राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्याबद्दल माझ्या मनात आदरच आहे. त्यामुळे त्यांचा एकेरी उल्लेख करण्याचा प्रश्नच नाही. एका कार्यक्रमात अनावधानाने तो उल्लेख झाला, असं सांगतानाच त्या दिवशी एका क्षणापूरती माझी जीभ घसरली होती, असं भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी कबूल केलं.
चंद्रकांत पाटील यांनी संवाद साधताना ही कबुली दिली आहे. शरद पवार साहेबांबद्दल मी आदराने बोललेल्या क्लिपचा पेटारा भरेल. मी त्या त्या वेळेस पवारांबद्दल आदराने बोललो ते पण कुठे तरी कोट करा. सांगलीला एक घरगुती कार्यक्रम होता. सार्वजनिक नव्हता. कोणत्याही माणसाचं स्लिप ऑफ टंग होतं. तसंच माझं स्लिप ऑफ टंग एका क्षणापुरतं झालं. तुम्ही क्लिप पाहिली तर लक्षात येईल. हे भाषण केवळ कार्यकर्त्यांना उद्देशून होतं, असं पाटील म्हणाले.
साखर उद्योगाबाबत पवारांना जेवढं कळतं तेवढं कुणाला कळत नाही. प्रमोद महाजनांनी आम्हाला सांगितलं होतं की, मुख्यमंत्री होताना पवारांनी 40 गोष्टी लिहून काढल्या. त्यातील 38 गोष्टी पूर्ण केल्या. असं केलं पाहिजे. अनेकवेळा मी त्यांच्यावर टीका करतो. पण ते वैयक्तिक भांडण नाही. त्यांच्याबद्दल माझ्या मनात आदरच आहे. माझ्या त्यांच्याबद्दलच्या आदराच्या वक्तव्याचं एक पेटारा भरेल. एखाद्या ठिकाणी काही झालं तर त्याबद्दल वावटळ उठवण्याची गरज नाही. माझ्या मनात पवारांबद्दल आदरच आहे, असं त्यांनी पुन्हा स्पष्ट केलं.
बेदिलीने महापौर पडला
शरद पवारांचं आव्हानच नाही, असं विधानही पाटील यांनी केलं होतं. त्यावरही त्यांनी स्पष्टीकरण दिलं. सांगलीला महापौर पडला. तो आपसातील बेदिलीने पडला. त्याचा संदर्भ घेऊन मी म्हटलं बाहेरचं आव्हान नाही आपल्यातीलच आव्हान आहे. भाजप कार्यकर्त्याने नंतर स्थायी, सामाजिक न्याय आणि महिला बाल कल्याण जिंकलं, असं स्पष्टीकरणही त्यांनी दिलं.
चंद्रकांत पाटील नेमकं काय म्हणाले होते?
सांगलीमध्ये एका कार्यक्रमात कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करताना चंद्रकांत पाटील यांनी शरद पवार यांच्यावर एकेरी शब्दात टीका केली होती. राज्यात शरद पवारचं आपल्याला आव्हान नाही. कारण 54 आमदाराच्या वर आम्ही त्याला जाऊ दिलं नाही. सगळं आयुष्य गेलं पण कधी 60 वर तो गेला नाही, असं वक्तव्य पाटील यांनी केलं होतं. तर देवेंद्र फडणवीस यांचं कौतुक करताना, त्यांच्या नेतृत्वाने राज्यातील राजकारणाला मोठी कलाटणी मिळाली आहे. सांगलीतील नेत्याला वाटत होतं की आमच्याशिवाय पर्याय नाही. पण भाजपा कार्यकर्त्यांनी इथं यश मिळवून दाखवलं होतं. मी कीय त्या नेत्याचं नाव घेणार नाही. माझ्यावर केसेस सुरु आहेत, मी फकीर आहे, मी काय घाबरत नाही, असं पाटील म्हणाले होते.