख्या ही चार हजारांच्या आसपास असून ते जगभरातील ४० वेगवेगळ्या देशांमध्ये आढळून आले आहेत.

महाराष्ट्राची केंद्र सरकारकडे तीन
कोटी लसीच्या मात्रांची मागणी

महाराष्ट्राने केंद्र सरकारकडे तीन कोटी लसीच्या मात्रांची मागणी केली आहे. मात्र केंद्र सरकारकडून कोणतेही ठोस आश्वासन देण्यात आलेले नाही. त्याचवेळी उत्तर प्रदेश व गुजरात सारख्या राज्याना केंद्राकडून मोठ्या प्रमाणात लस पुरवठा करण्यात येत आहे. राज्यातील साडेचार हजार लस केंद्रांच्या माध्यमातून रोज १५ ते २० लाख लस मात्रा देण्याची क्षमता असताना रोज दोन ते तीन हजार केंद्रांवर लस मात्रा दिल्या जातात. केंद्राकडून केल्या जाणाऱ्या लस पुरवठ्यावर आपण प्रामुख्याने अवलंबून असल्याने अनेक ठिकाणची लस देणारी केंद्र बंद ठेवावी लागत आहे.

बिग बॉस १३चा विजेता
सिद्धार्थ शुक्लाचे निधन

छोट्या पडद्यावरील अतिशय लोकप्रिय अभिनेता आणि बिग बॉस १३चा विजेता सिद्धार्थ शुक्लाचे निधन झाले आहे. वयाच्या ४०व्या वर्षी सिद्धार्थने अखेरचा श्वास घेतला आहे. त्याच्या निधनानंतर सर्वांनच धक्का बसला असून चित्रपटसृष्टीमध्ये हळहळ व्यक्त केली जात आहे. अनेकजण सोशल मीडिया पोस्टद्वारे सिद्धार्थला श्रद्धांजली वाहत आहे.

माजी गृहमंत्री अनिल देशमुख
यांच्या अडचणीत वाढ

माजी गृहमंत्री आणि राष्ट्रवादीचे नेते अनिल देशमुख यांच्या अडचणीत वाढ झाली आहे. सीबीआय पाठोपाठ आता ईडीकडून चौकशीची टांगती तलवार अनिल देशमुख यांच्यावर आहे. ईडी कारवाईविरोधात अनिल देशमुख यांच्या याचिकेवर सुनावणी घेण्यास मुंबई हायकोर्टाने नकार दिला आहे. दुसऱ्या खंडपीठासमोर दाद मागण्याचे न्यायमूर्ती रेवती मोहिते- ढेरे यांनी निर्देश दिले आहेत. अनिल देशमुख अद्यापही ईडीच्या चौकशीला सामोरे गेलेले नाहीत. या प्रकरणाविरोधात त्यांनी मुंबई हायकोर्टात धाव घेतली होती.

एसटी महामंडळाला ५०० कोटी
तातडीने वितरित

वेतनासाठी एसटी महामंडळाने ६०० कोटी रुपयांची मदत राज्य शासनाकडे मागितली होती. त्यावर उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निर्देशानंतर एसटी महामंडळाला ५०० कोटी तातडीने वितरित करण्यात आले आहेत. त्यामुळे राज्यभरातील ९८ हजार एसटी कर्मचाऱ्यांना वेतनाचा प्रश्न सुटणार आहे.

मुसळधार पावसामुळे
न्यूयॉर्कमध्ये आणीबाणी घोषित

न्यूयॉर्कमध्ये होत असलेल्या मुसळधार पावसामुळे पूरस्थिती निर्माण झाली आहे. शहरात ठिकठिकाणी पाणी साचलं आहे. गेल्या अनेक वर्षातील सर्वाधिक पावसाची नोंद झाली आहे. त्यामुळे जनजीवन विस्कळीत झालं आहे. लोकांच्या घरात पाणी शिरल्याने रात्र जागून काढावी लागत आहे. रस्त्यांना नद्यांच्या स्वरूप प्राप्त झालं आहे. भयावह स्थिती पाहता न्यूयॉर्केचे महापौर बिल दि ब्लासिओ यांनी एका रात्रीसाठी आणीबाणी घोषित केली आहे. ट्वीट करून त्यांनी याबाबतची माहिती दिली आहे.

तालिबानचे समर्थन करणाऱ्या भारतीय
मुस्लिमांवर नसीरुद्दीन शाह यांची टीका

अफगाणिस्तानमध्ये तालिबानचा ताबा आल्यापासून तिथली परिस्थिती ही बिकट झाली आहे. तालिबान महिला आणि मुलांना याचा सगळ्यात जास्त त्रास होत आहे. लोक अफगाणिस्तानमधून पळून जाण्याचा प्रयत्न करत आहेत. जगभरातून तालिबानी लोकांवर टीका होत आहे. भारतीय मुस्लिम तालिबानी राजवटीचे कौतुक करत आहेत. आता बॉलिवूड अभिनेते नसीरुद्दीन शाह यांनी टीका केली आहे. नसीरुद्दीन यांनी तालिबानचे समर्थन करणाऱ्या भारतीय मुस्लिमांवर निशाणा साधला आहे.

