मधमाशी ठरतेय संजीवनी! राज्यात 5 हजारांवर शेतकरी मधातून कमावतात लाखो रुपये

मधमाशी म्हटली की थोडी भिती मनात असतेच. मात्र लहानपणी खोकला आल्यावर आईने प्रेमाने चाटवलेल्या मधाची आठवण येते. फुलांभोवती रुंजी घालून हळूच त्यावर विसावणाऱ्या मधमाशीचे छायाचित्रही तेवढेच लोभस आणि छायाचित्रकरांसाठी आकर्षण असते, तर निसर्गप्रेमींसाठी ती पर्यावरणाचा एक महत्वाचा घटक आहे. अशा मधमाशीचा दिवस दि. २० मे रोजी साजरा होतो. दरम्यान महाराष्ट्रात मधमाशी पालनातून अनेक शेतकऱ्यांनी आपली आर्थिक उन्नती केली आहे.

महाराष्ट्रातील पश्चिम घाट हा भाग पर्वत रांगानी उभारलेला आहे तर मेळघाटामुळे उत्तर भाग नटलेला आहे. यामुळे राज्यातील बहुतांश भागात मधमाशी पालनासाठी पुरक वातावरण आहे. दरम्यान शासनाकडून राज्यातील शेतकऱ्यांना मधमाशा पालन व्यवसाय एक प्रमुख उद्योग व्हावा या दृष्टीने विविध योजना राबवण्यात येत आहेत. राज्यातील 31 जिल्ह्यातील 185 तालुक्यातील 1 हजार 147 गावामधील 5 हजार 103 हून अधिक शेतकरी मधमाशा पालनाकडे वळले आहेत. मधमाशापालनातून शेतकऱ्यांची आर्थिक उन्नती होण्यास मदत होत आहे.

मधमाशी केवळ मध आणि मेण देत नाही तर केलेल्या परागीकरणामुळे पीक उत्पादन वाढते शिवाय उत्पादनाची प्रतही सुधारते. शेतीबरोबरच डोंगरदऱ्यातील नागरिकांनी उत्पन्नाचे अन्य पर्याय म्हणून मधमाशा पालनासारख्या व्यवसायाची निवड केली आहे. पश्चिम घाटातील डोंगर दऱ्या व अतिदुर्गम भागात राहणाऱ्या लोकांना मधमाशापालन हा उद्योग आर्थिक स्थैर्य देत आहे.

सातेरी मधमाशापालनात अहमदनगर, पुणे, धुळे, नंदुरबार, सांगली, सातारा, कोल्हापूर या जिल्ह्यातील सह्याद्रीच्या रागांमधील तालुक्यांचा समावेश आहे. वर्षभर सदाहरीत असणाऱ्या जंगलभागात मोठ्या प्रमाणात सातेरी मधमाशापालन करण्यास वाव आहे. सध्या हजारो मधपाळ शास्त्रोक्त पध्दतीने मधमाशापालन करत आहेत. जंगलातील विविध वनस्पतीपासून मिळणारा मध औषधीमुल्य असणारा आहे.

मराठवाड्यातील सर्व जिल्ह्यात मेलीफेरा मधमाशापालनास मोठा वाव आहे. मध हा शरीराला अत्यंत उपयुक्त घटक आहे. मध शक्तीदायक व पौष्टिक अन्न व औषध आहे. मधमाशापासून मेण मिळते. मेणाचा उपयोग सौंदर्य प्रसाधने, औषधे, चर्च मधील मेणबत्या तयार करण्यासाठी होतो. परागीभवनामुळे शेतीपीक उत्पादनात वाढ होत आहे. पराग व मधमाशांचे विष संकलन होत असून रॉयलजेलीचेही संकलन होत आहे. सातारा जिल्ह्यातील महाबळेश्वर तालुक्यातील 18 गावातील 158 मधपाळ शेतकरी व कोल्हापूर जिल्ह्यातील राधानगरी, भुदरगड, आजरा या तालुक्यातील 33 गावातील 83 मधपाळ शेतकरी सेंद्रीय पध्दतीने मध संकलन करत आहेत.

राज्यात 16 हजार 400 मधमाशांच्या वसाहती

राज्यातील 31 जिल्ह्यातील 185 तालुक्यातील 1 हजार 147 गावांमध्ये 5 हजार 103 मधपाळ असून त्यांच्याकडे सातेरी मधमाशांच्या 18 हजार 378 तर मेलीफेरा मधमाशांच्या 12 हजार 450 अशा मिळून 30 हजार 828 मधपेट्या आहेत. सातेरी मधमाशांच्या चालू वसाहतीची संख्या 9 हजार 273 तर मेलीफेरा वसाहतीची संख्या 7 हजार 122 असे मिळून 16 हजार 395 मधमाशांच्या वसाहती आहेत.

मध उद्योगास पोषक जिल्हे…

राज्यात सातारा, कोल्हापूर, सांगली, सोलापूर, पुणे, सिंधुदुर्ग, रत्नागिरी, रायगड, ठाणे, पालघर, नाशिक, नंदुरबार, जळगाव, अकोला, बुलढाणा, हिंगोली, वाशिम, परभणी, बीड, लातूर, नांदेड, उस्मानाबाद, यवतमाळ, वर्धा, अमरावती, भंडारा, चंद्रपूर, गडचिरोली हे जिल्हे मध उद्योगास पोषक आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

scroll to top
error: आपल्याला माहिती कॉपी करण्याची परवानगी नाही.