ओमायक्रॉन विषाणूची दहशत,
शेअर बाजार १८०० अंशांनी गडगडला
जगभरातील भांडवली बाजारामध्ये आज करोनाच्या ओमायक्रॉन विषाणूची दहशत दिसून आली. जपान आणि हाँग काँगपासून सुरु झालेला हा ट्रेण्ड अगदी अमेरिकन शेअर बाजारामध्येही दिसून आला. भारतीय शेअर बाजारही सुरुवातीच्या तासामध्ये एक हजारांहून अधिक अंकांनी घसरला. सेन्सेक्स १८०० अंशांनी गडगडला असून निफ्टीचा निर्देशांकही १६ हजार ५०० च्या खाली गेला. शेअर मार्केट्समध्ये पडझड दिसून आली. तेलाच्या किंमतीही घसरल्याने गुंतवणुकदारांचा कल बाजारातून पैसा काढून घेण्याकडे राहिला.
छत्रपती संभाजी महाराजांचे स्मारक
बुद्रुक येथे उभारण्यास मंजुरी
पुणे जिल्हयातील हवेली तालुक्यामधील वढु बुद्रुक येथे छत्रपती संभाजी महाराजांच्या स्मारक उभारणीच्या कामाला उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज तत्वत: मंजूरी दिली. छत्रपती संभाजी महाराजांचे साकारण्यात येणारे स्मारक त्यांच्या कार्यकर्तृत्वाचा गौरव करणारे, त्यांच्या व्यक्तिमत्वाला साजेसे, भव्य दिव्य असले पाहिजे. या स्मारकाच्या आराखड्यासाठी स्पर्धेचे आयोजन करुन त्यातून सर्वोत्कृष्ट आराखड्याची निवड करण्यात यावी. तसेच, स्वराज्यरक्षक छत्रपती संभाजी महाराजांच्या स्मारकाचे काम करताना स्थानिकांशी चर्चा करुन, त्यांना विश्वासात घेऊन काम करावे अशा सूचना उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिल्या आहेत.
भारतीय वंशाच्या जगदीप सिंह यांना मिळाले
वार्षिक १७,५०० कोटी रुपयांचे पॅकेज
काही दिवसांपूर्वी ट्विटरचे सीईओ पराग अग्रवालही यामुळेच खूप चर्चेत होते. आता आणखी एक भारतीय वंशाची व्यक्ती चर्चेत आली आहे. तुम्हाला हे जाणून आश्चर्य वाटेल की बॅटरी बनवणाऱ्या एका स्टार्टअप कंपनीने या व्यक्तीला वार्षिक १७,५०० कोटी रुपयांचे पॅकेज दिले आहे. जगदीप सिंग असे या भारतीय वंशाच्या व्यक्तीचे नाव आहे. त्याच्या सॅलरी पॅकेजमुळे तो जगभरात चर्चेत आला आहे. आश्चर्याची गोष्ट म्हणजे त्याचे पॅकेज जगातील सर्वात श्रीमंत व्यक्तींपैकी एक असलेल्या एलोन मस्कशी स्पर्धा करते.
पेपरफुटी प्रकरणात सुपे यांच्याकडे
आणखी दोन कोटी सापडले
टीईटी परीक्षेत गैरव्यवहार केल्याप्रकरणी राज्य परीक्षा आयोगाचे अध्यक्ष तुकाराम सुपे यांना पुणे पोलिसानी अटक केलेली आहे. त्यांच्याकडे पहिल्या धाडीत ८८ लाखांची रक्कम आणि काही दागिने सापडले होते. त्यानंतर आता दुसर्या धाडीत त्याच्याकडे जवळपास दोन हजार, पाचशे आणि शंभर रुपयांच्या नोटा मिळून पाच बॅगामध्ये एकूण दोन कोटी रुपये आणि काही दागिने आढळून आले आहेत. पेपरफुटी प्रकरणात महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेचे आयुक्त तुकाराम सुपे यांना अटक करण्यात आलेली आहे
बिहार मध्ये भ्रष्टाचाराचा कळस चक्क
रेल्वेचे इंजिन परस्पर विकले
बिहारमध्ये रेल्वेमधील भ्रष्टाचाराचे असेच एक अजब प्रकरण समोर आलं आहे. बिहारमधील समस्तीपुर विभागामध्ये रेल्वे इंजिनीअर म्हणून काम करणाऱ्या व्यक्तीने रेल्वेच्या मालकीचं इंजिन विकल्याची धक्कादायक माहिती समोर आलीय. अनेक वर्षांपासून पूर्णिया कोर्ट स्थानकामध्ये उभं असणारं रेल्वेचं जुनं वाफेवर चालणारं इंजिन या इंजिनीअरने परस्पर विकून टाकलं आहे. या प्रकरणाचा खुलासा शेडमधील एका कर्मचाऱ्याने दिलेल्या माहितीनंतर झाला.
