आज दि.१९ सप्टेंबर च्या दिवसभरातील ठळक घडामोडी अशा…

भाजपला धक्का, आदिवासी मंत्र्यांच्या पुतणीला गावकऱ्यांनी नाकारलं, शिंदे गटाच्या उमेदवारानेच केला पराभव

राज्यातील 16 जिल्ह्यांतील 547 ग्रामपंचायत निवडणुकीसाठी मतमोजणी सुरू आहे.  नंदुरबारमध्ये आतापर्यंत 75 ठिकाणचे निकाल लागले आहे. मात्र, निकालामध्ये प्रस्थापितांना धक्के बसले आहे. आदिवासी विकास मंत्री डॉ. विजयकुमार गावित यांची पुतणी पराभूत झाली आहे. शिंदे गटाच्या उमेदवाराने हा पराभव केला आहे.

नंदुरबार  ग्रामपंचायत निवडणुकीला निकाल आता हळूहळू स्पष्ट होत आहे. या निकालामध्ये भाजपने आघाडी जरी घेतली असली तरी अनेक प्रस्थापितांना धक्के बसले आहे. राज्याचे आदिवासी विकास मंत्री डॉ विजयकुमार गावित यांची पुतणी, नंदुरबार पंचायत समितीचे सभापती प्रकाश गावित यांची मुलगी दुधाळे ग्रामपंचायतीमधून सरपंचपदासाठी पराभूत झाली आहे.  प्रतिक्षा जयेंद्र वळवी यांना 559 मतं मिळाली तर शिंदे गटाच्या अश्विनी प्रकाश मालचेंनी 1100 मतं मिळवत त्यांचा पराभव केला.

अयोध्येत बनले CM योगी आदित्यनाथ यांचे मदिर, रोज होते आरती; संत समाजाने दिली ही प्रतिक्रिया

तुम्ही खूप चाहते पाहिले असतील, पण मुख्यमंत्र्यांचे मंदिर बांधणारे असे चाहते फार कमी पाहिले असतील. मात्र, हे खरे आहे. रामनगरी अयोध्येत असाच प्रकार घडला. अयोध्येत राम मंदिराचे बांधकाम युद्धपातळीवर सुरू असताना एका तरुणाने उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांचे मंदिर बाधले आहे. तसेच त्यांची पुजाही सुरू केली आहे.

हे मंदिर रामजन्मभूमीपासून सुमारे 25 किमी अंतरावर प्रयागराज महामार्गावरील कल्याण भदरसा गावातील मजरे मौर्यच्या पुरवामध्ये बांधले आहे. ज्या दिवशी राम मंदिराची भूमिपूजा झाली, त्याच दिवशी म्हणजे 5 ऑगस्ट 2020 रोजी याच गावात योगींच्या मंदिराचा पाया रचला गेला, अशी माहिती समोर आली आहे.

कपिल शर्मा झाला डिलिव्हरी बॉय; Zwigato चा ट्रेलर आऊट

टेलिव्हिजनवर प्रेक्षकांना खळखळून हसवणारा कपिल शर्मा पुन्हा एकदा टेलिव्हिजनवर प्रेक्षकांचं मनोरंजन करायला येत आहे.  कपिल शर्माच्या नव्या सिनेमाची प्रेक्षक आतुरतेनं वाट पाहत होते. ‘ज्विगाटो’ या नव्या सिनेमाचा ट्रेलर नुकताच प्रदर्शित झाला आहे. मोठ्या ब्रेकनंतर कपिल शर्मा मोठ्या पडद्यावर दिसणार आहे.  ‘ज्विगाटो’ या नावावरुनच सिनेमाची उत्सुकता ताणली जात आहे. एका डिलिव्हरी बॉयची भूमिका कपिल शर्मा या सिनेमात साकारताना दिसणार आहेत.  कपिलला या नव्या भूमिकेत पाहून प्रेक्षकांनी देखील सिनेमा पाहण्यासाठी उत्सुकता दाखवली आहे.

