सरनाईक यांच्या या ‘लेटरबॉम्ब’मुळे
महाविकासआघाडीच्या भवितव्यावर प्रश्न
राज्यात एकीकडे काँग्रेसकडून स्वबळाचा नारा दिला जात असताना दुसरीकडे शिवसेनेमधूनही भाजपासोबत पुन्हा युती करण्यासाठीचा सूर उमटताना दिसत आहे. त्यासंदर्भातलं एक पत्रच शिवसेना आमदार प्रताप सरनाईक यांनी राज्याचे मुख्यमंत्री आणि शिवसेना अध्यक्ष उद्धव ठाकरे यांना लिहिलं आहे. त्यामुळे काँग्रेसच्या स्वबळाच्या घोषणेमुळे आधीच महाविकासआघाडीच्या भवितव्यावर प्रश्न उपस्थित केलं जात असताना सरनाईक यांच्या या ‘लेटरबॉम्ब’मुळे ते प्रश्नचिन्ह अधिक गडद झाल्याचं दिसू लागलं आहे. या शिवसेनेकडून या पत्रावर काय भूमिका मांडली जाते, याकडे राजकीय नेत्यांसह लोकांचं लक्ष लागलं आहे.
नितेश राणे यांनी ट्विट करत
खळबळ उडवून दिली
शिवसेनेचे प्रवक्ते आणि आमदार प्रताप सरनाईक हे मागील काही महिन्यांपासून केंद्रीय यंत्रणांच्या तपासामुळे चर्चेत आहेत. ही चर्चा सुरू असतानाच भाजपाचे आमदार नितेश राणे यांनी सत्तांतराचे संकेत देणारं एक ट्विट करत खळबळ उडवून दिली आहे. नितेश राणे यांनी दोनच वाक्यात ट्विट केलं आहे. ज्यात त्यांनी विधानसभा निवडणुकीत शिवसेनेचं ब्रीद असलेल्या ‘हीच ती वेळ’चाही उल्लेख केला आहे.
चंद्रकांत पाटील यांनी
युतीसाठी खुणावलं
शिवसेना आमदार आणि नेते प्रताप सरनाईक यांनी शिवसेना पक्षप्रमुख आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना युतीसाठी पत्र लिहिल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. या लेटर बॉम्बनंतर राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलं आहे. त्यावर शिवसेना आणि भाजपा नेत्यांच्या सावध प्रतिक्रिया येत आहेत. त्यात भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना युतीसाठी खुणावलं आहे. सकारात्मक विचार केल्यास आमचे नेतेही विचार करतील असं सांगितलं.
सुधीरभाऊंनी शिवसेनेच्या
नादी लागू नये : गुलाबराव पाटील
गुलाबराव पाटील यांनी सुधीर मुनगंटीवार यांना परखड शब्दांमध्ये सुनावलं आहे. “शिवसेना प्रमुख हे शिवसेनेचे गँगप्रमुखच आहेत. त्या गँगप्रमुखाच्या बापाने काय केलंय हे आख्ख्या महाराष्ट्राला आणि जगाला माहिती आहे. गँगप्रमुखाच्या नादाला लागू नये. कारण गँगप्रमुखाने नुसता आदेश दिला, तरी बाकी काय होतं हे मुंबईच्या सेनाभवनासमोर सुधीरभाऊंनी पाहिलं आहे. टीका करताना सुधीरभाऊंसारख्या नेत्यानं अशा प्रकारचं वक्तव्य करणं हास्यास्पद आहे. शिवसेना प्रमुखांचे पुत्र शिवसेनेचे गँगप्रमुख आहेत. तुमच्या गँगप्रमुखांची काय कामं चालू आहेत हे आम्हाला माहितीये. त्यांनी कृपा करून शिवसेनेच्या नादी लागू नये”, असं गुलाबराव पाटील म्हणाले आहेत.
अवघ्या २८ तासात १० मजली इमारत
उभी करण्याचा चीनचा विक्रम
चीनमध्ये तंत्रज्ञान आणि त्याचे प्रयोग सर्वश्रूत आहेत. तंत्रज्ञानाच्या जोरावर चीन दरवेळी नवनवे प्रयोग करून आश्चर्याचा धक्का देत असते. आता चीनने अवघ्या २८ तासात १० मजली इमारत उभी करण्याचा विक्रम केला आहे. या कामगिरीमुळे प्रत्येक जण हे कसं शक्य आहे, असा प्रश्न उपस्थित करत आहे. एखादी इमारत उभी करायची असल्यास त्याची पायभरणी करण्यासाठी आठवडा जातो. २८ तासात इमारत उभी केल्याच्या व्हिडिओ बघितल्यानंतर अनेकांना विश्वास बसत नाही.
इंग्लंडच्या हाता-तोंडाशी आलेला विजय
भारतीय महिला संघाने हिसकावला
कारकीर्दीतला पहिलाच कसोटी सामना खेळणाऱ्या अष्टपैलू स्नेह राणाने (नाबाद 80) शानदार अर्धशतक झळकावत आणि तानिया भाटिया (नाबाद 44) हिच्यासोबत नवव्या विकेटसाठी 104 धावांची विक्रमी भागीदारी केली. या भागीदारीच्या जोरावर सामन्याच्या शेवटच्या दिवशी इंग्लंडच्या हाता-तोंडाशी आलेला विजय भारतीय महिला संघाने हिसकावला. उभय देशांमध्ये खेळवण्यात आलेला एकमेव कसोटी सामना ड्रा करण्यात भारतीय महिला संघ यशस्वी ठरला.
पेट्रोल-डिझेल दरवाढीचा
सामान्यांना पुन्हा झटका
एकीकडे देशात करोनाचं संकट ठाण मांडून बसलेलं असताना, लॉकडाउनच्या निर्बंधांमुळे आर्थिक संकट देखील ओढवलेलं असताना सामान्यांसाठी पेट्रोल-डिझेल दरवाढ हे देखील करोना साथीप्रमाणेच पसरलेलं संकट ठरलं आहे. देशात झालेल्या पाच राज्यांच्या निवडणुकांच्या आधी आणि त्यानंतर मोठ्या प्रमाणावर पेट्रोल आणि डिझेलच्या किंमती वाढल्या आहेत. आता तर पेट्रोलनं काही भागांमध्ये शंभरी देखील गाठली आहे. त्यामध्ये महाराष्ट्राची राजधानी आणि देशाची आर्थिक राजधानी असा गौरव मिरवणाऱ्या मुंबईचा देखील समावेश आहे.
शिवसेना सत्तेसाठी कोणत्याही
परिस्थितीत लाचार होणार नाही
हिंदुत्व हा शिवसेनेचा श्वास असून सत्तेसाठी कोणत्याही परिस्थितीत लाचार होणार नाही. त्याचबरोबर उगाच कोणाची पालखीही शिवसेना वाहणार नाही. स्वाभिमानाने आणि स्वत:च्या पायावर खंबीरपणे पुढची वाटचाल शिवसेना करेल, असे प्रतिपादन शिवसेना पक्षप्रमुख आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शिवसेनेच्या वर्धापनदिन कार्यक्रमात केले.शिवसेनेच्या ५५ व्या वर्धापनदिनानिमित्त उद्धव ठाकरे यांनी राज्यभरातील शिवसैनिकांना दूरचित्रसंवादाद्वारे संबोधित केले.
SD social media
9850 60 3590