केंद्र सरकारकडून केल्या जात असलेल्या कृत्रिम महागाईविरोधात काँग्रेसने 31 मार्चपासून आंदोलनाचा सप्ताह सुरु केला आहे. या आंदोलनाचा एक भाग म्हणून 7 तारखेला मुंबईत मोर्चा काढून महागाईविरोधात आवाज उठवला जाणार आहे’, अशी माहिती काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी दिलीय. तसंच केंद्रातील भाजपा सरकार दररोज इंधन दरवाढ करत आहे. पेट्रोल, डिझेल, एलपीजी गॅस, खाद्यतेल, जिवनावश्यक वस्तुंचे दर सामान्य जनतेच्या आवाक्याबाहेर गेले आहेत. लोकांचे जगणे कठीण झाले आहे. या महागाईविरोधात जनतेत तीव्र असंतोष आहे. केंद्र सरकारला जागं करण्यासाठी काँग्रेसनं हे आंदोलन हाती घेतल्याचं पटोले यांनी सांगितलं.
काँग्रेसकडून 31 मार्चपासून देशभर विविध पद्धतीने आंदोलन केले जात आहे, राज्यातही आंदोलन करुन मोदी सरकारचा निषेध करण्यात आला. या आंदोलनाची समाप्ती 7 तारखेच्या मोर्चाने होईल. 7 तारखेला गिरगाव चौपाटी ते ऑगस्ट क्रांती मैदानापर्यंत मोर्चा काढला जाणार आहे. या मोर्चात काँग्रेस पक्षाचे सर्व मंत्री, आमदार, पदाधिकारी सहभागी होतील. तसेच जनतेचाही मोठा सहभाग असणार आहे. नागरिकांनीही मोठ्या संख्येने या मोर्चात सहभागी व्हावे, असे आवाहन पटोले यांनी केले आहे.
शिवसेना खासदार संजय राऊत यांच्यावरील ईडीच्या कारवाईवर पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नावर पटोले म्हणाले, भाजपा केंद्रीय तपास यंत्रणांच्या मदतीने चिडीचा खेळ खेळत आहे. विरोधकांचा आवाज दाबण्यासाठी ईडीसारख्या केंद्रीय यंत्रणांचा गैरवापर मोठ्या प्रमाणात केला आहे.
राऊत यांच्यावरील कारवाई ही त्याच दबावतंत्राचा भाग आहे. परंतु अशा कारवायांना महाविकास आघाडी घाबरणार नाही. या दबाव तंत्राविरोधात एकत्रितपणे सामना करू. आम्ही सत्याच्या बाजूने आहोत तर भाजपा असत्याच्या बाजूने आहे. ईडीतील काही भ्रष्ट अधिकाऱ्यांची संजय राऊत यांनी तक्रार केलेली आहे. या तक्रारीची दखल घेत चौकशीसाठी एसआयटीची स्थापना केल्याची घोषणा सकाळी गृहमंत्री वळसे पाटील यांनी करताच काही तासातच संजय राऊत यांच्यावर ईडीची कारवाई होते यातूनच सर्व स्पष्ट होते, अशी टीकाही पटोले यांनी केलीय.
मशिदीसमोर समोर स्पीकर लावून हनुमान चालीसा लावणे हा प्रकार राज्यातील वातावरण बिघडवण्याचा प्रयत्न आहे. संविधानाने सर्वधर्म समभावाचे सूत्र दिले आहे. सर्व धर्मांना समान अधिकार दिलेले आहेत परंतु जे लोक संविधानच मानत नाहीत ते असे प्रयत्न करुन मुख्य विषयापासून जनतेचे लक्ष दुसरीकडे वळवण्याचा प्रयत्न करत आहेत असेही काँग्रेस प्रदेशाध्यक्ष म्हणाले. टिळक भवन येथे दुपारी पक्ष पदाधिकारी यांची बैठक संपन्न झाली. या बैठकीत महागाईमुक्त भारत आंदोलनाच्या पूर्व तयारीचा आढावा घेण्यात आला.