आधार कार्ड हा सर्वांत महत्त्वाचा दस्तऐवज मानला जातो. शैक्षणिक, बॅंकिंग, शासकीय आदी कामांसाठी आधार कार्ड गरजेचं आहे. रेशनिंगसह इतर शासकीय योजनांचा लाभ घेण्यासाठी संबंधित लाभार्थ्याकडे आधार कार्ड असणं अनिवार्य आहे. सरकारच्या सूचनेनुसार आधार कार्ड पॅन कार्डशी लिंक्ड असणं गरजेचं आहे. येत्या काळात आधार कार्ड मतदान कार्डसोबतही जोडलं जाणार आहे. रहिवासी पुराव्यासह इतर काही गोष्टींसाठी आधार कार्ड ग्राह्य मानलं जातं. त्यामुळे आधार कार्डवरचा तपशील बिनचूक असणं आवश्यक आहे. तसंच आधार कार्डला मोबाइल क्रमांक लिंक करणंदेखील अनिवार्य आहे. आधार कार्डला मोबाइल क्रमांक लिंक करणं आता अगदी सोपं झालं आहे. हे काम तुम्ही अगदी घरबसल्या करू शकता. यासाठी एक विशिष्ट प्रक्रिया आहे.
आयव्हीआर प्रक्रियेमुळे मोबाइल क्रमांक आधार कार्डशी लिंक करणं सुलभ झालं आहे. मोबाइल फोनवरून 14546 या क्रमांकावर कॉल करून तुमचा मोबाइल क्रमांक आधार कार्डशी लिंक करता येतो. हा क्रमांक डायल करण्यापूर्वी तुमच्याकडे ओटीपी जनरेट करण्यासाठी मोबाइल क्रमांक आणि तुमचं आधार कार्ड आहे की नाही हे तपासून पाहा. ‘डिजिटल इंडिया’ या अधिकृत ट्विटर हॅंडलवरून या संपूर्ण प्रक्रियेविषयी माहिती देण्यात आली आहे. आधार कार्डला मोबाइल क्रमांक लिंक करण्यासाठी एक सोपी प्रक्रिया आहे. ही प्रक्रिया तुम्ही घरबसल्या पूर्ण करू शकता.
यासाठी सर्वप्रथम तुम्ही तुमच्या मोबाइल नंबरवरून 14546 या क्रमांकावर कॉल करावा. यानंतर तुम्ही भारतीय नागरिक आहात की एनआरआय असा प्रश्न तुम्हाला विचारला जाईल. त्यापैकी एक पर्याय निवडा. पर्याय निवडल्यानंतर आधार कार्ड तुमच्या मोबाइल क्रमांकाशी लिंक करण्याची अनुमती विचारली जाईल. तुम्ही मोबाइलवरून 1 प्रेस केला तर तुमची सहमती आहे, असं गृहीत धरलं जाईल.
या प्रक्रियेनंतर तुम्हाला 12 अंकी आधार क्रमांक द्यावा लागेल आणि पुन्हा 1 हे बटण प्रेस करावं लागेल. तुम्ही आधार क्रमांक चुकीचा दिला तर तुम्हाला दुसरा पर्याय उपलब्ध होईल. त्यानंतर ओटीपी (OTP) अर्थात वन टाइम पासवर्ड जनरेट होईल आणि तो तुमच्या मोबाइलवर येईल.
यानंतर आयव्हीआर प्रक्रियेने तुमच्याकडे मोबाइल क्रमांक मागितला जाईल. त्यानंतर तुमच्या मोबाइल ऑपरेटरला तुमचं नाव, फोटो, जन्मतारीख आदी माहिती द्यावी लागेल. ही माहिती दिल्यावर आयव्हीआर तुमच्या मोबाइल क्रमांकातले शेवटचे चार क्रमांक वाचून दाखवेल आणि ते बरोबर आहेत का असा प्रश्न विचारेल.
तुमचं कन्फर्मेशन आल्यावर तुम्हाला एसएसएमच्या माध्यमातून आलेला ओटीपी एंटर करावा लागेल. त्यानंतर 1 हे बटण दाबावं लागेल. यानंतर सर्व प्रक्रिया पूर्ण होईल आणि तुमचा मोबाइल क्रमांक आधार कार्डशी लिंक होईल.
आधार बेस्ड मोबाइल क्रमांकाची रिव्हेरिफिकेशन प्रक्रिया यशस्वी पूर्ण झाल्याची माहिती तुम्हाला `आयव्हीआर`कडून दिली जाईल. ही प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर तुम्हाला एक मेसेजसुद्धा येईल.
आयव्हीआर सुविधा एअरटेल, व्होडाफोन आयडिया या कंपन्यांनी यापूर्वीच सुरू केली आहे. जिओ आणि बीएसएनएल लवकरच ही सुविधा सुरू करणार आहेत. या सुविधेमुळे आधार कार्डशी मोबाइल क्रमांक लिंक करणं अगदी सहज-सोपं झालं आहे.