शिंदे-फडणवीस सरकारकडून उद्या मंत्रिमडंळाचा विस्तार?
महाविकास आघाडी सरकार कोसळल्यानंतर राज्यात सत्तेत आलेल्या शिंदे-फडणवीस सरकारला अखेर मंत्रीमंडळ विस्तारासाठी मुहूर्त सापडला आहे. ५ ऑगस्टला राज्य सरकार मंत्रिमंडळाचा विस्तार करणार आहे. बुधवारी शिंदे गटाचे प्रवक्ते दीपक केसरकर यांनी रविवारी मंत्रीमंडळ विस्तार होईल असं स्पष्ट केलं होतं. दरम्यान इंडिया टुडेने सूत्रांच्या हवाल्याने दिलेल्या वृत्तानुसार, रविवारी फक्त ज्येष्ठ आमदारांचा मंत्रिपदाचा शपथविधी होण्याची शक्यता आहे. यामध्ये भाजपाचे सात आणि शिंदे गटातील सात आमदारांचा समावेश आहे.
भाजपामधून कोणाला संधी मिळणार?
१) चंद्रकांत पाटील
२) सुधीर मुनगंटीवार
३) गिरीश महाजन
४) प्रवीण दरेकर
५) राधाकृष्ण विखे पाटील
६) गणेश नाईक
७) रवींद्र चव्हाण
भाजपा गटातील संभाव्य मंत्री कोण?
१) दादा भुसे
२) उदय सामंत
३) गुलाबराव पाटील
४) शंभूराज देसाई
५) संदीर भुमरे
६) संजय शिरसाट
७) अब्दुल सत्तार
संजय राऊतांचा ईडी कोठडीतील मुक्काम वाढला
मुंबईतील पत्राचाळ घोटाळ्यात आर्थिक गैरव्यवहार केल्याच्या आरोपाखाली ईडी कोठडीत असणाऱ्या शिवसेना खासदार संजय राऊत यांची अडचण वाढली आहे. सेशन कोर्टाने त्यांना पुन्हा एकदा ईडी कोठडी सुनावली आहे. त्यामुळे राऊतांना आता सोमवारपर्यंत (८ ऑगस्ट) ईडी कोठडीत राहावं लागेल. न्यायालयाच्या या निर्णयावर राऊतांचे भाऊ सुनिल राऊत यांनी पहिली प्रतिक्रिया दिली. तसेच संजय राऊतांना सोमवारपर्यंत जामीन मिळेल, अशी आशा व्यक्त केली. ते गुरुवारी (४ ऑगस्ट) मुंबईत माध्यमांशी बोलत होते.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची प्रकृती बिघडली, सर्व शासकीय कार्यक्रम रद्द
राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची प्रकृती बिघडली आहे. सततचे दौरे, सभा, कार्यक्रम यामुळे एकनाथ शिंदे यांना थकवा जाणवत असल्याची माहिती मिळत आहे. डॉक्टरांनी त्यांना सक्त विश्रांती घेण्याचा सल्ला दिला आहे. दरम्यान, मुख्यमंत्र्यांची प्रकृती बिघडली असल्याने सर्व प्रशासकीय कार्यक्रम रद्द करण्यात आले आहेत.
शिंदेंपाठोपाठ देवेंद्र फडणवीसांचेही सर्व कार्यक्रम रद्द, दिल्लीला झाले रवाना
सतत दौऱ्यामुळे राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे थकले आहे. त्यामुळे शिंदेंनी सर्व कार्यक्रम रद्द केले आहे. त्यांच्यापाठोपाठ उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही आपले सर्व कार्यक्रम रद्द केले असून नवी दिल्लीला रवाना झाले आहे.
आज सुप्रीम कोर्टामध्ये शिवसेना आणि शिंदे गटावर सुनावणी पार पडली. यावेळी सुनावणी हे ८ ऑगस्टपर्यंत पुढे ढकलण्यात आली आहे. त्यामुळे मंत्रिमंडळ विस्ताराच्या तयारीत असलेल्या शिंदे सरकारचा सर्व कार्यक्रम खोळंबला. एकनाथ शिंदे यांनी आपले सर्व कार्यक्रमांना स्थगिती दिली. त्यानंतर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आजचे सर्व कार्यक्रम रद्द केले आहे. देवेंद्र फडणवीस तातडीने दिल्लीसाठी रवाना झाल्याची माहिती समोर आली आहे. आज देवेंद्र फडणवीस दिल्लीत पक्षश्रेष्ठींसोबत चर्चा करणार असल्याची माहिती समोर आली आहे.
