शेअर बाजारातील मोठे गुंतवणूकदार राकेश झुनझुनवाला यांनी दिवाळीतील मुहूर्त ट्रेडिंग सेशनमध्ये 101 कोटींची कमाई केली असल्याचं वृत्त आहे. राकेश झुनझुनवाला यांच्या पोर्टफोलिओतील स्टॉकमधून त्यांनी ही बक्कळ कमाई केली. राकेश झुनझुनवाला यांच्या पोर्टफोलिओत इंडियन हॉटेल्स हा स्टॉक आहे. मुहूर्त ट्रेडिंग या स्टॉकमध्ये 6 टक्क्यांची वाढ पाहायला मिळाली. बुधवारी इंडियन हॉटेल्सचे 507.70 कोटी रुपयांचे शेअर त्यांच्याकडे होते, त्याची किंमत 31.13 कोटी रुपयांनी वाढून 538.84 कोटी झाली. इंडियन हॉटेलसह टाटा समूहाच्या टाटा मोटर्सनेचा शेअरमध्ये देखील वाढ पाहायला मिळाली.
टाटा मोटर्सच्या शेअरची किंमत एक टक्क्यांनी वाढून 490.05 रुपयांवर बंद झाली. राकेश झुनझुनवाला यांच्याकडे टाटा मोटर्सचे 3.67 कोटी शेअर आहेत. झुनझुनवाला यांच्या पोर्टफोलिओत टाटा मोटर्सच्या शेअरचे मूल्य मुहूर्त ट्रेडिंगच्या आधी 1783 कोटी रुपये होते. मुहूर्त ट्रेडिंगच्या विशेष सत्रात याचे मूल्य 17.82 कोटींनी वाढून 1800 कोटी झाली. टाटा मोटर्सच्या शेअर्सची किंमत यावर्षी 162 टक्क्यांनी वाढली आहे.
रेटिंग आणि रिसर्च एजन्सी ‘क्रिसील’च्या शेअरच्या किंमत 2 टक्क्यांनी वाढली. राकेश झुनझुनवाला यांच्याजवळ या कंपनीचे 1123 कोटी रुपयांचे शेअर होते. जे 21.72 कोटींनी वाढून 1144 कोटी रुपयांवर पोहोचले आहे.
मुंबई शेअर बाजार अर्थात बीएसई आणि राष्ट्रीय शेअर बाजार अर्थात एनएसई दिवाळीच्या मुहूर्त ट्रेडिंगचं आयोजन करतात. लक्ष्मीपूजनादिवशी शेअर बाजाराला सुट्टी असली तरी मुहूर्ताच्या ट्रेडिंगसाठी बाजारात फक्त 1 तास ट्रेडिंग केलं जातं. या एका तासात गुंतवणूकदारआपली छोटी गुंतवणूक करून बाजाराची परंपरा पाळतात. मुहूर्ताच्या वेळी केलेली गुंतवणूक शुभ असते, असं मानलं जातं.
दिवाळीसह विक्रम संवतानुसार नवीन वर्षाची सुरुवात देखील होते. या वेळी विक्रम संवत 2077 ची सुरुवात होणार आहे. भारतीय परंपरेनुसार, दिवाळीसह देशाच्या अनेक भागांमध्ये नवीन आर्थिक वर्षाची सुरुवातही होते. या शुभ वेळेला शेअर बाजारातले व्यापारी विशेष शेअर ट्रेडिंग करतात. म्हणून याला मुहूर्त ट्रेडिंग असं म्हणतात.
मुहूर्ताच्या ट्रेडिंगच्या दिवशी शेअर बाजारात पैसे गुंतवणं शुभ मानलं जातं, असं तज्ज्ञांचं म्हणणं आहे. विशेषतः श्रीमंत व्यक्ती निश्चितपणे या दिवशी गुंतवणूक करतात. ते छोट्या गुंतवणुकीवर लाखो रुपये कमवतात. दिवाळीच्या विशेष मुहूर्तावर ट्रेडिंग करून सुरू करून गुंतवणूकदार नवीन आर्थिक वर्ष चांगलं जाण्याची इच्छा व्यक्त करतात. मुहूर्त ट्रेडिंग पूर्णपणे परंपरेशी संबंधित आहे. बहुतेक जण या दिवशी शेअर्स खरेदी करतात. तथापि, ही गुंतवणूक अत्यंत लहान आणि प्रतीकात्मक असल्याचं तज्ज्ञांनी म्हटलं आहे.
बाजार तज्ज्ञांच्या मते, मुहूर्ताच्या ट्रेडिंगदिवशी व्यापारी गुंतवणुकीचा विचार करून बाजारात प्रवेश करतात. परंपरा मानणारे सहसा पहिली ऑर्डर खरेदीची देतात. मागील काही वर्षांमध्ये मुहूर्ताच्या ट्रेडिंगमध्ये शेअर बाजार बहुतांश प्रसंगी एका मर्यादेतच राहिला असल्याचं दिसून येतं. तसंच काही काळ बाजारात तेजीही दिसून आली आहे.