नुकतंच बागेश्वर धाममधील आचार्य धीरेंद्र शास्त्री आपल्या चमत्कारामुळे देशभर चर्चेत आले आहेत. यानंतर आता छत्तीसगढमधील आचार्य नरेंद्र नयन शास्त्रीही चर्चेत आले आहेत. ज्यांना चाय-चावलवाले बाबा म्हणूनही ओळखलं जातं. जे फक्त चहापाणी पिऊन आयुष्य जगत आहेत. आणि तांदळावरून लोकांचं भूत आणि भविष्य सांगत असल्याचा दावा केला जातो आहे.
आचार्य नरेंद्र नयनशास्त्री सध्या सक्ती जिल्ह्यात आहेत. त्यांच्याजवळ दूरदूरहून लोक आपलं भविष्य जाणून घेण्यासाठी येतात. जे लोक त्यांच्याजवळ येतात ते आपल्या घरातील मूठभर तांदूळ आणि लाल रंगाचं मदारचं फूल घेऊन येतात. तांदूळ आणि फूल यावरूनच नरेंद्र त्यांना त्यांचं नाव, जन्मतिथी आणि त्यांच्या आयुष्यात असलेल्या समस्या सांगतात. त्यांचा भूतकाळ आणि भविष्यकाळ सांगतात आणि त्यांच्या आयुष्यात असलेल्या समस्यांवर उपायही देतात.
त्यांनी 18 वर्षांपूर्वी अन्नत्याग केला. तेव्हापासून ते फक्त चहा आणि पाणी पितात. चहा-पाण्यावरच ते जगत आहेत. याबाबत बोलताना त्यांनी सांगितलं की हा निर्णय त्यांनी हठधर्मितामुळे घेतला आहे. त्यांचं कुटुंब गरीब होतं. त्यांची आई दुसऱ्यांच्या शेतात काम करायची. नरेंद्र यांना तिने शिक्षणासाठी वाराणसीला पाठवलं आणि ती त्यांना तिथं पैसे पाठवायची. आर्थिक स्थिती पाहून त्यांनी अन्नत्याग केला. फक्त पाणी आणि चहा पिऊन जीवन जगण्याचा निश्चय केला. कित्येक वर्षांनी त्यांनी हा निश्चय कायम ठेवला.
ते जिथं जातात तिथं त्यांना पैसे आणि काही वस्तू मिळतात. पण आपण यापैकी काहीच आपल्याकडे ठेवत नसल्याचं किंवा आपल्यासोबत घेऊन जात नसल्याचं ते सांगतात. पूजा-पाठसाठी ज्या वस्तू, पैसे मिळतात ते त्याच गावातील निर्धन मुलींना दान केलं जातं. आतापर्यंत 281 तरुणींच्या लग्नात त्यांनी मदतही केली आहे.
सामान्य नागरिकांसह बडेबडे नेतेही त्यांच्याकडे आपलं राजकीय भविष्य पाहण्यासाठी येतात. आतापर्यंत निवडणुकीबाबत जी भविष्यवाणी केली ती खरी ठरल्याचा दावा नरेंद्र यांनी केला आहे. पण कोणते राजकीय नेते त्यांचे भक्त आहेत हे मात्र त्यांनी सांगितलं नाही.
आचार्य धीरेंद्र शास्त्री यांच्या चमत्काराबाबत त्यांनी बोलणं टाळलं. पण ते हिंदुत्व वाढीसाठी जे कार्य करत आहेत, त्याचं आपण समर्थन करतो, असं ते म्हणाले.