ईडी तावडीतून कसे सुटणार? भुजबळांनी अनुभवातून राऊतांना दिल्या शुभेच्छा
पत्राचाळ प्रकरणामध्ये शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांना 8 ऑगस्टपर्यंत ईडी कोठडी सुनावली आहे. ईडीच्या कायद्यामध्ये लवकरच जामीन मिळत नाही. जर काही मार्ग मिळाला तर आमच्या शुभेच्छाच आहे, अशी प्रतिक्रिया राष्ट्रवादीचे नेते छगन भुजबळ यांनी अनुभवानुसार दिली.नाशिकमध्ये पत्रकारांशी बोलत असताना छगन भुजबळ यांनी राजकीय घडामोडींवर भाष्य केलं. यावेळी संजय राऊत यांच्या अटकेवर भाष्य केलं.
सिद्धिविनायकाच्या दर्शनासाठी खोटे मेसेज; आदेश बांदेकरांनी केला खुलासा
मुंबईतील सिद्धिविनायक मंदिर हे समस्त मुंबईकरांसाठी आराध्य दैवत आहे. मुंबईतील कानाकोपऱ्यातील हजारो भाविक दररोज सिद्धिविनायकाच्या दर्शनाला येत असतात. अनेकवेळा सिद्धिविनायकाचं दर्शन घेण्यासाठी मंदिराबाहेर मोठ मोठ्या रांगा लागलेल्या असतात. भाविक तासंतास मंदिराबाहेर रांगेत उभे असतात. भाविकांच्या याच श्रद्धेचा फायदा घेऊन मात्र अनेकवेळा सिद्धिविनायकाच्या नावाखाली भाविकांची दिशाभूल केली जाते. त्यांची फसवणूकही होते. असाच प्रकार सध्या होत असून सोशल मीडियावर सिद्धिविनायकाचं दर्शन घेण्यासाठी पैसे घेत जात आहेत. हा प्रकार मंदिर प्रशासनाच्या लक्षात आला असून त्यांनी त्वरित याबाबत कडक पाऊलं उचलली आहेत. सिद्धिविनायक गणपती मंदिर न्यासचे अध्यक्ष अभिनेते आदेश बांदेकर यांनी याबाबत खुलासा करत एक व्हिडीओ शेअर केला आहे.
सर्व शिक्षा अभियानाचं धक्कादायक चित्र, शाळेतील खोल्या पाडल्या; मुलांचे झाडाखाली वर्ग सुरू
अहमदनगर जिल्ह्यातील श्रीरामपूर तालुक्यात जिल्हा परिषद शाळेतील मुलांना झाडाखाली बसून धडे गिरवण्याची वेळ आली आहे. चार वर्षांपूर्वी शाळेतील खोल्या पाडण्यासाठी घाई करण्यात आली होती. मात्र पुन्हा बांधण्यासाठी कोणतीही कारवाई होत नसल्याने झाडाखाली बसून मुलांना धडे गिरवावे लागत आहेत.श्रीरामपूर तालुक्यातील गळनिंब गावातील जिल्हा परिषद शाळेत पहिली ते चौथीच्या वर्गात शंभरावर विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. चार वर्षांपूर्वी अहमदनगर जिल्ह्यात शाळा कोसळून झालेल्या अपघातानंतर जिल्ह्यातील शाळांचा सर्व्हे केला गेला. त्यात येथील शाळा धोकादायक असल्याचा अहवाल दिला गेला आणि शाळेतील खोल्या जमिनदोस्त करण्यात आल्या.
पक्षाच्या चिन्हाबाबत निर्णय घेऊ नका, सुप्रीम कोर्टाची सूचना, खंडपीठाकडे सोपवण्याबाबत सोमवारी निर्णय
राज्यात उद्धव ठाकरे आणि शिंदे गट आमने-सामने असून सुप्रीम कोर्टाकडून आजही निर्णय येऊ न शकल्याने सत्तासंघर्ष कायम राहणार आहे. सुप्रीम कोर्टामध्ये सुनावणी सुरु झाला असता पुन्हा एकदा शिंदे गटाचे वकील हरिश साळवे यांनी १० व्या सूचीचा मुद्दा उपस्थित केला. पक्षांतरबंदी कायदा हा असंतोष विरोधी कायदा असू शकत नाही असा युक्तिवाद हरिश साळवे यांनी केला. तर दुसरीकडे उद्धव ठाकरे गटाचे वकील कपिल सिब्बल यांनी हे प्रकरण मोठ्या घटनापीठाकडे सोपवण्याची गरज नाही असं मत मांडलं. दरम्यान सुप्रीम कोर्टाने निवडणूक आयोगाच्या अधिकारांमध्ये हस्तक्षेप करु शकत नाही असं सांगत त्यांना पुढील सुनावणीपर्यंत कोणताही निर्णय घेऊ नका अशी सूचना केली आहे. सोमवारी याप्रकरणी पुढील सुनावणी होणार आहे.
