सीमा देव यांचे माहेरचे नाव नलिनी सराफ. सीमा देव ह्या गिरगावात राहत होत्या. तीन बहिणी व एक भाऊ यांच्यापैकी त्या सगळ्यात लहान. त्यांचे वडील गोल्डन टोबॅकोमध्ये कामाला होते. दहा बाय चौदाच्या लहानशा खोलीत त्यांचे जवळजवळ आठ-दहा माणसांचं कुटुंब राहत असे. काही कारणाने कुटुंब चालवण्याची जबाबदारी सीमा देव आईवर पडली. पण जेव्हा थोडं आर्थिक स्थैर्य आलं तेव्हा त्यांनी सीमा देव यांना नृत्य शिकायला पाठवलं. कथ्थक शिकायचा विचार सोडून दिला. सीमा देव या नऊ वर्षाची असताना एका बॅलेमध्ये गेल्या. आमच्या शेजारी राव म्हणून फॅमिली होती. त्यांनी भारती विद्या भवनमध्ये होणाऱ्या या बॅलेबद्दल सांगितलं. त्यात त्या काम करू लागले. ‘राम’ नावाच्या बॅलेमध्ये कनक रेळे सीतेचं काम करत. ‘गीत गोविंद’ आणि ‘नुरजहाँ’, हे आणखी दोन बॅले होते. विरेंद्र देसाई यांनी हे बॅले बसवले होते. त्यांना या बॅलेच्या एका शोचे वीस रुपये मिळत होते. दर महिन्याच्या शनिवार-रविवारी त्या बॅलेत काम केल्यावर ऐंशी रुपये मिळायचे. घरासाठी ते खूप होते. इब्राहिम नाडियादवाला एकदा हे बॅले पाहायला आले. या बॅलेत आशा पारेख नुरजहाँची भूमिका करत असे तर सीमा देव धोबिणीची भूमिका करायच्या. इब्राहिम नाडियादवाला यांनी आशा पारेख आणि सीमा देव यांना चित्रपटात काम करणार का, असं विचारलं. चित्रपटाचं नाव होतं ‘अयोध्यापती’. उषा किरण, अचला सचदेवही त्यात होत्या. या चित्रपटात सीमा देव यांनी लक्ष्मणाच्या पत्नीची म्हणजे ऊर्मिलाची भूमिका केली होती. दोघींचं शूटिंग झालं, मात्र आम्हाला अजिबात संवाद नव्हते. आम्ही दररोज सजूनधजून सेटवर बसून राहत असू. मात्र त्या कामाचे त्यांना त्या काळात पाचशे रुपये मिळाले होते. तो काळ होता १९५७ चा. निवेदिता जोशी यांचे वडील गजानन जोशी यांनी त्यावेळी रंगभूमीवर प्रयोग सुरू असलेल्या ‘अंमलदार’ या नाटकात काम करण्याबद्दल सीमा देव यांना विचारलं. प्रभाकर पणशीकर या नाटकात भूमिका करत होते. त्यातली कुंदाची भूमिका करण्यासाठी त्यांनी मला विचारलं. एका प्रयोगाचे तीस रुपये मिळणार होते. या नाटकाचे प्रयोग सुरू असतानाच त्या वेळच्या ‘लोकमान्य’ या वर्तमानपत्रात सीमा देव यांच्या कामाचं कौतुक छापून आलं होतं. हे नाटक सुरू असतानाच सीमा देव यांना असे समजले की फिल्मिस्तान मराठी चित्रपटाची निर्मिती करत आहे. सीमा देव रेल्वेने गोरेगावला जायला निघाल्या. पुढच्याच स्टेशनवर म्हणजे ग्रॅण्ट रोडवर त्यांच्या डब्यात एक तरुण चढला. तो चित्रपटात काम करणाराच होता. ते रमेश देव होते. मात्र त्यावेळी एका चित्रपटात त्यांची खलनायकी भूमिका गाजली होती. जालान त्यावेळी फिल्मिस्तानचे मालक होते. दत्ता धर्माधिकारी या चित्रपटाचं दिग्दर्शन करणार होते. चित्रपटाचं नाव होतं ‘आलिया भोगासी’. यात जयश्री गडकर या प्रमुख भूमिकेत होत्या. सीमा देव यांनी फिल्मिस्तान एकूण तीन चित्रपटांत लहानसहान भूमिका केल्या. फिल्मिस्तानमध्ये त्यांनी रमेश देव यांच्या बरोबरही एका चित्रपटात काम केलं. फिल्मिस्तान सोडल्या नंतर, व्ही. शांताराम यांचे कनिष्ठ बंधू व्ही. अवधूत ‘ग्यानबा तुकाराम’ या सिनेमाची जुळवाजुळव करत होते. हा चित्रपट सीमा देव यांना मिळाला. याच चित्रपटाच्या काळात सीमा देव व रमेश देव यांचे प्रेम जमलं, या चित्रपटात ते एका बैलगाडीवर ठेवलेल्या गवतात