भारत आणि इंग्लंड
कसोटी आजपासून

लीड्स कसोटी गमावल्यानंतर भारत आणि इंग्लंड यांच्यातील चौथी कसोटी आजपासून सुरू झाली आहे. पाच सामन्यांची मालिका सध्या १-१ने बरोबरीत आहे. अशा परिस्थितीत हा सामना जिंकणारा संघ मालिकेत आघाडी घेईल. केनिंग्टनच्या ओव्हल मैदानावर हा सामना रंगणार आहे. या सामन्यात इंग्लंडचा कर्णधार जो रूटने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे.

इंग्लंडविरुद्धच्या तिसऱ्या टेस्टमध्ये टीम इंडियाची बॅटिंग पुन्हा गडगडली आहे. 69 रनवर टीम इंडिया आता खेळत आहे. सुरुवातीचे 4 बॅट्समन पॅव्हेलियनमध्ये परतले. रोहित शर्मा 11 रनवर, केएल राहुल 17 रनवर आणि चेतेश्वर पुजारा 4,आणि रविंद्र जडेजा 10 रन करून आऊट झाला. क्रिस वोक्स, रॉबिनसन आणि जेम्स अंडरसन यांना प्रत्येकी 1-1 विकेट मिळाली. सुरुवातीच्या 3 विकेट लवकर गेल्यानंतर टीम इंडियाने आश्चर्यकारकरित्या रविंद्र जडेजाला पाचव्या क्रमांकावर बॅटिंगला पाठवलं.

राष्ट्रीय उद्यानाच्या नावातून
राजीव गांधी यांचे नाव वगळणार

केंद्राने राजीव गांधी खेलरत्न पुरस्कार हे नाव बदलून मेजर ध्यानचंद खेलरत्न पुरस्कार असं केल्यानंतर एका महिन्यापेक्षाही कमी कालावधीनंतर आसाम मंत्रिमंडळाने माजी पंतप्रधान राजीव गांधी यांचे नाव ओरंग राष्ट्रीय उद्यानाच्या नावातून वगळण्याचा निर्णय घेतला आहे.

अफगाणिस्तानमध्ये तालिबानचा
सत्ता स्थापनेचा मार्ग मोकळा

अफगाण सैन्याची माघार आणि अमेरिकेच्या सैन्याची घरवापसी झाल्यानंतर आता तालिबानचा अफगाणिस्तानमध्ये सत्ता स्थापनेचा मार्ग पूर्ण मोकळा आहे. त्यामुळे तालिबानकडून कोणत्याही क्षणी सत्ता स्थापनेची आणि नव्या मंत्रिमंडळाची घोषणा होऊ शकतो. तालिबान आणि अन्य अफगाण नेता संघटनेच्या (तालिबान) वरिष्ठ धार्मिक नेते नवं सरकार आणि मंत्रिमंडळ स्थापनेच्या निर्णयावर आलेत. तालिबान संघटनेचा सुप्रीम कमांडर अखुंदजादा सर्वोच्च नेता असणार आहे. तालिबानच्या सांस्कृतिक आयोगाचा सदस्य बिलाल करीमीने याबाबत माहिती दिलीय.

पेट्रोल आणि डिझेलचे
देशभरात दर स्थिर राहणार

सप्टेंबर महिन्याच्या पहिल्या दोन दिवसांत पेट्रोल आणि डिझेलची किंमत ‘जैसे थे’ राहिली आहे. पेट्रोलियम कंपन्यांनी गुरुवारी सकाळी जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार देशातील प्रमुख शहरांमध्ये इंधनाच्या दरात (Fuel Rate) कोणताही बदल झालेला नाही. कालदेखील देशभरात इंधनाचे दर स्थिर होते.

राजू शेट्टी यांची पंचगंगा
परिक्रमा आजपासून

पूरग्रस्तांना मदत मिळावी म्हणून स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांनी आजपासून पंचगंगा परिक्रमा सुरू केली आहे. कोल्हापूरच्या प्रयाग चिखली ते नरसिंह वाडीपर्यंत ही पंचगंगा परिक्रमा निघणार आहे. तब्बल पाच दिवस चालणाऱ्या या परिक्रमेत हजारो शेतकरी आणि स्थानिक नागरिक एकवटले आहेत. शेतकरी आणि पूरग्रस्तांच्या मागण्या मान्य न केल्यास येत्या 5 सप्टेंबर रोजी पूरग्रस्तांसह जलसमाधी घेऊ, असा इशारा राजू शेट्टी यांनी दिला आहे.

भक्तिवेदांत स्वामी प्रभुपाद यांच्या
जयंतीच्या निमित्ताने 125 रुपयांचे नाणे

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी इस्कॉनचे संस्थापक स्वामी प्रभुपाद यांच्या 125 व्या जयंतीनिमित्त 125 रुपयांचे नाणे जारी केले आहे. इंटरनॅशनल सोसायटी फॉर कृष्णा कॉन्शियसनेस (ISKCON)चे संस्थापक श्री भक्तिवेदांत स्वामी प्रभुपाद यांच्या 125 व्या जयंतीच्या निमित्ताने 125 रुपयांचे विशेष स्मृत्यर्थ नाणे जारी करण्यात आले.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून स्मृत्यर्थ नाणे जारी केले. त्यावेळी मोदी यांनी म्हटले की, स्वामी प्रभुपाद एक अलौकिक कृष्णभक्त तसेच महान देशभक्तही होते.

SD social media
9850 60 3590

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

scroll to top
error: आपल्याला माहिती कॉपी करण्याची परवानगी नाही.