सुप्रीम कोर्टाकडून
मराठा आरक्षण रद्द
सुप्रीम कोर्टाने मराठा आरक्षण रद्द केलं आहे. राज्य सरकारने बनवलेला मराठा आरक्षण कायदा सुप्रीम कोर्टाने रद्द केला आहे. यामुळे महाराष्ट्र सरकारला खूप मोठा धक्का बसला आहे. मराठा आरक्षणाच्या वैधतेला सर्वोच्च न्यायालयात आव्हान देण्यात आले होते. या प्रकरणी न्यायमूर्ती अशोक भूषण, नागेश्वर राव, एस. अब्दुल नाझीऱ, हेमंत गुप्ता आणि रवींद्र भट यांच्या खंडपीठाने आज निकाल सुनावला आहे.
लढवय्या समाजाचे
दुर्देवच : मुख्यमंत्री
महाराष्ट्र कोरोना विरोधीतील शर्थीची लढाई लढत असताना सर्वोच्च न्यायालयाने मराठा आरक्षणाचा राज्य सरकारने घेतलेला निर्णय फेटाळण्याचा निकाल दिला, हे महाराष्ट्रातील शेतकरी, कष्टकरी व लढवय्या समाजाचे दुर्देवच म्हणायला हवे अशी प्रतिक्रिया राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिली आहे. छत्रपती संभाजीराजे हे गेल्या वर्षभरापासून मराठा आरक्षणाबाबत पंतप्रधानांची वेळ मागत आहेत, त्यांना पंतप्रधानांनी का वेळ दिली नाही ? अशी विचारणाही उद्धव ठाकरेंनी यावेळी केली.
मराठा समाजाच्या दृष्टीने अत्यंत
दुर्दैवी : छत्रपती संभाजीराजे भोसले
सुप्रीम कोर्टाने मराठा आरक्षण रद्द केल्यानंतर खासदार छत्रपती संभाजीराजे भोसले यांनी नाराजी जाहीर केली आहे. सुप्रीम कोर्टाने निकाल सुनावताना मुंबई हायकोर्टाने दिलेला निर्णय आणि मागास आयोगाचा रिपोर्ट याच्यातून आम्हाला मराठा आरक्षण देणं गरजेचं आहे हे स्पष्ट होत नसल्याचं सांगितलं. तसंच इंद्रा सहानी खटल्याबाबत पुन्हा एकदा तपासणी करण्याची गरज वाटत नसल्याचा उल्लेख करत मराठा आरक्षण रद्द करत असल्याचा निर्णय दिला. संभाजीराजेंनी पत्रकार परिषदेत बोलताना समाजाच्या दृष्टीने अत्यंत दुर्दैवी असल्याचं म्हटलं आहे.
सुप्रीम कोर्टाच्या निर्णयाचं
स्वागत : गुणरत्न सदावर्ते
सुप्रीम कोर्टाने मराठा आरक्षण रद्द करण्याचा निर्णय जाहीर केल्यानंतर राज्य सरकारला मोठा धक्का बसला आहे. राज्य सरकारकडून निर्णयाविरोधात नाराजी व्यक्त करण्यात आलेली असून विरोधकांनीही सरकारवर जोरदार टीका आहे. राज्य सरकारमध्ये समन्वयाचा अभाव असल्याची टीका विरोधक करत आहे. दरम्यान याचिकाकर्ते गुणरत्न सदावर्ते यांनी सुप्रीम कोर्टाच्या निर्णयाचं स्वागत केलं असून हत्या झाली तरी खुल्या गुणवंतांसाठीची लढाई सुरु राहील असं म्हटलं आहे.
दुसऱ्या लाटेत नव्या विषाणूच्या
तीव्रतेमुळे चिंतेत वाढ
एकीकडे देशातील शास्त्रज्ञ कोरानाच्या डबल व्हेरिएंट बी 1617 चा ब्रेक शोधण्याचा प्रयत्न करीत आहेत. त्याचवेळी दुसरीकडे आणखी एक नवीन प्रकार आढळला असून दहापट अधिक संसर्गजन्य आहे. हैदराबाद आणि गाझियाबादच्या संशोधकांच्या पथकाला हा नवीन प्रकार सापडला असून त्याला ” ‘एन 440 के ‘ असे नाव देण्यात आले आहे. करोनाच्या दुसऱ्या लाटेत या विषाणूच्या तीव्रतेमुळे चिंतेत वाढ झाली आहे. हा करोना व्हेरियंट आंध्र प्रदेशमध्ये आढळून आला आहे.
