इंडियन काऊन्सिल ऑफ मेडिकल रिसर्चने (ICMR)ने कोरोना विषाणूच्या संसर्गाची खातरजमा करण्यासाठी आता घरीच कोरोना चाचणी करण्यास परवानगी दिलीय. पुण्यातील माय लॅबच्या किटलाही मंजुरी देण्यात आलीय. RAT चाचणीत पॉझिटिव्ह आलेल्यांना कोरोनाबाधित समजले जाणार आहे. त्यांना पुन्हा चाचणी घेण्याची आवश्यकता नाही.
रॅपिड अँटिजन टेस्ट (RAT) किटसंदर्भात मार्गदर्शक सूचनाही जारी केल्यात. पुण्यातील माय लॅब कंपनीनं घरच्या घरी कोरोना चाचणी करण्याचं किट तयार केलं होतं. अशा प्रकारचे किट दुसऱ्या देशांत आधीपासूनच वापरले जात आहेत.
यासाठी पहिल्यांदा आपल्याला माय लॅबचं मोबाईल अॅप डाऊनलोड करावं लागेल, त्यानंतर त्यावर फोटो अपलोड करावा लागेल. फोटो अपलोड केल्यानंतर रिपोर्ट येणार आहे. त्यात तुम्ही पॉझिटिव्ह आहात की निगेटिव्ह हे समजणार आहे. परंतु रॅटमध्ये जे लोक निगेटिव्ह आढळत आहे, त्या व्यक्तींची RT-PCR चाचणी होणे आवश्यक आहे.
विशेष म्हणजे गेल्या काही दिवसांपूर्वीच कोरोनाच्या उपचारातून प्लाझ्मा थेरपी काढून टाकण्यात आलं होतं. यासंदर्भात एम्स आणि आयसीएमआरने नवीन मार्गदर्शक सूचना प्रसिद्ध केल्या होत्या. कोरोनाच्या उपचारात प्लाझ्मा थेरपी प्रभावी नाही आणि बर्याचदा हे अयोग्यपद्धतीने वापरले गेलेय, असं तज्ज्ञांचं मत आहे.
ICMR चे वैज्ञानिक डॉ. समीरन पांडा म्हणाले की, बीजेएममध्ये प्रसिद्ध झालेल्या आकडेवारीतून प्लाझ्मा थेरपीचा कोणताही फायदा नसल्याचे समोर आले. प्लाझ्मा थेरपी महाग आहे आणि यामुळे भीती निर्माण होत आहे. याबद्दल आरोग्य यंत्रणेवर ओझे वाढले असूनही रुग्णांना मदत होत नाही. दात्याच्या प्लाझ्माच्या गुणवत्तेची हमी दिली जात नाही. प्लाझ्मा अँटीबॉडी पुरेशा संख्येने असणे आवश्यक आहे.