काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी कोविड-19 नियंत्रणातील अपयशावरुन पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि त्यांच्या सरकारवर जोरदार टीकास्त्र सोडलंय. “आम्ही सरकारला वारंवार कोरोनाच्या धोक्याचा इशारा दिला, पण त्यांनी आमची चेष्टा केली. मोदींना आजपर्यंत कोविड 19 आजारच समजला नाहीये. कोरोना केवळ एक आजार नसून तो बदलणारा संसर्ग रोग आहे. तुम्ही जितकी संधी द्याल तो तितका धोकादायक होतो. मी मागील वर्षी फेब्रुवारीत सरकारला कोरोना नियंत्रणासाठी उपाययोजना करण्यास सांगितलं होतं,” असं मत राहुल गांधींनी व्यक्त केलं. ते ऑनलाईन पत्रकार परिषदेत बोलत होते.
राहुल गांधी म्हणाले, “आतापर्यंत सरकारने केवळ 3 टक्के नागरिकांना पूर्णपणे लस दिलीय. दुसरीकडे अमेरिकेसारख्या देशाने त्यांच्या अर्ध्या (50 टक्के) लोकसंख्येचं लसीकरण केलंय. ब्राझिलमध्ये 8-10 टक्के लोकांचं लसीकरण झालंय. भारतातील कोरोनाच्या दुसऱ्या लाटेला पंतप्रधान नरेंद्र मोदी जबाबदार आहेत. मोदींनी आपली जबाबदारी पार पाडली नाही त्यामुळे अशी परिस्थिती तयार झाली. त्यांच्या कामाच्या पद्धतीमुळे लाखो नागरिकांचा जीव गेला. सरकारने दिलेल्या मृत्यूदराचा आकडा खोटा आहे. ही वेळ खोटारडेपणा करण्याची नाहीये.”
”सरकारने हे समजून घेतलं पाहिजे की विरोधी पक्ष त्यांचा शत्रू नाही. विरोधी पक्ष सरकारला केवळ रस्ता दाखवत आहे. लॉकडाऊन हा एक तात्पुरता मार्ग आहे. जर सध्या सुरु असलेल्या मंद वेगानेच लसीकरण झालं तर देशात कोरोनाची तिसरी, चौथी आणि पाचवी लाटही येईल. या पुढील कोरोना लाटा यापेक्षा खूप धोकादायक असतील. त्यामुळे सरकारने आपली लसीकरण रणनीती बदलायला हवी.”
राहुल गांधींनी यावेळी लसीकरणावर भर दिला. ते म्हणाले, “कोरोनावरील कायमस्वरुपी उपाय हा लसीकरणच आहे. भारत जगाच्या लसीकरणाची राजधानी झालाय. असं असूनही भारतात ही स्थिती आहे. त्यामुळे आता जेथून जशी लस मिळवता येईल तशी सरकारने मिळवली पाहिजे. आता कारणं सांगून वेळ मारुन नेणं चालणार नाही. सगळ्यात महत्त्वाचं जे तुम्हाला मदत करण्याचा प्रयत्न करत आहेत त्यांचं म्हणणं ऐका आणि समजून घ्या.