सीरम ब्रिटनमध्ये करणार
अडीच हजार कोटी गुंतवणूक
भारत आणि ब्रिटनदरम्यान सुरु होणाऱ्या द्विपक्षीय शिखर संम्मेलनाआधीच ब्रिटनचे पंतप्रधान बोरिस जॉनसन यांनी भारतीय कंपन्या ब्रिटनमध्ये एक अब्ज पौंडची गुंतवणूक करणार असल्याची घोषणा केली. ब्रिटनमध्ये गुंतवणूक करणाऱ्या कंपन्यांमध्ये सीरम इन्स्टिटयूट ऑफ इंडियाचाही समावेश आहे. ब्रिटनमध्ये गुंतवणूक करणाऱ्या कंपन्यांमधील सर्वाधिक गुंतवणूक सीरमच्या माध्यमातून केली जाणार आहे. सीरमने ब्रिटनमध्ये २४ कोटी पौंड म्हणजेच जवळजवळ अडीच हजार कोटी रुपये गुंतवण्याचा करार केलाय.
पुण्यात गुंडाने चिरला
सहाय्यक फौजदाराचा गळा
तडीपार गुंडाने सहाय्यक फौजदाराचा खून केल्याची धक्कादायक घटना पुण्यात घडली आहे. तडीपार गुंड प्रवीण महाजनकडून फरासखाना पोलीस ठाण्यातील सहाय्यक फौजदार समीर सय्यद यांची हत्या केली. बुधवार पेठेतील श्रीकृष्ण टॉकीजवळ हे हत्याकांड झालं. मध्यरात्री 1 च्या सुमारास घडलेल्या या थरारक घटनेनंतर गुंड प्रवीण महाजनला पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. गुंडाने चक्क पोलीस अधिकाऱ्याची हत्या केल्याने पुणे शहर हादरुन गेलं आहे.
लॉकडाउन ऐवजी सध्या समस्यांचे
निराकरण करण्यावर भर
सर्वोच्च न्यायालय, औद्योगिक संघटना आणि काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी लॉकडाउन लावण्याची मागणी केली होती. मात्र ही मागणी तर्कविसंगत असल्याचे सरकारी सूत्रांचे म्हणणे आहे. गेल्या वर्षी लावलेल्य लॉकडाउनविरोधात अनेकांनी टीका केली होती. त्यावेळी लॉकडाउन आवश्यक होता, कारण कोरोना विषाणूबाबत लोक अनभिज्ञ होते. कोरोनावरील उपचाराबाबत लोकांमध्ये संभ्रम होता. सध्या ऑक्सिजन आणि बेड उपलब्ध करून देण्याची गरज आहे आणि त्या समस्येचे निराकरण करणे सुरू आहे. या गोष्टींचा पुरवठा करण्याचा आणि लॉकडाउन लावण्याचा काहीही संबंध नाही, असे सरकारी सूत्रांचे म्हणणे आहे.
ममता बॅनर्जी तिसऱ्यांदा
मुख्यमंत्रीपदी
ममता बॅनर्जी यांनी पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. मुख्यमंत्रीपदी विराजमान होण्याचं हे सलग त्यांचं तिसरं वर्ष आहे. विधानसभा निवडणुकीत तृणमूल कांग्रेसने दणदणीत विजय मिळवला. कोरोना प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर हा शपथविधी सोहळा मर्यादित लोकांच्या उपस्थितीत पार पडला .
वैद्यकीय महाविद्यालय, रुग्णालयाचे
राष्ट्रीय सुरक्षा परिषदेमार्फत परीक्षण
राज्यातील सर्व २२ शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयाचे राष्ट्रीय सुरक्षा परिषदेमार्फत सुरक्षा परीक्षण करण्यात येणार असल्याची माहिती वैद्यकीय शिक्षण मंत्री अमित देशमुख यांनी दिली. वैद्यकीय शिक्षण मंत्री देशमुख म्हणाले की, सुरक्षा परिक्षणाची कार्यवाही तात्काळ सुरु होत आहे. या सुरक्षा परिक्षणासाठी साधारणपणे ३७ लाख २२ हजार २८० रुपये खर्च होणार आहे. हे सुरक्षा परीक्षण रुग्णालयीन सुधारणा, रुग्णहित, विद्यार्थी, मनुष्यबळ सुरक्षा आवश्यक असल्याने करण्यात येत असल्याची माहिती वैद्यकीय शिक्षण मंत्री श्री देशमुख यांनी दिली.
