अंडरवर्ल्ड डॉन छोटा
राजनचा कोरोनामुळे मृत्यू
तिहार तुरुंगात शिक्षा भोगत असलेला कुख्यात अंडरवर्ल्ड डॉन छोटा राजनचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. नवी दिल्लीमधील ऑल इंडिया इंन्स्टीट्यूट ऑफ मेडिकल सर्व्हिसेस म्हणजेच एम्समध्ये उपचारादरम्यान राजनचा शुक्रवारी मृत्यू झाल्याचे वृत्त आहे. २६ एप्रिलपासून राजनवर एम्समध्ये उपचार सुरु होते.
खुशखबर मे महिन्याच्या मध्यापासून
कोरोना रुग्ण घट होण्यास सुरुवात
कोरोना संसर्गाचा सामना करणाऱ्या देशवासीयांसाठी दिलासादायक बातमी आहे. मे महिन्याच्या मध्यापासून अखेर पर्यंत कोरोनारुग्णांमध्ये घट होण्यास सुरुवात होणार आहे, असे प्रसिद्ध वैद्यकीय तज्ज्ञ गगनदीप कांग यांनी सांगितले. सध्या कोरोना ज्वर उच्च पातळीवर पोहोचला आहे. या महिन्यात एका दिवसात चार लाखांहून अधिक रुग्ण आढळले आहेत. तसेच चार हजार लोकांचा मृत्यूही झालेला आहे. रुग्णसंख्येची वाढ इतक्या वेगाने होत आहे की एका आठवड्यातच २५ लाख रुग्ण आढळले आहेत.
पाचवी, आठवीची शिष्यवृत्ती
परीक्षा पुढे ढकलण्याचा निर्णय
कोरोनाच्या वाढत्या रुग्णांच्या पार्श्वभूमीवर नियोजित इयत्ता पाचवी आणि आठवीची शिष्यवृत्ती परीक्षा पुढे ढकलण्याचा निर्णय महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेतर्फे घेण्यात आलेला आहे. ही परीक्षा २३ मे रोजी घेण्याचे नियोजन करण्यात आले होते. परंतु विद्यार्थ्यांच्या सुरक्षेला प्राधान्य देऊन ही परीक्षा पुढे ढकलण्याचा निर्णय घेतल्याची माहिती आयुक्त तुकाराम सुपे यांनी दिली. याबाबतचे माहितीपत्रक लवकरच प्रसिद्ध करण्यात येणार आहे.
सुप्रीम कोर्ट मोदी सरकारवर संतापलं
केंद्र सरकारला पुढील आदेशापर्यंत दिल्लीला रोज ७०० मेट्रिक टन ऑक्सिजन पुरवठा करण्याचा आदेश सुप्रीम कोर्टाने दिला आहे. दिल्लीमध्ये सध्या परिस्थिती गंभीर असून आहे. केंद्राकडून दिल्ली सरकारला नुकतंच ७०० मेट्रिक टन ऑक्सिजन पुरवठा करण्यात आला होता. दिल्ली सरकारने आम्हाला रोज इतकाच ऑक्सिजन पुरवठा केला जावा अशी मागणी केली असताना केंद्राने मात्र असमर्थता दर्शवली आहे. यावरुन सुप्रीम कोर्टाने केंद्राला फटकारलं असताना पुन्हा एकदा खडे बोल सुनावले आहेत. न्यायमूर्ती चंद्रचूड यांनी सांगितलं की, “प्रत्येक दिवशी, ७०० मेट्रिक टन ऑक्सिजन दिल्लीच्या रुग्णयांना दिला जावा. पुढील आदेशापर्यंत हा पुरवठा असाच केला जावा”. दरम्यान यावेळी कोर्टाने आम्हाला सरकारविरोधात कठोर निर्णय घ्यावे लागतील अशी परिस्थिती निर्माण करु नका अशा शब्दांत फटकारलं.
पुण्यात लॉकडाउन
लागण्याचे संकेत
मुंबई हायकोर्टाने दिलेल्या आदेशानंतर पुण्यात लॉकडाउन लागणार की नाही यासंबंधी चर्चा सुरु असताना उपमुख्यमंत्री आणि पालकमंत्री अजित पवार यांनी स्पष्ट उत्तर दिलं आहे. मुंबई हायकोर्टाने पुण्यातील वाढत्या रुग्णसंख्येवर चिंता व्यक्त केली असून पुणे तसंच रुग्णसंख्या जास्त असणाऱ्या इतर शहरांमध्ये लॉकडाउन लावण्याची सूचना मुख्यमंत्र्यांना केली. यावेळी मुंबई हायकोर्टाने पुणे पालिकेच्या आयुक्तांनाही खडसावलं. करोना स्थितीचा आढावा घेण्यासाठी अजित पवार पुण्यात होते. यावेळी बैठकीत लॉकडाउनवर चर्चा करण्यात आली. बैठकीनंतर प्रसारमाध्यमांशी बोलताना त्यांनी माहिती दिली आहे.
