ओमिक्रोन नव्या व्हेरिएंटमुळे
राज्यात बंधनं आणावी लागतील
राज्यात जागतिक पातळीवर नवीन व्हेरिएंटचा फैलाव होत आहे. उद्या पंतप्रधान मुख्यमंत्र्यांची व्हीसी घेणार आहेत. काही बंधनं आणावी लागतील, अशी स्थिती आहे, अशी माहिती उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिली. यावेळी त्यांनी पुन्हा निर्बंध लागू होण्याचे संकेत दिले आहेत. दरम्यान, दक्षिण आफ्रिकेतील नव्या व्हेरियंटने चिंता वाढवली आहे. तर WHO कडून नव्या व्हेरियंटचं नाव ओमिक्रॉन असे देण्यात आले आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी
आढावा बैठक बोलवली
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आढावा बैठक बोलवली आहे. या बैठकीत संबंधित केंद्रीय मंत्री, केंद्र सरकारचे अधिकारी आणि निवडक डॉक्टर सहभागी होणार आहेत. देशातील सध्याची करोनाची परिस्थिती, करोनाचा नवा विषाणू B.1.1.529 चा संभाव्य धोका आणि यामुळे करायच्या उपाययोजना यावर चर्चा केली जाणार आहे. तेव्हा या बैठकीनंतर करोनाच्या नव्या विषाणूचा सामना करण्यासाठी काही नव्या सुचना, नियम सांगितले जातात का हे बघणे महत्त्वाचे ठरेल.
दक्षिण आफ्रिकेतून मुंबईत येणाऱ्या
प्रत्येक व्यक्तीला क्वारंटाईन करा
मुंबई महानगर पालिकेने ओमिक्रोन या करोनाच्या नव्या प्रकाराशी दोन हात करण्यासाठी तयारी सुरू केली असून यासंदर्भात मोठा निर्णय घेतला. मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांनी यासंदर्भात प्रसारमाध्यमांना माहिती दिली आहे. दक्षिण आफ्रिकेतून मुंबईत येणाऱ्या प्रत्येक व्यक्तीला क्वारंटाईन करावं, असे निर्देश प्रशासनाला देण्यात आले आहेत. या प्रवाशांच्या शरीरातून घेण्यात आलेले नमुने जेनोम सिक्वेन्सिंगसाठी पाठवण्यात येतील, असं महापौर म्हणाल्या आहेत.
धोका नाही पण सतर्क राहावे
लागेल : राजेश टोपे
ओमिक्रोन व्हेरिएंटमुळे देशात आणि महाराष्ट्रात त्याचा लगेच परिणाम व्हावा अशी परिस्थिती सध्या तरी दिसत नसल्याचं आरोग्यमंत्र्यांनी स्पष्ट केलं आहे. “दुसरी लाट डेल्टाने निर्माण केली, तशी तिसरी लाट अशा वेगळ्या एखाद्या व्हेरिएंटमुळे निर्माण होण्याची शक्यता असली, तरी त्याचा प्रसार आपण वेळेत थांबवला, तर आज चिंता करण्याचं कारण नाही. फक्त सतर्क राहावं लागेल एवढं मात्र नक्की”, असं राजेश टोपे म्हणाले.
न्यूयॉर्क शहरात आणीबाणी घोषित
न्यूयॉर्कच्या गव्हर्नर कॅथी हॉचुल यांनी राज्यातील कोविड -१९ रुग्णसंख्येत वाढ झाल्यामुळे आणि ओमिक्रॉन व्हेरिएंटच्या धोक्यामुळे आणीबाणी घोषित केली. त्या म्हणाल्या की राज्यात या व्हेरिएंटचा अद्याप शोध लागला नाही परंतु त्यांनी आरोग्य विभागाला अत्यावश्यक नसलेल्या शस्त्रक्रियांसह इतर उपचारांवर मर्यादा घालण्याच्या कार्यकारी आदेशावर स्वाक्षरी करण्याचा निर्णय घेतला. करोना परिस्थितीशी सामना करण्यासाठी अत्यावश्यक साधनांचा साठा करण्याचे निर्देशही देण्यात आले आहेत. ही ऑर्डर ३ डिसेंबरपासून लागू होईल आणि १५ जानेवारीच्या नवीनतम डेटाच्या आधारे त्याचे पुनर्मूल्यांकन केले जाईल.