आयुष डॉक्टर करणार
कोविड रुग्णांवर उपचार
वैद्यकीय शिक्षण मंत्री अमित देशमुख म्हणाले की, गेल्या जवळपास वर्षभरापासून अधिक काळ कोविड संकटाशी आपण सामना करत असून अजूनही रुग्णसंख्या आटोक्यात आलेली नाही. वाढत्या कोविड रुग्णांवर उपचारासाठी डॉक्टर्स कमी पडत आहेत हे लक्षात घेऊन या कामी राज्यात सध्या उपलब्ध असलेल्या अडीच लाख आयुष डॉक्टरांचा उपयोग चांगल्या पद्धतीने कसा करून घेता येईल याबाबत विचार करण्यात यावा अशी सूचनाही त्यांनी केली.
अभिनेत्री दीपिका पदुकोणला
कोरोनाचा संसर्ग
अभिनेत्री दीपिका पदुकोणचीही कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आली आहे. दीपिकाचे वडील प्रकाश पदुकोण यांनाही कोरोनाची लागण झाली आहे. त्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलंय. त्यानंतर आता दीपिकाचीही कोरोना चाचणी करण्यात आली. या चाचणीचा अहवाल प्राप्त झाल्यानंतर दीपिकालाही कोरोनाची लागण झाल्याचं समोर आलंय.
‘रश्मि रॉकेट’चा एडिटर
अजय शर्माचे करोनामुळे निधन
बॉलिवूड अभिनेत्री तापसी पन्नूचा आगामी चित्रपट ‘रश्मि रॉकेट’चा एडिटर अजय शर्माचे करोनामुळे निधन झाले आहे. ४ मे रोजी त्याने अखेरचा श्वास घेतला. अजयच्या निधनानंतर चित्रपटसृष्टीमध्ये हळहळ व्यक्त केली जात आहे. अनेक कलाकार सोशल मीडिया पोस्टद्वारे त्याला श्रद्धांजली वाहताना दिसत आहेत.
धरणात मुबलक साठा
यंदा पाणीटंचाई दूरच
राज्यातील जनतेसाठी आनंदाची बातमी आहे सध्या राज्यातील धरणांमध्ये 47.72 टक्के पाणीसाठा असल्याने आहे. त्यामुळे मे महिन्याच्या उकाड्यातही यंदा बहुतांश भागातील जनतेला पाणीटंचाईचा सामना करावा लागणार नाही. नागपूर, अमरावती, औरंगाबाद आणि कोकण विभागातील लघू, मध्यम आणि मोठ्या अशा एकूण धरणांमध्ये सरासरी 50 टक्क्यापेक्षा जास्त पाणीसाठा आहे.
एकाच वेळी महिलेने दिला
नऊ बाळांना जन्म
आफ्रिका खंडातील माली या छोट्याश्या देशातील एका महिलेने एकाच वेळी नऊ बाळांना जन्म दिला आहे. मोरक्को येथील रुग्णालयामध्ये या महिलेने एकाच वेळी नऊ बाळांना जन्म दिला असून सर्व बाळांची प्रकृती ठणठणीत असल्याचं माली सरकारने सांगितलं आहे. मात्र एकाच वेळी या महिलेने नऊ बाळांना जन्म कसा दिला यासंदर्भातील संशोधन आणि इतर माहिती अद्याप सरकारने गोळा केलेली नाही. मालीच्या आरोग्य मंत्र्यांनी दिलेल्या माहितीमध्ये या महिलेने पाच मुली आणि चार मुलांना जन्म दिला असून सिझेरियन पद्धतीने या महिलेची प्रसुती करण्यात आल्याचं सांगितलं आहे.
दुबईमध्ये टी-ट्वेंटी विश्वचषक स्पर्धेचे
आयोजन जवळपास निश्चित
आयपीएल अर्थात इंडियन प्रीमियर लीग अनिश्चितकाळासाठी स्थगित करण्याबाबत भारतीय क्रिकेट नियामक मंडळाच्या (बीसीसीआय) पदाधिकार्यांमध्ये मतभेद होते. एका आठवड्याचा ब्रेक घेऊन स्पर्धा पुन्हा सुरू करावी, असे मत ऑनलाइन बैठकीत अनेक पदाधिकार्यांचे होते. परंतु स्पर्धेला अनिश्चित काळासाठी स्थगित करावे यावर सचिव जय शाह अडलेले होते. आता ऑक्टोबर नोव्हेंबरमध्ये टी-ट्वेंटी विश्वचषक स्पर्धा भारतात आयोजित करण्यावर याचा विपरित परिणाम होणार आहे. त्यामुळे बीसीसीआयकडूनच दुबईमध्ये टी-ट्वेंटी विश्वचषक स्पर्धेचे आयोजन होणे जवळपास निश्चित झाले आहे.
SD social media
9850 60 3590