बसलेले आहेत, असा सीन होता. बैलगाडी दूरवर नेण्यात आली. शॉट घेणार तेवढ्यात एक ढग आला. त्यामुळे त्यांनी सांगितलं की, तिथेच बसून राहा. ते दोघे तिथे बसले असतानाच रमेश देव यांनी त्यांना विचारलं, ‘माझ्याशी लग्न करशील का ? त्यानंतर सहा वर्षांनी एक जुलै १९६३ ला त्यांचा विवाह झाला, तो कोल्हापूर येथील राजाराम थिएटरमध्ये. चित्रपटसृष्टीतील एव्हरग्रीन जोडपे म्हणून अमिताभ आणि जया यांच्या तोडीस तोड रमेश व सीमा देव यांचे उदाहरण दिले जाते.रमेश देव यांच्याबरोबरच्या त्यांच्या संसाराचं वर्णन तर एक दाम्पत्यजीवन असंच करावं लागेल. फिल्मिस्तान मध्ये काम करत असताना तेव्हा सीमा देव यांनी आपले नाव बदलेले कारण त्यावेळी चित्रपटसृष्टीत तीन नलिनी होत्या. एका ज्योतिषांनी त्याच्या आईला हिचं नाव ‘स’वरून ठेवा, असं सांगितलं होतं. मॅजेस्टिकमध्ये तेव्हा एक चित्रपट लागला होता, त्यातल्या नायिकेचं नाव सीमा होतं, म्हणून सीमा देव यांच्या भावाने, त्यांना आपण सीमा हे नाव ठेवू या, असं सुचवलं.
सीमा देव यांचे गुरु राजा परांजपे. ‘सुवासिनी’, ‘जगाच्या पाठीवर’ या आपल्या त्याकाळी प्रचंड गाजलेल्या चित्रपटांचे अनुभव सांगताना सीमा देव यांनी राजाभाऊ परांजपे यांच्यासारखे गुरू मिळणे हे आपले भाग्यच होते असे म्हणतात. कारण इतक्या बारीकसारीक गोष्टी ते समजावून सांगायचे की राजाभाऊंसमोर ‘मला जमत नाही’ असे म्हणणे फारच अवघड होऊन बसायचे. त्यांनी घेतलेल्या अभिनयाच्या ‘तालमी’ मुळेच माझा अभिनय परिपूर्ण झाला आणि मराठीप्रमाणे हिंदीतही मला अनेक चित्रपटांत कामे मिळाली, असे त्यांनी सांगितले. राजा परांजपे यांच्या प्रमाणेच राजा ठाकूर आणि मधुकर उर्फ बाबा पाठक या दिग्दर्शकांची ही त्यांना खूप मदत झाली. सीमा देव यांनी मराठी प्रमाणेच हिंदी चित्रपटातही अनेक दिग्गज दिग्दर्शक आणि नामवंत कलाकारांबरोबर काम केले. सीमा देव या बाबत एका मुलाखतीत म्हणतात, संजीव कुमार सारख्या संवेदनशील अभिनेत्याबरोबर काम करताना मला सुरुवातीला अवघड वाटले होते मात्र जेंव्हा त्याने आपणहून ‘मी तुमचा ‘फैन’ आहे असे सांगितले तेव्हा मला खूप हायसे वाटले. आज त्या अभिनयाच्या क्षेत्रातून निवृत्त झाल्यात. मुलं, सुना, नातवंड यांच्यात रमल्यात. परंतु आपलं सुसंस्कृत व्यक्तिमत्त्व त्यांनी जसंच्या तसं जपलंय. घरंदाज सौंदर्य आणि आपल्या लाघवी अभिनयाने सीमा देव यांनी प्रेक्षकांना थोडीथोडकी नव्हे तर मराठी पंन्नासेक वर्ष भुरळ घातली. आपल्या कारकिर्दीत अनेक दिग्गज कलाकार आणि दिग्दर्शकांसोबत त्यांनी काम केलं. त्यांच्या अनेक भूमिकांचं कौतुक झालं. आपलं शालीन व्यक्तिमत्त्व त्यांनी काय जपलं. सीमा देव यांनी मराठी चित्रपटाबरोबरच काही हिंदी चित्रपटांमध्ये काम केलं. ‘आनंद’, ‘मर्द’, ‘रूप की रानी, चोरों का राजा’, ‘जय जय शिवशंकर, ‘संसार’ हे काही हिंदी चित्रपट.
त्यांनी “सुवासिनी” या नावाने आपले आत्मचरीत्र लिहिले आहे. सीमा देव यांना नुकतेच झी गौरवच्या जीवनगौरव पुरस्काराने गौरविण्यात आले आहे. या सोहळ्यात सीमा देव यांना जीवनगौरव पुरस्कार ज्येष्ठ अभिनेत्री सुलोचना दिदी यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला.सीमा देव यांना आपल्या समुहाकडून वाढदिवसाच्या शुभेच्छा. सध्या सीमा देव यांना अल्झयामर या आजाराने ग्रासलं आहे.
संजीव वेलणकर, पुणे.