आज दि.२५ जानेवारी च्या दिवसभरातील ठळक घडामोडी अशा….

आश्वासनं देणाऱ्या राजकीय पक्षांना
आता चांगलाच फटका बसणार

निवडणुकांच्या आधी मोफत सुविधा देणाऱ्या किंवा तशी आश्वासनं देणाऱ्या राजकीय पक्षांना आता चांगलाच फटका बसणार आहे. सर्वोच्च न्यायालयाने याबाबत केंद्र सरकार आणि निवडणूक आयोगाची मतं मागवली आहेत. भाजपा नेत्याने दाखल केलेल्या एका जनहित याचिकेमध्ये अशा पक्षांवर कारवाई करण्याची मागणी केली आहे. भारताचे सरन्यायाधीश एन व्ही रमण आणि न्यायमूर्ती ए.एस. बोपण्णा व हिमा कोहली यांच्या खंडपीठाने हे आदेश दिले आहेत. निवडणुकीपूर्वी मोफत सुविधांची आश्वासनं देणाऱ्या पक्षांची निवडणूक चिन्ह जप्त करावी की त्यांच्या पक्षाची नोंदणी रद्द करावी.

हेडगेवारांनी सुभाषचंद्र बोस यांची
भेट नाकारली होती : नितीन राऊत

काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी मोदी नावाचा उल्लेख करत केलेल्या वक्तव्यामुळे आधीच भाजपा आक्रमक झाली असताना आता ऊर्जामंत्री नितीन राऊत यांनी केलेल्या वक्तव्यामुळे वाद निर्माण होण्याची शक्यता आहे. अटकेच्या भीतीपोटी सरसंघचालक हेडगेवारांनी सुभाषचंद्र बोस यांची भेट नाकारली होती असा दावा नितीन राऊत यांनी केला आहे. ज्यांनी जातींमध्ये तंटे निर्माण केले तेच आपल्याला आज शहाणपण शिकवत आहेत असं देखील नितीन राऊत म्हणाले आहेत. ते यवतमाळमधील वणी येथे आयोजित कार्यक्रमात बोलत होते.

लतादीदींची प्रकृतीत सुधार

लतादीदींची प्रकृती सुधारत असल्याची माहिती डॉ. प्रतीत समदानी यांनी दिली आहे. लतादीदींच्या प्रकृतीबाबत रोज अपडेट्स देणं शक्य नाही. काही गोष्टी या खासगी असू शकतात त्यामुळे प्रत्येकवेळी अपडेट देणं शक्य होईलच असं नाही. सगळ्यांच्या प्रार्थनांमुळे लतादीदींची प्रकृती सुधारत आहे. कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नका. कोणतीही अधिकृत माहिती आल्याशिवाय त्यावर विश्वास ठेवू नका असं आवाहन यावेळी डॉक्टरांनी केलं आहे

अपर पोलिस महासंचालक
संजय लाठकर यांना राष्ट्रपती पदक

भारतीय पोलीस सेवेतील १९९५ बॅचचे झारखंड राज्यात कार्यरत असलेल्या अपर पोलिस महासंचालक, (कायदा व सुव्यवस्था) संजय आनंदराव लाठकर, यांना प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येस उल्लेखनीय सेवेसाठी राष्ट्रपती पदक घोषित करण्यात आले आहे. प्रतिष्ठित मानला जाणारा बहुमान हा देशातील पोलीस दलातील निवडक अधिकाऱ्यांना दिला जातो. संजय लाठकर यांनी भारतीय पोलीस सेवेत गेली २६ वर्षे देशातील बिहार, झारखंड, महाराष्ट्र राज्यात व सीआरपीएफ मध्ये सेवा बजावली आहे.

महाराष्ट्रातील 51 पोलिसांना पुरस्कार जाहीर, जळगावच्या राजाराम कोळी यांचा समावेश

पोलीस दलासाठी गौरवाची बाब असणाऱ्या पोलीस पदकांची आज घोषणा झाली. महाराष्ट्रातील एकूण 51 पोलिसांना हा पुरस्कार जाहीर झाला आहे. यातील चार पोलीस अधिकाऱ्यांना उत्कृष्ट सेवेकरिता ‘राष्ट्रपती विशिष्ट सेवा पदक’ ,7 ‘पोलीस शौर्य पदक’ तर प्रशंसनीय सेवेकरिता 40 ‘पोलीस पदक’ जाहीर झाली आहेत. राजाराम धर्मा भोई, पोलीस उपनिरीक्षक, जळगाव यांचा समावेश आहे.