राज्यात तातडीने ‘पेडीयाट्रीक
टास्क फोर्स’ची निर्मिती
सप्टेंबर महिन्याच्या पहिल्या आठवडय़ात कोरोनाची तिसरी लाट येण्याची शक्यता तज्ज्ञांनी व्यक्त केली आहे. केंद्र सरकारच्या पातळीवर झालेल्या बैठकीतही या संदर्भात सूतोवाच झालेले आहेत. या पार्श्वभूमीवर राज्याची आरोग्य यंत्रणा सज्ज ठेवण्यासाठी राज्य सरकारकडून विविध उपाययोजना केल्या जात आहे. याबाबत आज आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी माध्यमांशी संवाद साधताना माहिती दिली. कोरोनाच्या तिसऱ्या लाटेच्या पार्श्वभूमीवर १८ वर्षांखालील मुलांच्या आरोग्याची काळजी घेण्यासाठी राज्यात तातडीने ‘पेडीयाट्रीक टास्क फोर्स’ची निर्मिती केली जाणार असल्याचं यावेळी टोपेंनी सांगितलं.
मराठा समाजाला आरक्षण
मिळालच पाहिजे : अजित पवार
मराठा समाजाला आरक्षण देण्याच्या निर्णयाचे समर्थन करणारी कोणतीही असामान्य परिस्थिती दिसत नसल्याने हे आरक्षण घटनाबाह्य असल्याचे न्यायालयाने स्पष्ट केले आहे. सर्वोच्च न्यायालयाचा या निकालावर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज पुण्यात माध्यमांना प्रतिक्रिया दिली. “सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय धक्कादायक आहे. गरज पडल्यास एकदिवसीय अधिवेशन बोलावू. कुठल्याही परिस्थितीत मराठा समाजाला आरक्षण मिळालच पाहिजे, अशाच प्रकारची महाविकास आघाडीची भूमिका आहे.” असं त्यांनी बोलून दाखवलं आहे.
निवडून दिलेल्या लोकप्रतिनिधींना
जाब विचारा : खासदार उदनराजे
मराठा समाजाला शिक्षण आणि नोकऱ्यांमध्ये आरक्षण देणारा महाराष्ट्र सरकारचा ‘सामाजिक व शैक्षणिक मागासवर्ग कायदा २०१८’ सर्वोच्च न्यायालयाच्या घटनापीठाने बुधवारी रद्दबातल ठरवला. ५० टक्क्यांची मर्यादा ओलांडून मराठा समाजाला आरक्षण देण्याच्या निर्णयाचे समर्थन करणारी कोणतीही असामान्य परिस्थिती दिसत नसल्याने हे आरक्षण घटनाबाह्य असल्याचे न्यायालयाने स्पष्ट केले आहे. न्यायालयाच्या निर्णयानंतर खासदार उदनराजे यांनी संतप्त प्रतिक्रिया दिली आहे. तसेच, निवडून दिलेल्या लोकप्रतिनिधींना अडवून जाब विचारा, असं त्यांनी आवाहन केलं आहे.
प्रधानमंत्री,आरोग्य मंत्री आपली
जबाबदारी नाकारत आहे : चिदंबरम
देशातली कोरोनाची परिस्थिती आता बिकट होत चालली असल्याचं सांगत काँग्रेसचे ज्येष्ठ नेते पी. चिदंबरम यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय आरोग्यमंत्री हर्ष वर्धन यांच्यावर आरोप केला आहे. हे दोघे त्यांची जबाबदारी नाकारत असल्याचं त्यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटलं आहे. चिदंबरम यांनी ट्विट करत सरकारवर टीका केली आहे. ते म्हणतात, “महामारीची परिस्थिती दिवसेंदिवस बिकट होत चालली आहे. करोना प्रतिबंधक लसींचा अपुरा पुरवठा हे एक कटू सत्य आहे. पण सरकार हे अजूनही नाकारत आहे. तामिळनाडूमध्ये ४५ वर्षांहून अधिक वयाच्या लोकांना पहिला डोसही मिळत नाहीये आणि दुसरा डोस घेणाऱ्यांची संख्या अत्यल्प आहे.”
