आज दि.९ जुलै च्या दिवसभरातील ठळक घडामोडी अशा….

देशात समान नागरी कायद्याची
गरज : उच्च न्यायालय

भारतामध्ये वेगवेगळ्या जाती-धर्माचे लोक एकत्र राहत असल्यामुळे इथे समान नागरी कायदा असण्याची गरज अनेकदा व्यक्त करण्यात आली आहे. मात्र, त्यावर ठोस निर्णय किंवा त्या दिशेने ठोस प्रयत्न होताना दिसले नाहीत. आता थेट दिल्ली उच्च न्यायालयाने देशात समान नागरी कायद्याची गरज व्यक्त केली आहे. यासंदर्भातल्या एका याचिकेच्या सुनावणीदरम्यान न्यायालयानं हे मत व्यक्त केलं आहे. तसेच, या संदर्भात न्यायालयानं केंद्र सरकारला आवश्यक ती पावलं उचलण्याचे निर्देश देखील दिले आहेत. अनेक प्रकरणांमध्ये त्या त्या धर्माचे किंवा समुदायासाठी केलेले कायदे न्यायदान प्रक्रियेमध्ये अडथळा ठरू शकणार नाहीत आणि सर्व भारतीयांना समान कायद्याच्या आधारे न्याय देता येईल, असं मत न्यायालयाने नमूद केलं.

एकनाथ खडसेंच्या पत्नी मंदाकिनी
यांना ईडीकडून समन्स

राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि माजी मंत्री एकनाथ खडसे यांच्या अडचणीत वाढ होताना दिसत आहे. पुण्यातील जमीन घोटाळा, आर्थिक गैरव्यवहार प्रकरणात सक्तवसुली संचालनालयाकडून (ईडी) जावयाला अटक करण्यात आल्यानंतर आता ईडीकडून आता एकनाथ खडसेंच्या पत्नी मंदाकिनी खडसे यांना समन्स बजावण्यात आलं आहे. याआधी एकनाथ खडसे यांची सलग नऊ तास चौकशी करण्यात आली.

तिरुवनंतपुरम जिल्ह्यात १४ जणांना
झिका विषाणूची लागण

केरळमधील तिरुवनंतपुरम जिल्ह्यात १४ जणांना झिका विषाणूची लागण झाल्याचं समोर आलं आहे. त्यामुळे प्रशासनाने तातडीने उपाययोजना करण्यास सुरुवात केली आहे. १४ जणांवर उपचार सुरु असून त्यांची प्रकृती स्थिर असल्याचं सांगण्यात आलं आहे. हा व्हायरस करोनाप्रमाणे जीवघेणा नसल्यामुळे पुरेशी काळजी घेतल्यास त्यावर मात करता येऊ शकते असं तज्ज्ञांचं म्हणणं आहे. त्यानुसार, डासांच्या चावण्यापासून बचाव करणे आणि पुरेसा आराम करणे आवश्यक असल्याचं तज्ज्ञ सांगतात.

पंकजा मुंडे यांनी मौन सोडलं, आपण
नाराज नसल्याचं केलं स्पष्ट

केंद्रीय मंत्रिमंडळात स्थान न मिळाल्याने पंकजा मुंडे आणि प्रीतम मुंडे नाराज असल्याची चर्चा राज्याच्या राजकारणात रंगली होती. दरम्यान भाजपा नेत्या पंकजा मुंडे यांनी या चर्चांवर मौन सोडलं असून आपण नाराज नसल्याचं स्पष्ट केलं आहे. तसंच यावेळी त्यांनी केंद्रीय मंत्रिमंडळात स्थान मिळालेल्या देशातील आणि राज्यातील नेत्यांचं अभिनंदन करत चर्चांना पूर्णविराम दिला आहे. मुंबईत आयोजित पत्रकार परिषदेत त्या बोलत होत्या.

करोनाची लस न घेतलेल्यांना
जॉब देऊ नये : फिजी सरकार

करोनाची लस न घेतलेल्यांना जॉब देऊ नये, असे आदेश फिजीचे पंतप्रधान फ्रँक बेनीमारामा यांनी दिले आहेत. हा आदेश कठोर वाटत असला तरी, त्यामागे करोनाचा फैलाव होऊ नये, या भावना असल्याचं देखील त्यांनी सांगितलं. दुसरीकडे करोनाची लस घेतली नाही तर नोकरी गमवावी लागेल असंही स्पष्ट केलं आहे. त्यामुळे देशात प्रत्येकाला करोनाची लस घेणं अनिवार्य आहे. देशात करोनाच्या डेल्टा व्हेरिएंटचे रुग्ण आढळल्यानंतर पंतप्रधान बेनीमारामा यांनी हे आदेश दिले आहेत.

भगवान जगन्नाथ यांची १४४ वी
पारंपारिक रथ यात्रा निघणार

करोना साथीच्या काळात अहमदाबादमधील भगवान जगन्नाथ यांची १४४ वी पारंपारिक रथ यात्रा निघणार आहे. यावेळी कर्फ्यू लावण्यात येणार आहे. यात्रेत केवळ ३ रथ आणि २ वाहने असतील. १९ किमी मार्गासाठी रथ यात्रेला परवानगी देण्यात आली आहे. त्याचबरोबर प्रसाद वाटप होणार नाही. गुजरातचे गृहमंत्री प्रदीपसिंग जडेजा यांनी याबाबत माहिती दिली.

प्रज्ञा ठाकुर यांचा लग्नात
डान्स करताना व्हिडिओ व्हायरल

काही दिवसांपूर्वी प्रज्ञा ठाकुर या बास्केटबॉल कोर्टात खेळतानाचा व्हिडिओ व्हायरल झाला होता. त्यानंतर आता एका लग्नात डान्स करताना दिसत आहेत. यानंतर काँग्रेसने प्रज्ञा ठाकुर यांच्यावर टीकास्त्र सोडलं आहे. आरोग्याचं कारण पुढे करत प्रज्ञा ठाकुर यांनी मालेगाव स्फोट प्रकरणात कोर्टात न येण्याची परवानगी मागितली होती. काँग्रेस नेते आणि मध्य प्रदेश काँग्रेस प्रवक्ता नरेंद्र सलूजा यांनी प्रज्ञा ठाकुर यांच्यावर टीका केली आहे.

SD social media
9850 60 3590

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

scroll to top
error: आपल्याला माहिती कॉपी करण्याची परवानगी नाही.