भाजप नेते आणि माजी खासदार किरीट सोमय्या यांच्यावर पुण्यात शिवसैनिकांनी जीवघेणा हल्ला केल्याचा आरोप भाजपकडून करण्यात आलाय. सोमय्या पुणे दौऱ्यावर होते. त्यावेळी शिवसेना खासदार संजय राऊत यांच्यावर गुन्हा दाखल करण्याच्या मागणीसाठी ते शिवाजीनगर पोलीस ठाण्यात जाणार होते. मात्र त्यापूर्वीच पुणे महापालिका परिसरात शिवसैनिकांकडून सोमय्या यांना रोखण्याचा प्रयत्न करण्यात आला. यावेळी झालेल्या गोंधळात किरीट सोमय्या हे पायऱ्यांवर पडल्याचंही पाहायला मिळालं. या पार्श्वभूमीवर भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी किरीट सोमय्या यांना ठार मारण्याचा हेतू होता असा गंभीर आरोप केला आहे. महापालिकेची सुरक्षा कुठे होती? पोलीस कुठे होते? असा सवालही पाटील यांनी यावेळी विचारलाय.
महापालिकेच्या आवारात आयुक्तांना भेटायला आलेल्या सोमय्यांवर प्राणघातक हल्ला करण्यात आला. एकजण दगड घेऊन धावत होता. सोमय्यांना मारण्याची पूर्ण योजना झाली होती. सत्य लपणार नाही. सोमय्या यांच्या हाताला दुखापत झालीय. त्यांच्या कंबरेला मार लागला आहे. आज त्यांना ठार मारण्याचाच हेतू होता. महापालिकेची सुरक्षा कुठे होती? पोलीस कुठे होते? केंद्र सरकारची सुरक्षा नसती तर आज सोमय्यांना श्रद्धांजली वाहावी लागली असती, असा हल्लाबोल पाटील यांनी केलाय.
किरीट सोमय्या यांच्यावरील हल्ल्यानंतर आता भाजप नेतेही आक्रमक बनले आहेत. ‘भ्रष्टाचाराची घबाडं ज्यांची उघड झाली त्यांना आता तोंड लपवण्यासाठी जागा न उरल्यामुळे हल्ले करु लागले आहेत. पण सत्य हल्ले करुन, दमदाटी, मारामारी करुन लपणार नाही. सत्य समोर येणारच! किरीट सोमय्या यांच्यासोबत आम्ही सगळे आहोत’, असं ट्वीट भाजप आमदार आशिष शेलार यांनी केलंय.
भाजप आमदार प्रसाद लाड यांनीही ठाकरे सरकारवर आणि शिवसेनेवर जोरदार टीका केलीय. ‘कर नाही, त्याला डर कशाचा! किरीट सोमय्या यांच्यावर झालेला हल्ला म्हणजे सरकार असल्याचा दुरुपयोग असून, सत्ताधारी कार्यकर्त्यांनी असे हल्ले करणं निषेधार्थ आहे. किरीटजींनी केलेल्या आरोपांचे उत्तर द्या, अशा भ्याड हल्ल्यांना ते घाबरणार नाहीत!’, असा इशाराच प्रसाद लाड यांनी शिवसेनेला दिलाय.