केंद्रीय कर्मचाऱ्यांना लवकरच
तीन भागात महागाईभत्ता देणार
केंद्रीय कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे रोखण्यात आला आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाल्यानंतर जेव्हा कधी मार्ग मोकळा होईल तेव्हा महागाई भत्ता ३ भागात देण्यात येईल. त्यामुळे कर्मचाऱ्यांच्या पगारात भरघोस वाढ होणार आहे. परंतु कर्मचारी सध्या थकलेल्या पगाराबाबत हैराण आहेत. यातून मार्ग काढण्यासाठी कर्मचाऱ्यांच्या संघटना सरकारशी चर्चा करण्याचा प्रयत्न करत आहेत. जॉईंट कन्सल्टेटिव्ह मशिनरी फॉर सेंट्रल गव्हर्नमेंट संघटनेचे कर्मचारी केंद्रीय अर्थ मंत्रालयाच्या संपर्कात आहेत. या मुद्दयावरून ८ मे रोजी त्यांची चर्चा होणार होती. परंतु कोरोनामुळे बैठक पुढे ढकलण्यात आली.
संगमनेर मध्ये जमावाकडून
पोलिसांवर हल्ला
संगमनेर शहरात लोकांनी गर्दी केली होती. पोलिसांनी यावेळी गर्दी करण्यास मनाई केली असता जमावाने पोलिसांवरच दगडफेक करत हल्ला केला. जमावाकडून पोलिसांना मारहाण केली जात असल्याचा व्हिडीओ सध्या व्हायरल होत आहे. यामध्ये जमाव पोलीस कर्मचाऱ्याला मारहाण करताना दिसत आहे. इतकंच नाही तर पोलीस कर्मचारी जीव वाचवून धावत असताना त्याचा पाठलाग करताना दिसत आहेत.
कोरोना चाचणीचा वेग वाढणार;
रिलायन्सचा पुढाकार
रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेड (RIL) चे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक मुकेश अंबानी यांनी केंद्र सरकारकडे इस्रायली टीमला भारतात बोलावण्यासाठी विशेष परवानगी मागितलीय. ही इस्त्रायली टीम भारतात येऊन रॅपिड कोविड 19 आयडेंटिफिकेशन सोल्युशनची स्थापना करेल. यामुळे देशात कोरोना चाचणी सोपी आणि वेगवान होईल. तसेच कंपनी यासाठी लोकांना प्रशिक्षणही देईल. रिलायन्स इंडस्ट्रीजने इस्त्रायली स्टार्टअप कंपनी ब्रॅथ ऑफ हेल्थ (BoH) कडून 1.5 कोटी डॉलर्समध्ये हे सोल्युशन खरेदी केलंय.
कीर्तनकार इंदोरीकर यांना
औरंगाबाद खंडपीठाची नोटीस
प्रसिद्ध कीर्तनकार निवृत्तीनाथ इंदोरीकर यांना मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाने नोटीस बजावली आहे. स्त्री भ्रूण हत्या विरोधी (पीसीपीएनडीटी) कायद्यानुसार अंधश्रद्धा निर्मुलन समितीने याचिका दाखल केली आहे. त्याची दखल घेत न्यायालयाने नोटीस बजावल्याचे अंनिसने सांगितले आहे. महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मुलन समितीचे कार्याध्यक्ष अविनाश पाटील आणि संघटनेच्या बुवाबाजी विरोधी संघर्ष विभागाच्या कार्यवाह अॅड रंजना पगार – गवांदे यांनी दिलेल्या माहितीनुसार, निवृत्ती देशमुख इंदोरीकर (किर्तनकार) यांनी, “सम तिथीला स्त्रीसंग केला तर मुलगा होतो, विषम तिथीला स्त्रीसंग केला तर मुलगी होते” असे वक्तव्य आपल्या किर्तनातून केले होते.
घरातच विलगीकरण
मार्गदर्शक सूचना जारी
कोरोनाच्या सौम्य संसर्गामुळे घरातच विलगीकरणामध्ये राहणाऱ्या रुग्णांसाठी, तसेच १० दिवसांपासून घरातच क्वॉरंटाईन असलेल्या आणि सलग दोन, तीन दिवस ताप आलेल्या रुग्णांकरिता सुधारित मार्गदर्शक सूचना केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने जारी केल्या आहेत. या सूचनांमध्ये असे म्हटले आहे की, सौम्य किंवा लक्षणे नसलेल्या रुग्णांच्या प्रकरणाचा निर्णय आरोग्य अधिकारी यांनी घ्यावा. अशा परिस्थितीत, रुग्णाला स्वत:च्या घरी वेगळे ठेवण्याची व्यवस्था केली पाहिजे.
