ट्रकवर इनोव्हा कार धडकून झालेल्या भीषण अपघातात डॉक्टरांसह अख्ख्या कुटुंबाचा करुण अंत झाला. पुणे-बंगळुरु राष्ट्रीय महामार्गावर सोमवारी हा अपघात झाला. रस्त्याच्या कडेला थांबलेल्या ट्रकवर इनोव्हा गाडीने पाठीमागून जोरदार धडक दिली. यामध्ये सीमा भागातील संकेश्वर येथील प्रसिद्ध नेत्ररोग तज्ज्ञासह त्यांच्या पत्नी आणि मुलीचा मृत्यू झाल्याचं वृत्त आहे. डॉ. सचिन शिवानंद मुरगुडे (वय 45 वर्ष), डॉ. श्वेता सचिन मुरगुडे (वय 42 वर्ष) आणि श्रेया सचिन मुरगुडे (वय 7 वर्ष) अशी मृतांची नावे आहेत. दुपारी साडेचार वाजताच्या सुमारास हत्तरकीजवळील बेनकोळी गावाच्या परिसरात हा अपघात झाला होता.
डॉ. सचिन मुरगुडे हे नेत्ररोग तज्ज्ञ म्हणून परिचित होते. संकेश्वर येथे मुरगुडे यांचे नेत्र रुग्णालय आहे. त्यांची पत्नी श्वेतासुद्धा नेत्ररोग तज्ज्ञ होत्या. रविवारी संध्याकाळी डॉ. सचिन, पत्नी श्वेता आणि कन्या श्रेया इनोव्हा कारने (क्र.के.ए.23/एन 4261) बेळगावहून संकेश्वरला येत होते. पुणे-बंगळुरु राष्ट्रीय महामार्गावर हत्तरकी जवळ बेनकोळी गावापाशी असताना त्यांचा कारवरील ताबा सुटला आणि त्यांची इनोव्हा कार रस्त्याच्या शेजारी थांबलेल्या मालवाहू कंटेनरवर जोरात धडकली.
ही धडक इतकी भीषण होती की डॉ. श्वेता आणि श्रेया यांचा जागीच मृत्यू झाला, तर डॉ सचिन हे गंभीर जखमी झाले होते, मात्र उपचारादरम्यान त्यांची प्राणज्योत मालवली. यमकनमर्डी पोलीस ठाण्यात या प्रकरणी अपघाताची नोंद झाली असून पोलीस अधिक तपास करत आहेत.