बच्चू कडूंनी दिला स्वबळावर लढण्याचा नारा
शिंदे सरकारच्या मंत्रिमंडळामध्ये स्थान न मिळाल्यामुळे नाराज झालेले प्रहार संघटनेचे नेते आणि माजी राज्य मंत्री बच्चू कडू यांनी आता एकला चलो रे चा नारा दिला आहे. आगामी निवडणुकीत सोबत घेतले तर सोबत, नाहीतर एकट्याने लढणार, असा पवित्रा कडूंनी घेतला.प्रहार संघटनेचे नेते बच्चू कडू आज उस्मानाबाद जिल्ह्यात कोर्टाच्या तारखेसाठी आले होते. यावेळी पत्रकारांशी बोलत असताना बच्चू कडू यांनी स्वबळाचा नारा दिला. तसंच, मंत्रिमंडळाच्या विस्तारात स्थान न मिळाल्यामुळे नाराजीही बोलून दाखवली.
संजय राऊतांना दिलासा नाहीच, यंदा दिवाळी जेलमध्येच !
पत्राचाळ गैरव्यवहार प्रकरणात शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांची दिवाळी ही जेलमध्येच जाणार आहे. न्यायालयाने संजय राऊत यांच्या कोठडीमध्ये पुन्हा एकदा वाढ केली आहे. त्यामुळे राऊत यांना यंदाची दिवाळी ही जेलमध्येच साजरी करावी लागणार आहे. या प्रकरणाची पुढील सुनावणी 2 नोव्हेंबरला होणार आहे.गोरेगाव येथील पत्राचाळ घोटाळा प्रकरणात संजय राऊत यांना ईडीने जून महिन्यात अटक केली होती. त्यानंतर राऊत यांना कोर्टाने न्यायालयीन कोठडी सुनावली होती. राऊत यांचा मुक्काम हा आर्थर रोड कारागृहामध्ये हलवण्यात आला. आज राऊत यांना पुन्हा एकदा PMLA न्यायालयात हजर केले होते. राऊत यांचा जामीन अर्ज आणि नियमित सुनावणी एकाचवेळी सुरू झाली.
राष्ट्रवादीच्या रोहित पाटलांना तगडा झटका, नगरसेवक फुटल्याने सत्ता संपुष्टात
मागच्या दहा महिन्यापूर्वी माजी उपमुख्यमंत्री दिवंगत नेते आर. आर. पाटील यांचा चिरंजीव रोहीत पाटील यांनी कवटेमहांकाळ नगरपरिषदेत सत्ता काबीज केली होती. खासदार संजय काका पाटील यांना रोहीत पाटील यांनी चांगलाच दणका दिला होता. परंतु अवघ्या 10 महिन्यात संजय काका पाटील यांच्या गटाकडून रोहित पाटील गटाला धोबीपछाड दिल्याने कवठेमंकाळ नगरपंचायतमध्ये राष्ट्रवादीच्या नगराध्यक्ष पदाच्या उमेदवाराचा पराभव झाला.संजय काका पाटील गटाच्या सिंधुताई गावडे विजयी झाल्याने सगळ्यांनाच आश्चर्याचा धक्का बसला आहे. दरम्यान दोन्ही गटातील उमेदवारांना समान मते पडल्याने चिट्टीद्वारे निवड करण्यात आली यामध्ये गावडे यांच्या गळ्यात नगराध्यक्ष पदाची माळ गळ्यात पडली.
