एखाद्या पिकाचे वाण तयार होते ते कृषी विद्यापीठात किंवा कृषी संशोधन केंद्रामध्येच होते असे तुम्हाला वाटत असेल तर तो तुमचा मोठा गैरसमज आहे. कारण चंद्रपूर जिल्ह्यातील एका शेतकऱ्याने (Soybean Variety) सोयाबीनचे वाण मार्केटमध्ये आणण्यासाठी बारा वर्षाची तपश्चर्या केली आहे. मात्र, संशोधनामध्ये सातत्य ठेवल्याने त्यांच्या प्रयत्नाला यश आले आहे. जिल्ह्यातील वायगाव भोयर येथील सुरेश गरमडे यांनी हे अनोखे संशोधन केले आहे. याला (Central Government) केंद्र सरकारच्या वनस्पती विविधता आणि शेतकरी हक्क संरक्षण प्राधिकरणाने कायदेशीर मान्यता मिळाली आहे. त्यामुळे आता हे सोयाबीनचे एसबीजी-997 हे बाजारात विक्रीची परवानगी मिळाली आहे. त्यामुळे यंदाच्या हंगामापासून नवे वाण बाजारात येणार आहे.
शेतकरी सुरेश गरमडे यांना सोयाबीनच्या शेतामध्ये दोन वेगवेगळ्या वनस्पती आढळून आल्या होत्या. सलग 8 वर्ष त्यांनी या वाणाचे संवर्धन केले एवढेच नाही तर त्यामध्ये वाढ करीत गेले. प्रतिकूल वातावरणात हे सोयाबीनचे वाण रोगाला बळी पडत नसून एकरी 17 क्विंटल उत्पादन यामधून मिळत आहे. एका सोयाबीनच्या झाडाला 140 शेंगा आणि त्याही 3 ते 4 दाण्याच्या लागतात. त्यामुळे उत्पादनात वाढ होते. याशिवय इतर जातीच्या तुलनेत या सोयाबीनमध्ये तेलाचे प्रमाणही अधिकचे आहे.
मंजुरीसाठी केंद्राकडे हा प्रस्ताव पाठवण्यापूर्वी चंद्रपूर येथील कृषी विभागाने या वाणाची पाहणी केली होती. या दरम्यान एक सारखाच निष्कर्ष हाती पडत होता. त्यामुळेच इतर शेतकऱ्यांना उपयोगी पडेल अशा वाणाचे पेटंट करण्यासाठी त्यांनी एक प्रस्ताव तयार करुन वनस्पती विविधता या विभागाकडे पाठवला होता. यावर अभ्यास करुन अखेर त्याला मंजूरी मिळालेली आहे. यामध्ये कृषी विभागाचेही मोठे योगदान आहे.
गरमडे यांनी राहुरी कृषी विद्यापीठाच्या माध्यमातून या वाणाला पेटंट मिळावे म्हणून पुणे येथील स्थापन झालेल्या पेटंट प्राधिकरण कार्यालयात पाठवले होते. तीन वर्षापूर्वी हा प्रस्ताव दिल्ली येथील कार्यालयात होता. तीन वर्ष सोयाबीन संशोधन केंद्रमाध्ये या वाणाचा मागोवा घेण्यात आल्यानंतर हे वाण सरस असल्याचे आढळून आले आहे. या प्रक्रियेनंतरच गरमडे यांची 12 वर्षाची तपश्चर्या कामी आली असून त्यांना कृषी विभागाचेही मोलाचे सहकार्य राहिल्याचे कृषी अधीक्षक भाऊसाहेब वऱ्हाटे यांनी सांगितले आहे.