काँग्रेस पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्षपदाच्या निवडणुकीचा निकाल आज जाहीर होणार आहे. काँग्रेसचे ज्येष्ठ नेते मल्लिकार्जुन खरगे आणि शशी थरूर हे दोघे अध्यक्षपदाच्या शर्यतीत आहेत. 24 वर्षानंतर काँग्रेसला गांधी कुटुंबाबाहेरचा अध्यक्ष मिळणार आहे. त्यामुळे अध्यक्षपदी कुणाची निवड होणार आहे, हे पाहण्याचे ठरणार आहे.
काँग्रेसच्या 137 वर्षाच्या इतिहासात सहाव्यांदा अध्यक्षपदासाठी निवडणूक झाली. या दोन्ही उमेदवारांचे आणि काँग्रेस पक्षाचे भवितव्य सोमवारी मतपेट्यांमध्ये बंद झाले होते. अध्यक्षपद निवडणुकीसाठी जवळपास 96 टक्के मतदान झालंय. 24 अकबर रोड येथील काँग्रेस मुख्यालयात सकाळी दहा वाजेपासून मतमोजणीला सुरूवात होईल.
दरम्यान, काँग्रेस पक्षनेते २०१९ पासून ज्याची वाट पाहात आहेत, ते अध्यक्ष पक्षाला मिळणार आहेत. इथपर्यंत येण्याचा प्रवास साहजिकच खूप क्लिष्ट राहिला असल्याचं बोललं जातं. राहुल गांधी यांनी २०१९ मध्ये काँग्रेसचं अध्यक्षपद सोडलं. त्यानंतर सोनिया गांधी हंगामी अध्यक्ष म्हणून काम बघत होत्या मात्र पक्षाची देशभरातील एकंदरीत स्थिती बघता पक्षाचं नेतृत्व करण्यासाठी अध्यक्ष असणं गरजेचं असल्याचं वेळोवेळी दिसून आलं. अध्यक्षांची मागणी होताना अध्यक्ष गांधी घराण्यातीलच व्हावा अशी अनेकांची इच्छा होती, मात्र राहुल गांधींचा अध्यक्षपद स्वीकारण्यासाठीचा नकार, सोनिया गांधी यांची खालावलेली तब्येत आणि प्रियांका गांधी वड्रा यांच्या हाती फारसं यश न लागणं यासर्व गोष्टींमुळे ‘नॉन-गांधी’ हाच एक पर्याय पक्षाकडे राहिला.