तालिबानच्या एका निर्णयाविरोधात क्रिकेट ऑस्ट्रेलियाने नाराजी व्यक्त करत एकदिवसीय मालिका खेळण्यास नकार दिला आहे. ऑस्ट्रेलियाच्या भारत दौऱ्यानंतर युएईमध्ये अफगाणिस्तानविरुद्ध तीन सामन्यांची एकदिवसीय मालिका खेळणार होती. क्रिकेट ऑस्ट्रेलियाने त्यांच्या सरकारसोबत झालेल्या चर्चेनंतर न खेळण्याचा निर्णय घेतला आहे. ऑस्ट्रेलिया आणि अफगाणिस्तान यांच्यातील ही मालिका वनडे वर्ल्ड कप सुपर लीगचा भाग होती. मात्र तालिबानच्या काही निर्णयामुळे क्रिकेट ऑस्ट्रेलियाने या मालिकेत सहभागी न होण्याचा निर्णय घेतला आहे. तालिबानने घोषणा केली होती की, मुलींसाठी विद्यापीठात शिक्षणावर बंदी घातली जाणार आहे.
अफगाणिस्तानमध्ये सध्या तालिबानची सत्ता आहे. त्यांनी आपल्या कार्यकाळात अनेक प्रकारची बंदी घातली आहे. मुलींना घराबाहेर काम करण्याचाही अधिकार नाही, तसंच त्यांना खेळातही भाग घेऊ दिला जात नाहीय. तालिबानच्या या निर्णयाचा कठोर विरोध करत क्रिकेट ऑस्ट्रेलियाने न खेळण्याचा निर्णय घेतला आहे.
क्रिकेट ऑस्ट्रेलियाने म्हटलं की, क्रिकेट ऑस्ट्रेलिया हे अफगाणिस्तानसह जगभरात महिला आणि पुरुषांना क्रिकेटमध्ये आणण्यासाठी आणि त्यांच्या विकासासाठी कटिबद्ध आहे. तसंच अफगाणिस्तान क्रिकेट बोर्डासोबत त्यांच्या देशातील महिला आणि मुलींची स्थिती चांगली बनवण्यासाठी सातत्याने त्यांच्या संपर्कात आहोत.
क्रिकेट ऑस्ट्रेलियाने त्यांच्या सरकारचे आभार मानले आहेत. आमच्या या निर्णयाला पाठिंबा दिल्याबद्दल आभार असं क्रिकेट ऑस्ट्रेलियाने म्हटलं आहे. ऑस्ट्रेलियाने दुसऱ्यांदा अफगाणिस्तानविरुद्ध क्रिकेट खेळण्यास नकार दिलाय. तीन सामन्यांच्या एकदिवसीय मालिकेआधी ऑस्ट्रेलियाने नोव्हेंबर २०२१ मध्ये एकमेव कसोटी सामना खेळण्यास नकार दिला होता.