कोल्हापूरकरांचा नाद ‘लय भारी’, यंदा फोडणार ग्रीन फटाके
प्रकाशाचा सण म्हणून दिवाळी सण साजरा केला जातो. दिवाळी म्हणजे फराळ, दिवाळी म्हणजे रांगोळी , दिवाळी म्हणजे आकाशकंदील आणि दिवाळी म्हणजे फटाके. फटाक्यांशिवाय दिवाळीची खरी मजा येत नाही. मात्र, गेल्या काही वर्षांपासून फटाके फोडण्यावर अनेक बंधने आली आहेत. पण पर्यावरणाला जास्त हानी पोहोचू नये यासाठी ग्रीन फटाके बनवण्यात आले आहेत. ग्रीन फटाक्यांचा ट्रेंड सध्या जोर धरू लागला असून कोल्हापूरच्या बाजारपेठेत हे फटाके दिवाळीसाठी विक्रीला आले आहेत. कोल्हापूर शहरातील वेगवेगळ्या बाजारपेठेत सगळीकडे हे ग्रीन फटाके मोठ्या प्रमाणात मिळत आहेत. मोठ्या आवाजाच्या आणि धुराच्या फटक्यांपेक्षा फॅन्सी, कमी आवाजाच्या फटाक्यांना यंदा मागणी आहे. या ग्रीन फटाक्यांची ग्राहकांकडून मोठ्या प्रमाणात खरेदी केली जात आहे. या ग्रीन फटाक्यांमुळे कमी प्रमाणात प्रदूषण होते. यामुळे ग्राहक ग्रीन फटाक्यांना पसंती देत आहेत.
‘या आमच्या मध्यप्रदेशला’ , पुण्यात येऊन मुख्यमंत्री शिवराजसिंह चौहानांचं उद्योजकांना आवाहन
वेदांत- फॉक्सकॉन प्रकल्प महाराष्ट्रातून गेल्यामुळे राज्य सरकारची मोठी नाचक्की झाली होती. पण, आता महाराष्ट्रातल्या उद्योजकांनी मध्यप्रदेशमध्ये गुंतवणूक करावी म्हणून आज मध्यप्रदेश सरकारने पुण्यात इन्वेस्टर मीटचे आयोजन केले आहे. या कार्यक्रमासाठी मध्यप्रदेशचे मुख्यमंत्री शिवराजसिंह चौहान हे स्वत: हजर होते. महाराष्ट्रापेक्षा आमच्याकडे जमीन स्वस्त, आमच्याकडे या, असं आवाहनच त्यांनी केलं आहे.
जयललिता यांच्या मृत्यूला शशिकला जबाबदार; चौकशी आयोगाचा अहवाल सादर
तमिळनाडूच्या माजी मुख्यमंत्री आणि एआयएडीएमके दिवंगत नेत्या जे. जयललिता यांची लोकप्रियता अफाट होती. त्यांच्या मृत्यूनंतर अनेकांनी त्याच्या चौकशीची मागणी केली होती. असं असलं तरीही त्यांच्या मृत्यूचं गूढ अद्याप उकललेलं नाही. याबाबत अनेक अहवाल आले आहेत. त्यामध्ये विविध गोष्टी सांगितल्या जात आहेत, मात्र अजूनही ठोस कारण समोर आलेलं नाही. न्यायमूर्ती ए. अरुमुगास्वामी यांच्या अध्यक्षतेखाली एक आयोग जयललिता यांच्या मृत्यूची चौकशी करत होता. या आयोगाचा अहवाल मंगळवारी (18 ऑक्टोबर) तमिळनाडू विधानसभेच्या पटलावर ठेवण्यात आला. न्यायमूर्ती अरुमुगास्वामी आयोगाच्या अहवालात अनेक महत्त्वाच्या गोष्टी समोर आल्या आहेत. 150 साक्षीदारांच्या आधारे तयार 475 पानांचा अहवाल सादर करण्यात आला आहे. जयललिता यांना ज्या रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं त्या रुग्णालयातील 10 खोल्या त्यांच्या जवळच्या नातेवाईक शशिकला यांच्या ताब्यात असल्याचं या अहवालात म्हटलं आहे. डॉक्टरांच्या सल्ल्यानंतरही जयललिता यांच्यावर शस्त्रक्रिया करण्यात आली नाही, असंही समोर आलं आहे. टीव्ही 9 भारत वर्षनं याबाबत वृत्त प्रसिद्ध केलं आहे.2016 मध्ये तमिळनाडूच्या माजी मुख्यमंत्री जे. जयललिता यांचा मृत्यू झाला होता. त्यांच्या मृत्युची चौकशी करणार्या आयोगानं जयललिता यांच्या निकटवर्तीय व्ही. के. शशिकला यांना दोषी ठरवलं आहे. चौकशी आयोगाच्या अहवालात डॉक्टर के. एस. शिवकुमार (शशिकला यांचे नातेवाईक), तत्कालीन आरोग्य सचिव जे. राधाकृष्णन, माजी आरोग्य मंत्री सी. विजयभास्कर यांनाही दोषी ठरवण्यात आलं आहे. चौकशीचे आदेश दिल्यास तेही दोषी आढळतील, असंही अहवालात नमूद करण्यात आलं आहे.