निफाडमध्ये पारा 4.5 अंश सेल्शिअसवर

निफाडमध्ये पारा 4.5 अंश सेल्शिअसवर पोहोचला आहे, ज्यामुळं तिथे असणाऱ्या नागरिकांनाही काही अडचणींना सामोरं जावं लागत आहे. पाकिस्तानमधील धुळीच्या वादळानं अरबी समुद्रातून राज्यात प्रवेश केला आणि परिणामी राज्याचं तापमान कमी होई लागलं. तिथून उत्तरेकडून होणारा बोचऱ्या वाऱ्याचा माराही सुरुच. ज्यामुखं सबंध महाराष्ट्र सध्या गारठला आहे. द्राक्ष, कांदा यांसारख्या पिकांवर अधिक थंडीचा मारा झाल्यामुळं त्यांचं मोठं नुकसान होणार आहे. परिणामी निर्यातीवर थेट आघात झालेला दिसेल.

शफाली वर्मा बनली टी-२०मध्ये
जगातील नंबर वन महिला फलंदाज

आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने (ICC) जाहीर केलेल्या ताज्या टी-२० क्रमवारीत भारताची युवा महिला फलंदाज आणि ‘लेडी सेहवाग’ अशी ओळख असलेल्या शफाली वर्माला फायदा झाला आहे. शफाली पुन्हा एकदा टी-२०मध्ये जगातील नंबर वन महिला फलंदाज बनली आहे. श्रीलंकेची फलंदाज चमारी अटापट्टूनेही फलंदाजांच्या यादीत टॉप-१० मध्ये स्थान मिळवले आहे. ऑस्ट्रेलियाच्या बेथ मुनीने ऑक्टोबरमध्ये भारताविरुद्ध शेवटचा टी-२० सामना खेळला होता. त्याच मालिकेत चांगली कामगिरी केल्यानंतर तिने ७५४ रेटिंग गुणांसह पहिले स्थान पटकावले.

भीषण अपघातामध्ये आमदाराच्या
मुलासह सात विद्यार्थी ठार

वर्ध्यातील भीषण कार अपघातामध्ये भंडारा जिल्ह्यातील तिरोड्याचे आमदार विजय रहांगदळे यांच्या मुलावरही काळानं घाला घातला आहे. विजय रहांगदळे यांचे सुपुत्र यांचा वर्ध्यातील भीषण कार अपघातात मृत्यू झाला असल्याचं वृत्त हाती येतंय. रहांगदळे कुटुंबीयांवर शोककळा पसरली आहे. सात विद्यार्थ्यांचा या भीषण अपघातात मृत्यू झाला आहे. भाजप आमदार विजय रहांगदळे हे भंडारा जिल्ह्याचे आमदार आहेत. मुलासह एकूण सात विद्यार्थी या भीषण अपघातात दगावले असून इतर सहा जणांची अद्याप ओळख पटलेली नाही.

आनंद महिंद्रा यांनी दिली
लोहार यांना बोलेरो कार

सांगलीच्या देवराष्ट्रे येथील दत्तात्रय लोहार यांनी मुलाच्या हट्टापायी जुगाड करत त्यांच्या कल्पकतेने बनवलेल्या मिनी जिप्सीमुळे देवराष्ट्रेच्या दत्तात्रय लोहार यांची देशभरात ओळख झाली. महिंद्रा कंपनीचे मालक आनंद महिंद्रा यांनी चक्क बोलेरो देतो असे ट्विट केले. आज महिंद्रा कंपनीने बोलेरो दत्तात्रय लोहार यांना सुपूर्द केली आहे. लोहार यांनी मिनी जिप्सी कंपनीकडे दिली आहे.

संपत्तीसाठी आजीला
केले कुत्र्याच्या स्वाधीन

संपत्तीसाठी लोक कोणत्या थराला जातील याचा नेम नाही. याचेच उदाहरण म्हणून दिल्लीत एक मानवतेला काळिमा फासणारी घटना उघडकीस आली आहे. संपत्तीच्या वादातून चिडलेल्या नातवाने चक्क आपल्या आजीला लचके तोडण्यासाठी कुत्र्यांच्या स्वाधीन केल्याची धक्कादायक घटना दिल्लीतील ईस्ट नगर भागात घडली आहे. आजी गंभीर जखमी झाली आहे. याप्रकरणी तक्रार दाखल करण्यात आली. पोलिसांनी आरोपी नातवाविरोधात कमल 289 नुसार गुन्हा दाखल केला आहे. दिल्ली महिला आयोगानेही या प्रकरणाची दखल घेत आरोपींना अटक करण्यास सांगितले आहे.

SD social media
9850 60 35 90

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

scroll to top
error: आपल्याला माहिती कॉपी करण्याची परवानगी नाही.