कपिल शर्मा या सिनेमात फार गरीब कुटुंबातील एक कुटुंबप्रमुख म्हणून आयुष्य जगताना दिसणार आहे. नोकरी मिळत नसल्यानं त्याला डिलिव्हरी बॉयची नोकरी करावी लागते. ज्विगाटो नावाच्या कंपनीमध्ये तो डिलिव्हरी बॉय म्हणून काम करत असतो. या प्रवासात त्याला येणारे अडथळे, कुटुंबाचं प्रेशर आणि लोकांना जेवण पोहोचवण्याची त्याची धडपड सगळं काही पाहायला मिळणार आहे.  आपल्या घरी जेवण रात्री अपरात्री, सकाळी संध्याकाळी जेवण पोहोचवणारा डिलिव्हरी बॉय त्याच्या आयुष्यात किती स्टगल करत असतो, त्याला कोणत्या आव्हानांचा सामना करावा लागतो याचं संपूर्ण चित्रण सिनेमातून करण्यात येणार आहे.

अमरेंद्र सिंगांचा भाजपमध्ये प्रवेश, पंजाबमध्ये वाहणार बदलाचे वारे?

पंजाबचे माजी मुख्यमंत्री कॅप्टन अमरेंद्र सिंह यांनी भाजपमध्ये प्रवेश केला आहे. त्यांच्यासोबत त्यांचा मुलगा, मुलगी भाजपमध्ये जाणार असले तरी त्यांच्या पत्नी परणीत कौर या मात्र काँग्रेसमध्येच राहणार आहेत.

अमरेंद्र सिंह हे त्यांचा पंजाब लोक काँग्रेस पक्ष भाजपमध्ये विलीन करणार आहेत. दरम्यान आजच्या प्रवेशानंतर भाजपकडून सिंह यांना मोठी जबाबदारी देण्याची शक्यता आहे. भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे पी नड्डा यांच्या उपस्थितीत हा प्रवेश होणार आहे. दरम्यान या प्रवेश कार्यक्रमाला केंद्रीय गृहमंत्री अमित शाह उपस्थित राहणार आहेत. पंजाबचे माजी मुख्यमंत्री अमरेंद्र सिंग हे काही वेळापूर्वी भारतीय जनता पक्षाच्या मुख्यालयात पोहोचले होते.

अशोक चव्हाणांच्या गडाला भाजपचा सुरूंग, नांदेडमध्ये कमळ नंबर वन!

नांदेड जिल्ह्यात ग्रामपंचायत निवडणुकीत भाजप क्रमांक एकचा पक्ष ठरला आहे. सर्वाधिक जागा जिंकून भाजपाने जिल्ह्यात आपली ताकद वाढवली आहे. भाजपाच्या या विजयामुळे अशोक चव्हाण यांच्यापुढे आव्हान उभे राहिले आहे.

मराठवाड्यातील नांदेड जिल्हा हा काँग्रेस नेते अशोक चव्हाण यांचा गड मानला जातो. स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये मोठ्या प्रमाणात काँग्रेसचे वर्चस्व आहे, पण गेल्या काही वर्षात भाजपने नांदेड मध्ये आपली ताकद चांगलीच वाढवली. आज झालेल्या ग्रामपंचायत निवडणुकीत नांदेडमध्ये भाजपा पहिल्या क्रमांकावर आहे. जिल्ह्यात एकूण 91 ग्रामपंचायतीपैकी सर्वाधिक जागा भाजपाने जिंकल्या, या निवडणुकीतून भाजपाने ग्रामीण भाग काबीज केला आहे.

 ‘बारामती’ जिंकायला निघालेल्या भाजपला जोरदार धक्का, पवारांच्या गडाला सुरूंग नाहीच!

पवारांच्या सत्ताकेंद्राला सुरूंग लावण्यासाठी दोन केंद्रीय मंत्री बारामती आणि शिरूर लोकसभा मतदारसंघात येत आहेत, मात्र दरम्यान झालेल्या ग्रामपंचायतीच्या निवडणुकांमध्ये पुणे जिल्हा आपलाच असल्याचे राष्ट्रवादीने दाखवून दिलं आहे. निकाल लागलेल्या 61 ग्रामपंचायतींपैकी केवळ 8 जागांवर भाजपला यश मिळालंय, तर राष्ट्रवादीने जवळपास 45 ग्रामपंचायतीवर सत्ता काबीज केली आहे.

शरद पवारांच्या बालेकिल्ल्यात शिरण्यासाठी भाजपने जोरदार तयारी सुरू केली आहे. बारामती आणि शिरूर लोकसभा मतदार संघात केंद्र सरकारच्या मंत्र्यांना दौऱ्यासाठी पाठवलं आहे. मोठा कार्यक्रम आखण्यात आलाय, पण आज आलेल्या ग्रामपंचायत निकालात या दोन्ही मतदारसंघातील ग्रामपंचायतीवर पवारांच्या राष्ट्रवादीने वरचष्मा कायम ठेवला आहे.