अरुणाचल प्रदेशमध्ये सैन्याचं हेलिकॉप्टर कोसळलं
केदारनाथमध्ये हेलिकॉप्टर दुर्घटनेत 6 जणांचा मृत्यू झाल्याची घटना ताजी असताना आता अरुणाचल प्रदेशमध्ये सैन्याच्या हेलिकॉप्टरला अपघात झाल्याची माहिती समोर आली आहे. घटनास्थळी बचाव पथक रवाना झाले आहे.मिळालेल्या माहितीनुसार, सियांग जिल्ह्यातील तुतिंय मुख्यालयापासून 25 किलोमिटर दूर अंतरावर असलेल्या सिंगिंग गावामध्ये ही घटना घडली आहे.
आरोग्य विभागात मेगाभरती; राज्य सरकारचा मोठा निर्णय! १०,१२७ जागांसाठी वेळापत्रक जाहीर!
गेल्या अनेक दिवसांपासून प्रलंबित असलेल्या आरोग्य विभागाच्या भरती प्रक्रियेला अखेर मुहूर्त लागला असून राज्य सरकारने यासंदर्भात मोठा निर्णय घेतला आहे. ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन यांनी यासंदर्भात घेतलेल्या पत्रकार परिषदेत ही घोषणा करण्यात आली. यासंदर्भात परीक्षा आणि नियुक्तीचं वेळापत्रकच गिरीश महाजन यांनी पत्रकार परिषदेत जाहीर केलं आहे. यानुसार, पुढील वर्षी २७ एप्रिलपर्यंत निवड झालेल्या उमेदवारांच्या हाती नियुक्तीपत्र असेल, असं गिरीश महाजन यांनी यावेळी सांगितलं.“मार्च २०१८मध्ये आरोग्य विभागाच्या १३ हजार जागांची भरती निघाली होती. त्यात साडेअकरा लाख विद्यार्थ्यांनी अर्ज दाखल केले. परीक्षाशुल्कही भरलं. पण मधल्या काळात करोना, आरक्षणाच्या अडचणी या गोष्टींमुळे या भरतीकडे दुर्लक्ष झालं. पण आज आम्ही निर्णय घेतला आहे. आरोग्य विभागाशी संबंधित १० हजार १२७ जागा आम्ही भरणार आहोत”, असं गिरीश महाजन म्हणाले. यामध्ये आरोग्यसेवक, लॅब टेक्निशियन अशा जागांचा समावेश आहे.
इम्रान खान पाच वर्षांसाठी निवडणूक आयोगाकडून अपात्र; भेटवस्तूंची चिंधीचोरी भोवली
पाकिस्तानच्या निवडणूक आयोगाने माजी पंतप्रधान इम्रान खान यांना पाच वर्षांसाठी अपात्र ठरवले आहे. इतर राष्ट्रांचे प्रमुख आणि परदेशी मान्यवरांकडून मिळालेल्या सरकारी भेटवस्तूंची बेकायदेशीररित्या विक्री केल्याच्या आरोपावरुन त्यांच्यावर ही कारवाई करण्यात आली आहे. पाकिस्तानातील स्थानिक माध्यमांनी याबाबतचे वृत्त दिले आहे. आयोगाच्या या निर्णयामुळे पाकिस्तान तहरीक-ए-इन्साफचे (पीटीआय) अध्यक्ष इम्रान खान पाच वर्षांसाठी संसदेचे सदस्य राहू शकणार नाहीत.
