देशात ओमिक्रॉन या कोरोनाच्या नव्या रुपाचा संसर्ग वाढत असताना केंद्र सरकार मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत आहे. केंद्र सरकार देशात अठरा वर्षाखालील मुलांच्या कोरोना प्रतिबंधक लसीकरणाची परवानगी देण्याची शक्यता आहे. सोमवारी (6 डिसेंबर) लसीकरणाविषयक राष्ट्रीय तांत्रिक सल्लागार समितीची बैठक होणार आहे. या बैठकीत लहान मुलांच्या लसीकरणावर चर्चा होण्याची शक्यता आहे. केंद्र सरकर विशेषत्वाने 12 ते 17 वर्षे या वयोगटातील मुलांना कोरोना प्रतिबंधक लस देण्याची परवानगी देण्याविषयी सरकार विचार करत आहे.
सध्या देशात ओमिक्रॉनचा धोका वाढला असून पाच राज्यात ओमिक्रॉनचे रुग्ण आढळले आहेत. ताज्या आकडेवारीनुसार देशात एकूण 21 ओमिक्रॉनबाधित रुग्णांची आतापर्यंत नोंद करण्यात आलीय. त्यामुळे वेळीच उपायोजना करणे गरजेचे आहे. या पार्श्वभूमीवर वय वर्षे 12 ते 17 या वयोगटातील मुलांना कोरोना प्रतिबंधक लस देण्याचा निर्णय घेतला जाऊ शकतो. या निर्णयावर शिक्कामोर्तब झालेच तर सुरुवातीला 6 राज्यातील मुलांचे लसीकरण प्राधान्याने केले जाणार आहे. यामध्ये तमिळनाडू, उत्तर प्रदेश तसेच महाराष्ट्रात सुरुवातीला लसीकरण केले जाणार आहे. लहान मुलांना ओमिक्रॉन या विषाणूचा विशेष धोका असल्याचे तज्ज्ञांकडून म्हटले जात आहे. याच कारणामुळे केंद्र सरकार लहान मुलांच्या लसीकरणावर विचार करत आहे.
ओमिक्रॉनचा प्रसार रोखण्यासाठी आरोग्य विभाग तसेच सरकार तसेच प्रशासनाकडून प्रयत्न करण्यात येत आहेत. कॉक्टॅक्ट ट्रेसिंग आणि टेस्टिंगवर भर दिला जात आहे. याआधी देशात ओमिक्रॉनचा पहिला रुग्ण कर्नाटकमध्ये आढळला होता. त्यानंतर त्याचा प्रसार गुजरातमध्येदेखील झाल्याचे समोर आले. राजधानी दिल्लीमध्येदेखील ओमिक्रॉनचा एक रुग्ण आढळलेला आहे. त्यानंतर महाराष्ट्रातही ओमिक्रॉनचे आठ रुग्ण आढळलेले आहेत. यामध्ये आता राजस्थानमधील नऊ रुग्णांची भर पडली असून रुग्णसंख्या 21 वर पोहोचली आहे.