माझी तुझी रेशीमगाठमध्ये मंगळागौरीचा उत्साह, नेहा-परीचा मराठमोळा लुक आला समोर
श्रावण सुरू झाला आणि श्रावणात रंगणाऱ्या मंगळागौरीच्या खेळांदेखील सुरुवात झाली आहे. टेलिव्हिजनच्या सगळ्या नायिका देखील त्यांच्या मंगळागौरी मोठ्या दणक्यात साजऱ्या करताना दिसणार आहेत. नुकतीच आई कुठे काय करते मालिकेत अनघा आणि संजनाची पहिली मंगळागौर प्रेक्षकांना पाहायला मिळाली आहे. काहीच दिवसात नेहाची देखील पहिली मंगळागौरी प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे. नेहाची देखील पहिली मंगळागौर असणार आहे. चौधरींच्या घरात प्रवेश केल्यानंतर नेहाचा हा पहिलाच मोठा सण असणार आहे. त्यासाठी सर्वांनी तयारी सुरू केली आहे. माझी तुझी रेशीमगाठ मालिकेचा मंगळागौरी विशेष भागाचं शुटींग नुकतंच पूर्ण झालं आहे. नेहाच्या मंगळागौरीची तयार आणि नेहा परीचा खास लुक देखील समोर आला आहे.
सुप्रीम कोर्टात सुनावणी सुरू असतानाच ‘वर्षा’वर घडामोडी, मुख्यमंत्री निवासस्थान बदलणार!
सुप्रीम कोर्टामध्ये महाराष्ट्र सरकारच्या भवितव्यावर सुनावणी सुरू असतानाच इकडे मुंबईत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या निवासस्थानाहून मोठी घडामोड समोर येत आहे. मुख्यमंत्र्यांचं शासकीय निवासस्थान असलेल्या वर्षा बंगल्यावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नावाची पाटी लावण्यात आली आहे, त्यामुळे आता शिंदे वर्षा बंगल्यावर राहायला जाणार का? हा प्रश्न उपस्थित होत आहे.
एकनाथ शिंदे 2014 पासून मलबार हिलमधल्या नंदनवन या शासकीय निवासस्थानातून आपला कारभार चालवत आहेत, पण आता ते वर्षा या निवासस्थानी राहायला जाणार का? असा सवाल विचारला जातोय कारण अखेर एक महिन्यानंतर वर्षा निवासस्थानाला एकनाथ शिंदेंच्या नावाची पाटी लावली गेलीय तसेच वर्षा बंगल्याची रंगरंगोटी देखील पुर्ण झाली आहे.
तैवानसाठी सोडलं अन् जपानमध्ये पोहोचलं; China-Taiwan मिसाइल्स हल्ल्यातील विचित्र घटना
अमेरिकी स्पीकर नैन्सी पेलोसी यांच्या तैवान यात्रेमुळे चीन संतापल्याचं दिसत आहे. चिनी सैनिकांनी तैवान बॉर्डरवर अनेक मिसाइल्स सोडल्या आहेत. सैन्य अभ्यासाच्या दरम्यान तैवानच्या जवळपास असलेल्या पाण्यात अनेक बॅलिस्टिक मिसाइल्स सोडण्यात आल्या आहेत. ताइपेच्या संरक्षण मंत्रालयाने ही शांतता भंग करणारी तर्कहीन कारवाई असल्याचं म्हटलं आहे.
दरम्यान हाती आलेल्या माहितीनुसार, काही मिसाइल्स या जपानवरही पडल्याची माहिती समोर आली आहे. पहिल्यांदाच अशी काही घटना घडल्याचं सांगितलं जात आहे. जपानच्या economic zone मध्ये हा मिसाइल्स हल्ला झाल्याचं समोर आलं आहे. आता जपान यावर काय प्रतिक्रिया देणार याकडे अनेकांचे लक्ष आहे.
भारतीय खेळाडूंची चमकदार कामगिरी; उंच उडी, ज्युडो, वेटलिफ्टिंग आणि स्क्वॉशमध्ये केली पदकांची कमाई
राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेमध्ये भारतीय खेळाडूंची विजयी घौडदौड सुरुच आहे. भारतीय खेळाडूंनी एकाच दिवसात चार वेगवेगळ्या प्रकारांमध्ये चार पदकांची कमाई केली आहे. विशेष म्हणजे राष्ट्रकुल स्पर्धांमध्ये पहिल्यांदाच भारताला उंच उडी प्रकारामध्ये तेजस्वीन शंकरने कांस्य पदक पटकावत पदकाची कमाई करुन दिलीय. याचप्रमाणे वेटलिफ्टिंगमध्येही भारताच्या गुरदीप सिंगने कांस्य पदक पटाकवलं आहे तर महिलांच्या ७८ किलो वजनी गटात महिला ज्युडोपटू तुलिका मानने रौप्य पदकावर नाव कोरलं. याचप्रमाणे स्क्वॉशमध्ये सौरभ घोषालने भारतासाठी कांस्य पदकाची कमाई केली.
SD Social Media
9850 60 3590