ललित यादव आणि अक्षर पटेल यांच्या जबरदस्त खेळाच्या बळावर दिल्ली कॅपिटल्सने आयपीएल 2022 मध्ये विजयी सुरुवात केली आहे. खरंतर या सामन्यात एक वेळ अशी होती की, मुंबई इंडियन्स हा सामना सहज जिंकेल असं वाटलं होतं. पण मुंबई इंडियन्सने हा सामना चार विकेटने गमावला. ललित यादव आणि अक्षर पटेलने सातव्या विकेटसाठी 30 चेंडूत नाबाद 75 धावांची भागीदारी केली.
ललित यादव नाबाद (48) आणि अक्षर पटेलने नाबाद (38) धावा केल्या. मुंबईने प्रथम फलंदाजी करताना 177 धावा केल्या होत्या. एकवेळ दिल्लीची अवस्था सहाबाद 104 अशी होती. पण अखेरीस त्यांनी 10 चेंडू राखून विजय मिळवला. आयपीएलमध्ये सलामीचा सामना न जिंकण्याचा सिलसिला मुंबईने कायम राखला आहे.
दिल्ली कॅपिटल्सला टिम सायफर्टने दमदार सुरुवात करुन दिली होती. तो स्फोटक फलंदाजी करत होता. अश्विनने त्याला क्लीन बोल्ड केलं. सायफर्टने 21 धावा केल्या. त्यानंतर मनदीप सिंहला भोपळाही फोडू न देता तिलक वर्माकरवी अश्विनने झेलबाद केलं. कॅप्टन ऋषभ पंतही अवघ्या एक रन्सवर आऊट झाला. वेगवान गोलंदाज मिल्सने त्याला डेविड करवी झेलबाद केले. एकाबाजूने दमदार फलंदाजी करणारा पृथ्वी शॉ ही बाद झाला. बासील थंपीच्या गोलंदाजीवर इशान किशनने त्याचा जबरदस्त झेल घेतला.
पृथ्वी शॉ ने 38 धावा केल्या. दिल्लीची स्थिती तेव्हा चार बाद 72 होती. शार्दुल ठाकूर बाद झाला, तेव्हा मुंबई हा सामना सहज जिंकेल असं वाटत होतं. पण ललित यादव नाबाद (48) आणि अक्षर पटेलने नाबाद (38) मुंबईचा विजयाचा घास हिरावला. प्रमुख गोलंदाज जसप्रीत बुमराहने आज मार खाल्ला. त्याने 3.2 षटकात 43 धावा दिल्या. डॅनियल सॅम्सने तर 17 व्या षटकात 24 धावा दिल्या. तिथेच सामना दिल्लीच्या बाजूने झुकला.
मुंबई इंडियन्सने इशान किशनच्या नाबाद 81 धावांच्या खेळीच्या बळावर 177 धावा केल्या. किशनने कॅप्टन रोहित शर्मासोबत मिळून टीमला चांगली सुरुवात दिली होती. दोघांनी पहिल्या विकेटसाठी 67 धावांची भागीदारी केली. रोहितने 41 धावा केल्या. रोहितने सुद्धा काही चांगले फटके खेळले. खलील अहमदच्या गोलंदाजीवर शार्दुल ठाकूरने त्याचा सोपा झेलही सोडला. रोहितने 32 चेंडू खेळताना चार चौकार आणि दोन षटकार मारले.
तिसऱ्या क्रमांकावर आलेला अनमोलप्रीत सिंह काही खास करु शकला नाही. कुलदीप यादवने त्याची विकेट काढली. मुंबईकडून आज डेब्यू करणाऱ्या सिंगापूरच्या टिम डेविड आणि तिलक वर्मानेही आपल्या छोटेखानी फलंदाजाने प्रभावित केलं. तिलकने 15 चेंडूत 22 धावा केल्या. यात तीन चौकार होते. टिम डेविडने आठ चेंडूत 12 धावा केल्या. यात एक षटकार होता.