सत्या नडेला यांना अमेरिकेत ‘पद्म भूषण’ प्रदान, विशेष सेवेसाठी भारताच्या नागरी पुरस्काराने सन्मानित
‘मायक्रोसॉफ्ट’चे मुख्य कार्यकारी अधिकारी सत्या नडेला यांना अमेरिकेत भारताचा तिसरा सर्वोच्च नागरी पुरस्कार ‘पद्म भूषण’ पदान करण्यात आला. नडेला यांना विशेष सेवेसाठी सॅन फ्रान्सिस्कोमधील भारताचे वाणिज्यदूत डॉ. टी. व्ही. नागेंद्र प्रसाद यांच्या हस्ते गेल्या आठवड्यात या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. ‘पद्म भूषण’ हा पुरस्कार आपल्यासाठी मोठा सन्मान असल्याची प्रतिक्रिया यावेळी सत्या नडेला यांनी दिली.
४४ दिवस पंतप्रधान राहिलेल्या लिझ ट्रस यांना दरवर्षी होणार एक कोटीचा धनलाभ
ब्रिटनच्या पंतप्रधान लिझ ट्रस यांनी आर्थिक आघाडीवर अपयश आल्यामुळे पदाचा नुकताच राजीनामा दिला आहे. अवघ्या ४४ दिवसातच त्यांना या पदावरुन पायउतार व्हावे लागले. त्यांच्या या राजीनाम्यानंतर ट्रस यांच्या मानधनाबाबत माहिती समोर आली आहे. लिझ यांना आयुष्यभरासाठी दरवर्षी १,१५,००० पौंड म्हणजेच १ कोटी पाच लाख रुपये मानधन मिळणार आहे. लिझ यांची पंतप्रधानपदाची कारकीर्द अल्पकाळ ठरली असली तरी त्या सरकारच्या ‘सार्वजनिक कर्तव्य खर्च भत्ता’ या योजनेसाठी पात्र ठरल्या आहेत. करदात्यांच्या पैशातून माजी पंतप्रधानांना हा भत्ता देण्यात येतो.
झिम्बाब्वेनं मारली बाजी, आता सुपर-12 मध्ये टीम इंडियाच्या गटात असणार ‘या’ दोन टीम
आयर्लंडपाठोपाठ झिम्बाब्वेनं करो या मरोच्या मुकाबल्यात बाजी मारली आणि टी 20 वर्ल्ड कपच्या सुपर 12 फेरीत धडक मारली आहे. त्यामुळे आता सुपर 12 फेरीचं चित्र स्पष्ट झालं आहे. श्रीलंका, नेदरलँड्स, आयर्लंड आणि झिम्बाब्वे हे चार संघ सुपर 12 साठी पात्र ठरले आहेत. त्यापैकी झिम्बाब्वे आणि नेदरलँड या दोन टीम्स भारताच्या ग्रुपमध्ये आहेत. सिकंदर रझाची अष्टपैलू खेळी आणि क्रेग एर्विनचं अर्धशतक याच्या जोरावर झिम्बाब्वेनं आज स्कॉटलंडचा 5 विकेट्सनी पराभव केला. स्कॉटलंडनं दिलेलं 133 धावांचं आव्हान झिम्बाब्वेनं 18.3 ओव्हर्समध्येच पूर्ण केलं आणि वर्ल्ड कपच्या सुपर 12 फेरीत दणक्यात एन्ट्री केली.
विश्वचषकात आयर्लंडकडून पराभूत झाल्याने वेस्ट इंडिजचा पत्ता कट
टी२० विश्वचषक २०२२ मध्ये, वेस्ट इंडिज आणि आयर्लंड यांच्यात आज होबार्टमधील बेलेरिव्ह ओव्हल मैदानावर सामना झाला. या सामन्यातील विजेता २०२२ च्या टी२० विश्वचषकातील सुपर-१२ मध्ये पोहोचणार असल्याने वेस्ट इंडीज च्या दृष्टीने हा सामना खूप महत्त्वाचा होता. मात्र वेस्ट इंडिज संघाला खूप मोठा धक्का बसला आहे. दोनवेळची चॅम्पियन वेस्ट इंडिज आयर्लंडकडून पराभूत होऊन स्पर्धेतून बाहेर पडला. यामुळे अनेक चाहत्यांकडून वेस्ट इंडीजचा संघ टीकेचा धनी होताना दिसत आहे.
SD Social Media
9850 60 3590