मायक्रोसॉफ्टचे संस्थापक
बिल गेट्स यांचा घटस्फोट
प्रसिद्ध उद्योजक आणि मायक्रोसॉफ्टचे संस्थापक बिल गेट्स आणि त्यांची पत्नी मेलिंडा गेट्स यांनी घटस्फोट घेतलाय. याबाबत त्यांनी संयुक्त पत्रक जारी करत दोघांची भूमिका स्पष्ट केलीय. यात त्यांनी मागील 27 वर्षे सोबत प्रवास केला. आता वेगळे होत असल्याचं सांगितलं. बिल गेटस यांनी त्यांच्या मालकीची कॅस्केड इनव्हेस्टमेंटस कंपनी आणि मेक्सिकोमधील दोन कंपन्या मेलिंडा गेटस यांच्या नावावर 15 हजार कोटींची संपत्ती मेलिंडा गेटस यांच्या नावावर केली आहे.
शिल्पा शेट्टीचे संपूर्ण
कुटुंब कोरोना पॉझिटिव्ह
बॉलिवूड अभिनेत्री शिल्पा शेट्टीच्या संपूर्ण कुटुंबाला करोना झाल्याची बातमी समोर आली आहे. सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत तिने ही माहिती दिली आहे. शिल्पाने तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरून पोस्ट करत ही माहिती दिली आहे. “मागील १० दिवस आमच्या कुटुंबासाठी खूप कठीण होते. माझ्या सासु-सासऱ्यांची कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आली. त्यानंतर समिषा, विहान, माझी आई आणि आता राज यांची कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आली आहे.
शिल्पा शेट्टीचे संपूर्ण
कुटुंब कोरोना पॉझिटिव्ह
रशियातील आरोग्य अधिकाऱ्यांनी स्फुटनिक व्ही कोरोना लसीच्या सिंगल डोस व्हर्जन स्फुटनिक लाईटच्या वापराला मंजुरी देण्यात आली आहे. स्फुटनिकच्या निर्मात्यांनी याबाबत गुरुवारी माहिती दिली आहे. रशियन डायरेक्ट इन्व्हेस्टमंट फंड (RDIF)ने लसीच्या निर्मितीसाठी आर्थिक मदत केली होती. आरडीआयएफने केलेल्या वक्तव्यानुसार स्फुटनिक लाईट ही लस 79.4 टक्के परिणामकारक आहे. तर स्फुटनिक व्ही या लसीचे दोन डोस 91.6 टक्के परिणामकारक होते.
डायनासोरच्या आकारातील दगड
मंगळ ग्रहावर सापडला
नासाची मंगळ ग्रहावर संशोधन मोहीम सुरु आहे. मंगळ ग्रहावरील जीवसृष्टीचं संशोधन करणाऱ्या नासाचा रोवर महत्वाची माहिती नासाकडे पाठवत आहे. नासाच्या रोव्हरकडून मंगळ ग्रहावरील छायचित्र पाठवली जातात. मगंळ ग्रहावरील डायनासोरच्या आकारातील दगडाचा फोटो नुकताच नासामध्ये काम करणाऱ्या केविन गिल यांनी शेअर केला आहे. केविन गिल यांच्यासह जेसोन मेजर यांनी देखील काही फोटो शेअर केले आहेत.
मराठा आरक्षण अजूनही
दरवाजा खुला : अशोक चव्हाण
मराठा आरक्षण मंत्रिमंडळ उपसमितीचे अध्यक्ष अशोक चव्हाण यांनी पत्रकार परिषद घेतली. मराठा आरक्षणाविषयी सुप्रीम कोर्टानं घेतलेल्या निर्णयाविषयी त्यांनी माहिती दिली. सुप्रीम कोर्टाचा निकाल साडे पाचशे पानांचा आहे. कोर्टाचा निर्णय पाहता आपल्याकडे आजूनही दरवाजा खुला आहे. केंद्र सरकारच्या मागास आयोगाकडे आपल्याकडे कागदपत्रं सोपवता येतील. त्यानंतर केंद्र सरकार, राष्ट्रपती आणि राष्ट्रीय मागास आयोग यांच्याकडून मराठा आरक्षणाचा मुद्दा मार्गी लावला जाऊ शकतो, असे चव्हाण म्हणाले.
