केंद्रातील नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली भारतीय जनता पक्षाच्या सरकारला सर्वसामान्य जनतेशी काही देणे घेणे राहिलेले नाही. मोदी सरकारकडून दररोज इंधन दरवाढ करून सर्वसामान्यांची लूट केली जात आहे. लोकांच्या कष्टाच्या कमाईची लूट करणा-या मोदी सरकारला सत्तेवर राहण्याचा नैतिक अधिकार राहिला नसून त्यांनी राजीनामा द्यावा, अशी मागणी काँग्रेस विधिमंडळ पक्षाचे नेते आणि महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी केली. इंधन दरवाढ आणि महागाई विरोधात काँग्रेस पक्षातर्फे देशव्यापी महागाईमुक्त भारत अभियान राबवून आंदोलन करण्यात येत आहे.
शुक्रवारी काँग्रेसच्या वतीने महसूल मंत्री थोरात यांच्या नेतृत्वाखाली पुणे येथील अलका चौकात महागाईची गुढी उभारून, घोषणाबाजी करत केंद्र सरकारच्या निषेधार्थ आंदोलन करण्यात आले.
माजी मंत्री व प्रदेश कार्याध्यक्ष बसवराज पाटील यांच्या नेतृत्वाखाली उस्माबाद जिल्ह्यातील उमरगा येथे काँग्रेस पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी वाढत्या महागाईविरोधात आंदोलन करत मोदी सरकारचा निषेध केला. चंद्रपूर, सिंधुदुर्ग, धुळे शहर, नाशिक शहर, लातूरसह राजाच्या इतर भागातही महागाईमुक्त भारत आंदोलन करत केंद्र सरकारच्या विरोधात घोषाबाजी करण्यात आली. महागाईविरोधातील आंदोलन हे विविध कार्यक्रमासह आठवडाभर राबविले जाणार आहे.