शरद पवारांना धमकीचा फोन, त्या इशाऱ्यानंतर पोलीस ऍक्शन मोडमध्ये!

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांना धमकीचा फोन आला आहे. सकाळी कुर्डुवाडी येथे दौऱ्यासाठी येऊ नये, असा इशारा शरद पवारांना आला होता. पण या फोननंतरसुद्धा शरद पवारांनी नियोजित दौरा पूर्ण केला आहे. आज सकाळी कुर्डुवाडीमध्ये दौऱ्यासाठी येऊ नये, अशी धमकी एका अज्ञात व्यक्तीकडून पवारांना देण्यात आली होती. या फोननंतरही शरद पवार डगमगले नाहीत आणि त्यांनी कुर्डुवाडीचा दौरा पूर्ण केला. फोन करणारी ही व्यक्ती कोण आहे आणि त्याने ही धमकी का दिली, याची माहिती अद्याप समोर आली नाही.

मुंबई पोलीस कंट्रोल रूमला हा फोन आला होता. पोलिसांनी या फोनची गंभीर दखल घेतली आहे. धमकी देणाऱ्या व्यक्तीचा नंबर रेकॉर्डवर आला आहे. या नंबरचा शोध पोलीस घेत आहेत. धमकीचा हा फोन सोलापूरहून आल्याची माहिती आहे. या व्यक्तीचा शोध पोलीस घेत आहेत.

राणी एलिझाबेथ द्वितीय यांच्या निधनानंतर कॅडबरीसह तब्बल ६०० कंपन्यांची चिंता वाढली; नेमकं कारण काय?

ब्रिटनच्या राणी एलिझाबेथ द्वितीय यांचे ८ सप्टेंबर रोजी स्कॉटलंडमधील बालमोरल प्रासादात निधन झाले. त्या ९६ वर्षाच्या होत्या. राणी एलिझाबेथ यांनी ७हून अधिक दशके ब्रिटन, तसेच काही राष्ट्रकुल देश आणि स्वायत्त ब्रिटिश वसाहतींचे राष्ट्रप्रमुखपद सांभाळले. ब्रिटनच्या राजसिंहासनावर सर्वाधिक काळ राहिलेली व्यक्ती हा विक्रम राणी एलिझाबेथ यांच्या नावावर नोंदवला असून ब्रिटनमधील बहुतेकांना राणी एलिझाबेथ यांच्याव्यतिरिक्त राजसिंहासनावर इतर कोणीही व्यक्ती ज्ञात नाही.

मात्र त्यांच्या निधनानंतर जवळपास ६०० ब्रँड्सच्या चिंतेत भर पडली आहे. या कंपन्यांना रॉयल वॉरंट म्हणजेच शाही मोहर हातातून निसटणार असल्याची भीती सतावते आहे. कारण आता त्यांना राणी एलिझाबेथ द्वितीय यांचे उत्तराधिकारी आणि ब्रिटनचे राजा चार्ल्स तृतीय यांच्या मंजुरीची प्रतीक्षा करावी लागणार आहे. यामध्ये फोर्टनम आणि मेसन टी, बर्बेरी रेनकोट, कॅडबरी चॉकलेट, ब्रूमस्टिक आणि डॉग फूड यासारख्या कंपन्यांचा समावेश आहे.

दारुच्या नशेत असल्याने मुख्यमंत्री भगवंत मान यांना विमानातून खाली उतरवलं? 

पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान यांच्यावर गंभीर आरोप करण्यात आल आहे. दारुच्या नशेत असल्याने भगवंत मान यांना विमानातून खाली उतरवण्यात आल्याचा दावा केला जात असून, अकाली दलने हा मुद्दा लावून धरला आहे. भगवंत मान फ्रँकफूर्टहून दिल्लीला येत असताना शेवटच्या क्षणी त्यांचं विमान चुकलं आणि प्रवास एक दिवस पुढे ढकलण्यात आला. ‘द हिंदू’ने जर्मनी दौऱ्यावर असणाऱ्या भगवंत मान यांची प्रकृती ठीक नसल्याने विमान प्रवास लांबला असल्याचं वृत्त दिलं आहे. मात्र सोशल मीडियावर भगवंत मान यांच्याबाबत इतर दावे होत असून आम आदमी पक्षानेही त्यावर स्पष्टीकरण दिलं आहे.