मराठा आरक्षण
16 मे पासून मोर्चा
सर्वोच्च न्यायालयाने मराठा आरक्षण रद्द केल्यानंतर आता मराठा समाज आक्रमक झाला आहे. मराठा समाजाने पुन्हा मोर्चे काढण्याचा निर्धार केला आहे. बीडमध्ये आज मराठा आरक्षण संदर्भातील बैठक झाली. या बैठकीत लॉकडाऊन संपल्यावर 16 मे पासून मोर्चा काढण्यावर एकमत झालं. बीडमधून पहिला मोर्चा काढला जाणार आहे. उद्या जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यात येणार आहे. हे मोर्चे राज्यभरात काढण्यात येतील, अशी माहिती शिवसंग्रामचे नेते विनायक मेटे यांनी दिली.
भाजपच्या आणखी एका आमदाराचा
कोरोना व्हायरसने मृत्यू
देशभर उद्रेक घालणाऱ्या कोरोना व्हायरसने उत्तर प्रदेशात उच्छाद मांडल्याचं चित्र आहे. कारण उत्तर प्रदेशात कोरोनामुळे होणाऱ्या मृत्यूचं प्रमाण प्रचंड वाढलं आहे. धक्कादायक म्हणजे आतापर्यंत तब्बल चार आमदारांचा कोरोनाने मृत्यू झाला आहे. माजी मंत्री आणि भाजपचे विद्यमान आमदार दाल बहादूर कोरी यांचं कोव्हिड 19 ने निधन झालं आहे.
आयपीएलचे उर्वरित
सामने इंग्लंडमध्ये खेळणार
इंडियन प्रीमियर लीगचा (आयपीएल) १४ सीजन स्थगित केल्यानंतर उर्वरित सामने कधी आणि कुठे खळविले जाणार आहेत, हाच प्रश्न प्रत्येकाच्या मनात उपस्थित होत आहे. स्पर्धेचे आयोजन पुन्हा भारतात केले जाईल की भारताबाहेर एखाद्या देशात आयोजन होऊ शकते. या पार्श्वभूमीवर आयपीएलचे उर्वरित सामने इंग्लंमध्ये खेळविले जाऊ शकतात. आयपीएलचे उर्वरित ३१ सामने खेळविण्यासाठी इंग्लडकडे प्रस्ताव दिल्याची माहिती मिळाली आहे. भारतात २९ सामने झाल्यानंतर स्पर्धेत कोरोनाचा शिरकाव झाला होता. त्यामुळे स्पर्धा स्थगित करण्याचा निर्णय घेण्यात आला.
धोनीच्या घरी एका खास
पाहुण्याचे आगमन
भारतीय क्रिकेट संघाचा माजी कप्तान महेंद्रसिंग धोनीच्या घरी एका खास पाहुण्याचे आगमन झाले आहे. माहीची पत्नी साक्षी हिनेच याबाबत माहिती दिली आहे. या नव्या पाहुण्याचे नाव चेतक आहे. आणि माहीच्या परिवारातील लिलीशी त्याची खास दोस्ती झाली आहे. साक्षीने याचा व्हिडीओ शेअर केला आहे. लिली म्हणजे माहीची कुत्री तर चेतक म्हणजे एक घोडा आहे.
ज्येष्ठ सतारवादक पं. देबू चौधरी
यांच्या मुलाचे कोरोनामुळे निधन
काही दिवसांपूर्वी ज्येष्ठ सतारवादक पं. देबू चौधरी यांचे कोरोनामुळे निधन झाले. त्यांच्या पाठोपाठ आता त्यांचा मुलगा प्रतीक चौधरी यांचे देखील कोरोनामुळे निधन झाले आहे. काल दिल्लीमधील एका रुग्णालयात त्यांनी अखेरचा श्वास घेतला. त्यांच्या निधनानंतर संगीत क्षेत्रात हळहळ व्यक्त केली जात आहे.
विश्वचषक तिरंदाजी स्पर्धेला
भारतीय खेळाडू मुकणार
स्वित्झर्लंड दूतावासाने व्हिसा नाकारल्यामुळे भारताचे ऑलिम्पिकसाठी पात्र ठरलेले तिरंदाज लुसान येथे रंगणाऱ्या विश्वचषक तिरंदाजी स्पर्धेच्या दुसऱ्या टप्प्याला मुकणार आहेत. भारत सध्या कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा सामना करत असून अनेक देशांनी प्रवासाच्या बाबतीत भारतावर र्निबध आणले आहेत. आता भारतीय तिरंदाज पॅरिस येथे २३ जूनपासून रंगणाऱ्या विश्वचषकाच्या तिसऱ्या टप्प्यात सहभागी होऊ शकतील. टोक्यो ऑलिम्पिक पात्रतेसाठी भारतीय महिला रिकव्र्ह संघाला ही शेवटची संधी असेल.
SD social media
9850 60 3590