दोन डोस नसतील तर, सार्वजनिक
वाहतुकीने प्रवास करता येणार नाही
जर तुम्ही लसीचे दोन डोस पू्र्ण केले नसतील तर तातडीने लस घ्या, कारण आता लसीकरणाशिवाय सार्वजनिक वाहतुकीने प्रवास करता येणार नाही. या नव्या नियमानुसार, मुंबईतील लोकल ट्रेनप्रमाणे एसटी, बससेवा, टॅक्सी, रिक्षा या वाहतुकीने प्रवास करायचा असेल तर दोन डोस घेतलेल्या व्यक्तींनाच परवानगी देण्यात आलेली आहे.
परळी वैद्यनाथ मंदिर
RDX ने उडवण्याची धमकी
बीड जिल्ह्यातील परळी वैद्यनाथ मंदिर समितीस प्राप्त झालेल्या पत्रामुळे सध्या खळबळ माजली आहे. “वैद्यनाथ मंदिर संस्थानाकडे खूप पैसे आले आहेत. ५० लाख रुपये द्या अन्यथा RDXने मंदिर उडवून देवू”, अशा आशयाचं हे पत्र आहे. वैद्यनाथ देवस्थान ट्रस्टचे सचिव राजेश देशमुख यांना हे पत्र प्राप्त झाले आहे. परळी शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल आहे. या पत्रात लिहिलं आहे की मी फार मोठा नामी गुंड, ड्रग माफिया व गावठी पिस्तुलधारक आहे. मला ५० लाख रुपयांची गरज आहे. पत्र मिळताच रक्कम पोच करावी,
दिंडीत पिकअप शिरल्याने अपघात,
२ वारकऱ्यांचा मृत्यू, ३० जखमी
कार्तिकी यात्रेनिमित्त खालापूर येथून आळंदीच्या दिशेने निघालेल्या वारकऱ्यांच्या दिंडीत पिकअप शिरल्याने पुण्यात मोठा अपघात झाला. यात २ वारकऱ्यांचा मृत्यू झालाय, तर जवळपास ३० वारकरी जखमी झालेत. ही घटना आज सकाळी ७ च्या सुमारास कान्हेफाटा येथे घडली. यानंतर पिकअप चालकाला वडगाव मावळ पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. जखमींना वेगवेगळ्या रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे.
अर्जुन खोतकर यांची ईडीकडून
12 तास कसून चौकशी
शिवसेना नेते अर्जुन खोतकर यांची ईडीकडून 12 तास कसून चौकशी करण्यात आली आहे. त्याआधी रामनगर साखर कारखाना खरेदीप्रकरणी जालना येथे ईडीच्या अधिकाऱ्यांनी छापेमारी केली. राज्यातील सत्ताधारी पक्षातील लोकांच्या आणि नेत्यांच्या घरी आणि साखर कारखान्यांवर ईडीकडून छापेमारी करण्यात येत आहे. याआधी अजित पवार यांच्या जवळच्या नातेवाईकांवर केंद्रीय संस्थांकडून छापेमारी करण्यात आली होती.
कुर्ला परिसरामध्ये तरुणीवर
बलात्कार करून हत्या
अवघ्या दोनच दिवसांपूर्वी मुंबईतील शक्तीमिल कंपाउंड बलात्कार आणि हत्या प्रकरणातील आरोपींना फाशीची शिक्षा न देता ती जन्मठेपेची करण्यात आली असतानाच मुंबई पुन्हा एकदा अशाच एका घटनेने हादरली आहे. मुंबईच्या कुर्ला परिसरामध्ये असलेल्या एचडीआयले कंपाउंडमधील एका बंद इमारतीच्या टेरेसवर एका २० वर्षीय तरुणीचा मृतदेह आढळला आहे. या तरुणीवर बलात्कार करून नंतर तिची हत्या करण्यात आल्याची बाब समोर आल्यानंतर पोलिसांनी बलात्कार आणि हत्येचा गुन्हा दाखल केला आहे. याप्रकरणी पुढील तपास सुरू आहे.
SD social media
9850 60 3590