राज्यात ठिकठिकाणी मान्सूनपूर्व पावसाने हजेरी लावली आहे. शेतात काम करत असताना वीज कोसळून एका शेतकऱ्यासह दोन बैलांचा बळी घेतल्याची दुर्दैवी घटना नांदगावच्या तळवाडे येथे घडली. शेतकऱ्याच्या मृत्यूमुळे गावात हळहळ व्यक्त केली जात आहे.
राज्यात मान्सूनपूर्व पावसाने हजेरी लावली आहे. अचानक झालेल्या या पावसामुळे शेतकऱ्यांचे नुकसान होत आहे. नाशिक जिल्ह्यातील मनमाड तालुक्यातील नांदगावात वादळी वाऱ्यासह पावसाने झोडपून काढले आहे. शेतकरी शांताराम निकम हे आपल्या बैलजोडी सोबत शेतीची मशागत करत होते. अचानक पावसाला सुरुवात झाली.
वादळी वारा, विजांचा कडकडाट आणि मेघगर्जनेसह पावसाला सुरुवात झाली. पाऊस सुरू झाल्यामुळे शांताराम निकम बैलांना घेऊन घराकडे येत होते त्यावेळी अचानक वीज अंगावर पडून शेतकरी निकम आणि त्यांच्यासोबत बैलजोडीचा जागीच मृत्यू झाला आहे. या घटनेमुळे निकम कुटुंबीयांवर दुःखाचे डोंगर कोसळले.
घटनेची माहिती होताच ग्रामस्थ आणि पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. शांताराम निकम यांचा मृतदेह शासकीय रुग्णालयात शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला आहे. दोन बैलांसह शेतकऱ्याचा मृत्यू झाल्यामुळे गावात हळहळ व्यक्त केली जात आहे.
मालेगावात पावसाची जोरदार हजेरी
दरम्यान, नाशिकच्या ग्रामीण भागात सलग तिसऱ्या दिवशी मान्सूनपूर्व पावसाचे जोरदार आगमन झाले असून आज मालेगाव शहरासोबत तालुक्यातील अनेक गावांना वादळी वाऱ्यासह पावसाने झोडपून काढले. पावसाला सुरुवात होताच बच्चे कंपनींनी पाण्यात कागदाच्या होड्या सोडून आनंद लुटला. तिकडे चांगला पाऊस झाला असल्याने तापमानात मोठी घट झाली आहे. त्यामुळे उष्म्याने हैराण झालेल्या नागरिकांना काहीसा दिलासा मिळाला आहे.