इंग्लंडविरुद्ध गुरुवारी उपांत्य फेरीत झालेल्या पराभवामुळे भारतीय संघाचे दुसऱ्यांदा ट्वेन्टी-२० विश्वचषक जिंकण्याचे स्वप्न अधुरेच राहिले. त्यानंतर भारताच्या ट्वेन्टी-२० संघात मोठे बदल करण्याची, काही वरिष्ठ खेळाडूंना संघाबाहेर करण्याची मागणी केली जाते आहे. मात्र, कर्णधार रोहित शर्मा, तारांकित फलंदाज विराट कोहली आणि प्रशिक्षक राहुल द्रविड यांच्याशी चर्चा केल्यानंतरच भविष्याच्या दृष्टीने पावले उचलण्याची भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (बीसीसीआय) भूमिका घेतली आहे.
‘‘रोहित, कोहली आणि द्रविड ऑस्ट्रेलियाहून मायदेशी परतल्यानंतर आमच्यात बैठक होईल. त्यांच्याशी चर्चा केल्यानंतरच ट्वेन्टी-२० संघाच्या भविष्याची दिशा ठरवली जाईल. आम्ही निर्णय घेण्यासाठी घाई करणार नाही. संघ व्यवस्थापन आणि खेळाडूंनी त्यांचे विचार मांडल्यावरच ‘बीसीसीआय’ पुढील निर्णय घेईल,’’ असे एका अधिकाऱ्याकडून सांगण्यात आले.
ट्वेन्टी-२० विश्वचषकाच्या भारतीय संघात रोहित (वय ३५ वर्षे) व कोहली (३३) यांच्यासह दिनेश कार्तिक (३७), रविचंद्रन अश्विन (३६), सूर्यकुमार यादव (३२) आणि भुवनेश्वर कुमार (३२) या तिशीतील खेळाडूंचा समावेश होता. पुढील ट्वेन्टी-२० विश्वचषक स्पर्धा २०२४ साली होणार असून यापैकी काही खेळाडू तोपर्यंत क्रिकेटमधून निवृत्ती स्वीकारू शकतील. त्यामुळे भविष्याच्या दृष्टीने संघबांधणी करण्याचे आता संघ व्यवस्थापन आणि निवड समितीपुढे आव्हान आहे. भारताला ‘आयसीसी’ची स्पर्धा जिंकण्यात पुन्हा अपयश आल्यामुळे आता काही मोठे निर्णय घेतले जाऊ शकतील. याचाच भाग म्हणून हार्दिक पंडय़ाला नेतृत्वाच्या जबाबदारीसाठी तयार केले जाते आहे.