रशियातील आरोग्य अधिकाऱ्यांनी स्फुटनिक व्ही कोरोना लसीच्या सिंगल डोस व्हर्जन स्फुटनिक लाईटच्या वापराला मंजुरी देण्यात आली आहे. स्फुटनिकच्या निर्मात्यांनी याबाबत गुरुवारी माहिती दिली आहे. रशियन डायरेक्ट इन्व्हेस्टमंट फंड (RDIF)ने लसीच्या निर्मितीसाठी आर्थिक मदत केली होती. आरडीआयएफने केलेल्या वक्तव्यानुसार स्फुटनिक लाईट ही लस 79.4 टक्के परिणामकारक आहे. तर स्फुटनिक व्ही या लसीचे दोन डोस 91.6 टक्के परिणामकारक होते.
स्फुटनिकच्या ट्विटर हँडलवर सांगण्यात आलं आहे की, स्फुटनिक लाईटच्या वापरामुळे लसीकरण वेगाने करता येईल. यामुळे कोरोना महामारीवर काहीसं नियंत्रण मिळवता येईल. दरम्यान स्फुटनिक व्ही हीच मुख्य लस असेल. मात्र, स्फुटनिक लाईट या लसीचेही स्वत:ची वैशिष्ट्ये आहेत. कंपनीने दिलेल्या माहितीनुसार स्फुटनिक व्हीला आधीच 64 देशांमध्ये मंजुरी देण्यात आली आहे, ज्या देशांची एकूण संख्या 3.2 बिलियन पेक्षाही अधिक आहे.
स्फुटनिक लाईट ही लस कोरोना महामारीविरोधात लढण्यास प्रभावी आणि विश्वसनीय व्हॅक्सिन आहे. या लसीच्या सहाय्याने वेगाने सुरक्षा मिळवली जाऊ शकते. या लसीच्या माध्यमातून कोरोना विषाणूला हरवण्यास मदत होईल आणि मोठ्या समुहाचं संरक्षण होईल. या लसीचा प्रभाव जाणून घेण्यासाठी तिचा वापर रशियातील लसीकरण मोहिमेदरम्यान 5 डिसेंबर 2020 ते 15 एप्रिल 2021 मध्ये करण्यात आला. लोकांना लस दिल्यानंतर 28 दिवसांनी त्याची माहिती गोळा करण्यात आली.