देवेंद्र फडणवीस माझ्या विरोधात
तपास यंत्रणांना आदेश देण्याच्या तयारीत
आज नवाब मलिक यांनी केलेल्या ट्वीटची जोरदार चर्चा सुरू होती. “महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस माझ्याविरोधात तपास यंत्रणांना आदेश देण्यात बरेच इच्छुक दिसत आहेत. त्यांनी स्वत:ला या तपास यंत्रणांचे ओएसडी म्हणून नियुक्त करून घ्यावं. कारण त्यांना मुख्यमंत्री नियुक्त करण्याचा बराच अनुभव आहे. किरीट सोमय्यांना या यंत्रणांचे प्रवक्ते म्हणून नियुक्त करावं”, असा टोला मलिक यांनी लगावला होता.
आमदाराने अशाप्रकारे बोलणे
योग्य नाही : हेमामालिनी
जळगावचे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी सभा घेतली होती. या सभेत मतदारसंघातील रस्ते हेमा मालिनींच्या गालासारखे केले असल्याचं वक्तव्य त्यांनी केलं होतं. भाजपा खासदार आणि अभिनेत्री हेमा मालिनी यांनीही प्रतिक्रिया दिली आहे. माझे गाल आणि रस्त्यांची तुलना करण्याचा ट्रेंड काही वर्षांपूर्वी लालूजींनी सुरू केला होता. तो आजही सुरू आहे. त्यानंतर सर्वजण असं बोलू लागले. एखाद्या सर्वसामान्य व्यक्तीने असं वक्तव्य केलं तर हरकत नाही. एखाद्या खासदार किंवा आमदाराने अशाप्रकारे बोलणं योग्य नाही,” असं हेमा मालिनी म्हणाल्या.
देशभरातील गाढवांच्या संख्येत
एकूण ६१.२३ टक्के इतकी घट
देशात गेल्या काही दिवसात गाढवांची संख्या झपाट्याने कमी होत असल्याची माहिती समोर आली आहे. ब्रुक इंडियाने (BI) केलेल्या सर्व्हेतून ही माहिती उघड झाली आहे. देशभरातील गाढवांच्या संख्येत एकूण ६१.२३ टक्के इतकी घट झाल्याचे समोर आलं आहे. हा अहवाल संस्थेने सरकारच्या पशुसंवर्धन विभागाला दिला आहे. २०१२ आणि २०१९ पशुगणना दरम्यान भारतातील गाढवांच्या संख्येमध्ये एकूण ६१.२३ टक्के घट नोंदवली गेली आहे. तर आंध्र प्रदेश आणि तेलंगानाच्या काही भागांमध्ये गाढवांची हत्या केली जात असल्याचं समोर आलं आहे.
हा सगळा प्रकार मला टार्गेट
करण्यासाठी : राज कुंद्रा
मुंबई पोलिसांच्या क्राईम ब्रांचनं राज कुंद्राला अश्लील चित्रफीत बनवणे आणि त्याचं वितरण करणे या गुन्ह्याखाली अटक केली होती. काही दिवसांपूर्वीच राज कुंद्राला जामीन मंजूर झाला आहे. त्यानंतर त्यांनी प्रतिक्रिया दिली आहे. राज कुंद्रानं प्रसार माध्यमांमध्ये चुकीच्या गोष्टी पसरवल्या जात असल्याचा दावा या निवेदनात केला आहे. तसेच, आपल्यावरील आरोप देखील फेटाळून लावले आहेत. “प्रसारमाध्यमांमध्ये माझ्याविरोधात चुकीच्या गोष्टी पसरवल्या जात असून मी अशा प्रकारचे व्हिडीओ बनवण्यात सहभागी नव्हतो. हा सगळा प्रकार म्हणजे मला जाणून बुजून टार्गेट करण्याचा होता”, असं राज कुंद्रा म्हणाला आहे.
प्रो-कबड्डी लीगचा आठवा
हंगाम २२ डिसेंबरपासून
कबड्डीच्या चाहत्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे. दोन दिवसात त्यांना त्यांच्या आवडत्या खेळाडूंना मैदानावर ‘कबड्डी-कबड्डी’ म्हणताना ऐकायला मिळणार आहे. प्रो-कबड्डी लीगचा आठवा हंगाम २२ डिसेंबरपासून सुरू होत आहे. लीगचा पहिला सामना बंगळुरू बुल्स आणि यू मुंबा यांच्यात होणार आहे. गेल्या वर्षी करोना महामारीमुळे ही लीग आयोजित करता आली नव्हती. अशा परिस्थितीत चाहते या रोमांचक लीगची बऱ्याच दिवसांपासून वाट पाहत होते. आता लवकरच त्यांना त्यांचे आवडते खेळाडू आणि संघ कबड्डी खेळताना पाहायला मिळणार आहेत.
SD social media
9850 60 3590