जळगाव, : ‘कोविड- 19’ या विषाणूच्या प्रादुर्भावामुळे राज्य शासनाच्या उत्पन्नात मोठी घट झाली असूनही नागरिकांच्या आरोग्यासह त्यांचे जीवनमान उंचावण्यासाठी निगडित असलेल्या योजनांना राज्यातील महाविकास आघाडी शासन प्राधान्याने निधी उपलब्ध करून देत आहे, असे प्रतिपादन राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे- पाटील यांनी केले.
चोपडा, जि. जळगाव नगरपरिषदेच्या नूतन पाणीपुरवठा (अंदाजपत्रकीय रक्कम 64.76 कोटी रुपये) योजनेंतर्गत जलशुध्दीकरण केंद्र व जलकुंभाचा उद्घाटन सोहळा गृहमंत्री श्री. वळसे- पाटील यांच्या हस्ते सकाळी पार पडला. त्यावेळी ते बोलत होते. जळगाव जिल्ह्याचे पालकमंत्री तथा राज्याचे पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटील हे या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते. यावेळी आमदार अनिल पाटील, नगराध्यक्षा मनीषा चौधरी, जळगाव जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे अध्यक्ष गुलाबराव देवकर, विधानसभेचे माजी अध्यक्ष अरुणभाई गुजराथी, माजीमंत्री एकनाथराव खडसे आदी उपस्थित होते.
गृहमंत्री श्री. वळसे-पाटील म्हणाले, वाढत्या लोकसंख्येबरोबर पोलिस दलाची कामेही वाढली आहेत. या पार्श्वभूमीवर चोपडा आणि अडावद पोलिस ठाण्यांतर्गत येणाऱ्या पोलिसांच्या घरकुलांसाठी निधी उपलब्ध करून देण्यात येईल. पोलिस ठाण्यात आलेल्या प्रत्येक नागरिकाला आदराची वागणूक देऊन प्रत्येक नागरिकांची तक्रार सोडविण्याचे निर्देशही त्यांनी पोलिसांना दिलेत.
पालकमंत्री श्री. पाटील म्हणाले, पाणी हा मूलभूत प्रश्न आहे. प्रत्येक नागरिकाला पिण्याचे शुद्ध पाणी देण्यासाठी जलजीवन मिशनच्या माध्यमातून राज्यातील 27 हजार गावांमध्ये 15 हजार कोटी रुपये खर्चाचा पाणीपुरवठ्यासाठी कृती आराखडा तयार करण्यात आला आहे. यात जळगाव जिल्ह्यातील 828 गावांसाठी 926 कोटी रुपये खर्चाचा आराखडा तयार केला आहे. त्याबरोबर चोपडा शहराच्या विकासासाठी जिल्हा वार्षिक योजनेच्या माध्यमातून 26 कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करून दिला असून अडावदकरीता 28 कोटी रुपयांचा, तर धानोरा गावासाठी 15 कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करून दिल्याचे पालकमंत्री श्री. पाटील यांनी सांगितले.
यावेळी श्री. अरूण गुजराथी यांनी शहराकरीता भूमिगत गटार योजनेला मंजूरी मिळण्याची मागणी केली.
तापी सहकारी सूतगिरणीच्या जिनिंग
प्रेसिंग प्रकल्पाचे भूमिपूजन संपन्न
जळगाव जिल्ह्यातील तापी आणि गिरणा नदीच्या खोऱ्याचा भाग हा कापूस व केळी पिकासाठी ओळखला जातो. या भागातील कापूस उत्पादक शेतकऱ्यांना तापी सहकारी सूतगिरणीचा जिनिंग व प्रेसिंग प्रकल्प लाभदायक ठरेल, असे प्रतिपादन राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे- पाटील यांनी केले.
तापी सहकारी सूतगिरणीच्या धरणगाव रस्त्यावरील कार्यस्थळ परिसरात रेल मारुती जिनिंग व प्रेसिंगचे भूमिपूजन गृहमंत्री श्री. वळसे-पाटील यांच्या हस्ते आज दुपारी झाले. त्यावेळी ते बोलत होते. विधान सभेचे माजी अध्यक्ष प्रा. अरुणभाई गुजराथी हे कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते. आमदार अनिल पाटील, पंचायत समितीच्या सभापती कल्पना पाटील, उपसभापती सूर्यकांत खैरनार, सूतगिरणी चेअरमन तथा माजी आमदार कैलास पाटील, व्हा. चेअरमन प्रभाकर पाटील, माजीमंत्री एकनाथराव खडसे आदी उपस्थित होते.
गृहमंत्री श्री. वळसे- पाटील म्हणाले, शेतकऱ्यांची संस्था सचोटी व प्रामाणिकपणे चालली आहे. शेतकरी हिताची कामे होत असल्याने सहकारी संस्था प्रगती साधत आहेत. तापी सूतगिरणीचे चेअरमन माजी आ. कैलास पाटील यांचे नेतृत्वाखाली हा प्रकल्प चांगली प्रगती साधत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना नक्की फायदा होईल, असेही त्यांनी नमूद केले.
252 पोलीस अधिकारी, कर्मचारी निवासस्थानाचे वितरण.
महाराष्ट्र राज्य गृहनिर्माण व कल्याण महामंडळ मर्या. मुंबई यांच्याकडून बांधण्यात आलेल्या जळगाव येथील 252 पोलीस कर्मचारी निवासस्थान इमारती तसेच राखीव पोलीस निरिक्षक कार्यालय इमारतीचे उदघाटन समारंभाप्रसंगी गृहमंत्री बोलत होते.
गृहमंत्री म्हणाले की, आज २५२ सदनिकांचे वितरण करतांना मला खुप आनंद होत आहे. ह्या सदनिका सुसज्ज असून बांधकामाचा दर्जा देखील चांगला आहे. घर चांगले असेल तर कुटुंब आनंदी राहते आणि सहाजिकच याचा सकारात्मक परिणाम पोलिसांच्या कामावर होणार आहे. टप्पा २ चे काम पूर्ण करण्यासाठी निधींची कमतरता भासू देणार नाही. जिल्ह्यातील पोलिस स्टेशनच्या विकासाला प्राधान्य देताना प्राधान्याक्रमानुसार पोलिस स्टेशनचा दर्जा वाढविण्या बाबतही विचार करण्यात येईल. कायदा व सुव्यवस्था राखणे ही सर्वांची एकत्रित जबाबदारी असल्याचे सांगून पोलीस स्टेशनमध्ये येणाऱ्या प्रत्येक व्यक्तीच्या तक्रारीची दखल घेऊन त्यावर कार्यवाही होणे आवश्यक असल्याचेही गृहमंत्री म्हणाले.
यावेळी गृहमंत्री यांच्या हस्ते प्रातिनिधीक स्वरुपात पाच पोलीस कर्मचाऱ्यांना घराची चावी प्रदान करण्यात आली. यावेळी त्यांच्या हस्ते पोलीस मुख्यालय परिसरात वृक्षारोपणही करण्यात आले.