पुढचे 3 दिवस धो-धो कोसळणार, महाराष्ट्रासह देशभरातील 17 राज्यांमध्ये मुसळधार पावसाचा इशारा

ऑक्टोबरमध्ये मान्सूनच्या परतीची वेळ असते, मात्र अजूनही अनेक राज्यांमध्ये पाऊस सुरूच आहे. दिल्ली, महाराष्ट्र, यूपीसह अनेक राज्यांमध्ये शनिवारी मुसळधार पाऊस झाला. सुमारे 12 तास झालेल्या पावसामुळे दिल्लीतील अनेक भाग ठप्प झाले होते. दिल्ली पोलिसांनी प्रवाशांना हे लक्षात घेऊनच प्रवास योजना बनवण्याचा सल्ला दिला. हवामान खात्याच्या म्हणण्यानुसार, महाराष्ट्रासह 17 राज्यांमध्ये पुढील तीन दिवस मुसळधार पाऊस पडू शकतो.

IMD नुसार येत्या 2-3 दिवसांत मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. मिळालेल्या माहितीनुसार, वेस्टर्न डिस्टर्बन्समुळे पावसाळा संपल्यानंतरही पाऊस पडत आहे. चक्रीवादळाचा प्रभाव किनारी आंध्र प्रदेश आणि लगतच्या भागात आहे. दक्षिण बंगालच्या उपसागराच्या मध्यभागी चक्रीवादळाचा प्रभाव कायम आहे. हवामान खात्याने मुंबई आणि लगतच्या ठाणे, पालघर आणि कोकण विभागातील जिल्ह्यांसाठी पुढील दोन दिवस येलो अलर्ट जारी केला आहे.

पुढचे 3 दिवस राज्यात गडगडाटासह पाऊस पडण्याची शक्यता आहे. सोसाट्याचा वाराही वाहण्याची शक्यता असल्याचे हवामान विभागाने म्हटले आहे. आज पालघर, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, सांगली, पुणे, ठाणे, अहमदनगर, सोलापूर, लातूर, जालना, औरंगाबाद, जळगाव, धुळे, नाशिक, नंदूरबार या जिल्ह्यांसाठी यलो अलर्ट जारी केला आहे. राज्यातील काही भागांत 11 ऑक्टोबरपर्यंत पाऊस कायम राहण्याची शक्यता आहे.

महाराष्ट्रासह देशातील अनेक भागात सध्या पाऊस सुरु आहे. गोव्यासह कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यात जोरदार पावसाची नोंद झाली असल्याचे हवामान विभागाने म्हटले आहे. पुढील 3 ते 4 दिवस कर्नाटकचा अंतर्गत भाग, आंध्र प्रदेशच्या किनारी भागात जोरदार पावसाची शक्यता आहे. सध्या मान्सूनचा माघारीचा प्रवास सुरु आहे. आग्रा, ग्वाल्हेर या भागातून मान्सून माघारी परतला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

scroll to top
error: आपल्याला माहिती कॉपी करण्याची परवानगी नाही.