रशियामुळे भारताला ३५ हजार कोटींचा फायदा

रशियाकडून सवलतीच्या दरामध्ये कच्चं तेल विकत घेतल्याने भारताला जवळजवळ ३५ हजार कोटी रुपयांचा फायदा झाला आहे. फेब्रवारी महिन्यामध्ये युक्रेन आणि रशियामध्ये सुरु झालेल्या युद्धानंतर रशियावर पाश्चिमात्य देशांनी आर्थिक निर्बंध घातले. त्यामुळेच आपला व्यापार सुरु रहावा म्हणून रशियाने भारताला स्वस्त दरामध्ये कच्चं तेल विकण्यास सुरुवात केली. या सर्व गोष्टांचा फायदा भारताला झाल्याची माहिती या विषयातील तज्ज्ञांनी दिल्याचं वृत्त ‘टाइम्स ऑफ इंडिया’ने दिलं आहे.

पुढील वर्षीच्या दहावी, बारावी परीक्षेच्या तारखा ठरल्या

राज्य मंडळातर्फे दहावी आणि बारावीच्या परीक्षेचे संभाव्य वेळापत्रक जाहीर करण्यात आले. त्यानुसार बारावीची परीक्षा २१ फेब्रुवारी ते २० मार्च या कालावधीत, तर दहावीची परीक्षा २ मार्च ते २५ मार्च या कालावधीत घेतली जाणार आहे.

 हे संभाव्य वेळापत्रक बोर्डाच्या अधिकृत संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात आले आहे. शाळा, कनिष्ठ महाविद्यालय आणि विद्यार्थी यांना अभ्यासक्रमाचे नियोजन करण्याच्या हेतूने फेब्रुवारी मार्च 2023 च्या लेखी परीक्षेचे संभाव्य वेळापत्रक जाहीर करण्यात आले आहे

राहुल गांधींना पक्षाचे अध्यक्ष करा, महाराष्ट्र काँग्रेसचा ठराव मंजूर

काँग्रेस नेते राहुल गांधी यांना पक्षाचे अध्यक्ष बनवण्याचा ठराव महाराष्ट्र काँग्रेसने मंजूर केला आहे. माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी हा प्रस्ताव काँग्रेसच्या बैठकीत ठेवला होता. त्याला सर्व काँग्रेसच्या प्रतिनिधींनी मंजूरी दिली. तसेच, काँग्रेस अध्यक्षाला प्रदेशाध्यक्ष, प्रदेश कोषाध्यक्ष, प्रदेश पदाधिकारी, सदस्य निवडण्याचा अधिकार देणारा प्रस्तावही मंजूर करण्यात आला आहे.

महाराष्ट्र काँग्रेस कमिटीची यशवंतराव चव्हाण सभागृहात बैठक पार पडली. या बैठकीला माजी केंद्रीय मंत्री पल्लम राजू, राज्याचे प्रभारी एच. के. पाटील, प्रदेशाध्यक्ष नाना पटोले ,माजी मंत्री बाळासाहेब थोरात, माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण उपस्थित होते.

“निकालपेक्षा संघाची योग्य निवड अधिक महत्वाची”, आशिष नेहराचा रोहितला मोलाचा सल्ला

२०२२ च्या टि विश्वचषक स्पर्धेच्या तयारीत असलेली टीम इंडिया आता ऑस्ट्रेलियाविरुद्ध तीन सामन्यांची टी२० मालिका खेळणार आहे. या मालिकेपूर्वी आशिष नेहराने भारतीय कर्णधार रोहित शर्मा आणि प्रशिक्षक राहुल द्रविड यांना महत्त्वपूर्ण सल्ला दिला आहे. आयपीएल २०२२ मध्ये गुजरातच्या संघाला विजेता बनवणाऱ्या आशिष नेहराने भारतीय संघाने आता आपल्या ११ खेळाडूंचा निर्णय घ्यावा आणि त्यांना प्रत्येक सामन्यात संधी द्यावी, असे म्हटले आहे. आता भारताने सामने जिंकण्यापेक्षा त्यांचा शेवटचा संघ तयार करण्याचे लक्ष्य ठेवले पाहिजे जो त्यांना विश्वचषकात उतरावा लागेल.

SD Social Media

9850 60 3590

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

scroll to top
error: आपल्याला माहिती कॉपी करण्याची परवानगी नाही.