जळगाव जिल्हा शल्यचिकित्सक कार्यालयाने जिल्ह्यातील रुग्णालयांसाठी खरेदी करण्यात आलेल्या व्हेंटिलेटर्स, ऑक्सिजन काँसनट्रेटर, मॅमोग्राफीमध्ये कुठल्याही प्रकारचा घोळ झाला नसल्याची माहिती पत्रपरिषदेत जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. एन.एस. चव्हाण यांनी दिली. दोन महिन्यांपासून घोटाळ्याबाबत होत असलेल्या चर्चांना त्यांनी स्पष्टीकरण देत पूर्णविराम दिला.
जळगावातील माहिती अधिकार कार्यकर्ते दिनेश भोळे यांनी जिल्हा रुग्णालय व जिल्हा शल्यचिकित्सक कार्यालयविषयी विविध खोटे आरोप करून जनमानसात जिल्हा रुग्णालयाची प्रतिमा दूषित करण्याचा प्रयत्न केला आहे. याप्रकरणी जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. एन.एस. चव्हाण यांनी पत्रकार परिषद घेऊन याविषयीची सत्यता मांडली.
व्हेंटिलेटर खरेदी घोटाळा, ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर बोगस, मॅमोग्राफी मशीन धूळखात अशा प्रमुख मुद्द्यांवर आरोप माहिती अधिकार कार्यकर्ते दिनेश भोळे यांनी केले होते. हे सर्व आरोप जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. चव्हाण यांनी खोडून काढले. यावेळी पत्रपरिषदेला निवासी वैद्यकीय अधिकारी डॉ. सुशांत सुपे, कार्यालयीन अधिक्षक हरपाल वाणी उपस्थित होते.
कोरोना महामारीच्या काळामध्ये रुग्णांना व्हेंटिलेटरची असलेली आवश्यकता लक्षात घेऊन राज्य शासनाच्या ‘गव्हर्नमेंट इ मार्केटिंग’ म्हणजेच जीएम पोर्टलवर ३० व्हेंटिलेटरची मागणी नोंदवण्यात आली होती. तत्पूर्वी त्यातील घटक (स्पेसिफिकेशन) कसे असावेत तेवढेच जीएम पोर्टलवर भरावे लागतात. ते भरल्यानंतर न्यूनतम दर भरणाऱ्या संबंधित पुरवठादाराला निविदा देण्यात आली होती.
व्हेंटिलेटर कोणत्या कंपनीचे असावेत तसेच त्याची अंतिम किंमत काय असावी हे जिल्हा रुग्णालय प्रशासन ठरवत नाही तर जीएम पोर्टल त्याचे निर्णय घेत असते. कोणतीही निविदा प्रक्रिया ही above किंवा below जात असते. पुरवठादाराने व्हेंटिलेटर मशिनिंचा पुरवठा करताना त्यात १५ बालरोग विभागासाठी व १५ प्रौढ रुग्णांसाठी असे ३० व्हेंटिलेटर पुरविले. त्याची तपासणी जिल्हा रुग्णालयातील समितीने तसेच पुरवठादार कंपनीच्या प्रतिनिधींच्या उपस्थितीत करण्यात आली होती.
प्रशासकीय मान्यता रद्द झाल्याने पुरवठादार त्याच्या मशिनी परत घेऊन गेला आहे. त्याबाबतचा कुठलाही पैसा पुरवठादाराला देण्यात आलेला नाही. त्यामुळे या खरेदीमध्ये कुठल्याही प्रकारचा आर्थिक व्यवहार झालेला नाही. खरेदीची प्रक्रिया कशी चालते याची व्यवस्थित अधिकृत माहिती न घेता जनतेची दिशाभूल करणारे आरोप या प्रकरणी झालेत.
जिल्हा रुग्णालयाने खरेदी केलेले ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर बोगस असल्याचा आरोप करण्यात आला आहे. यामागील वस्तुस्थिती जिल्हा शल्यचिकित्सकांनी मांडली. खा. रक्षाताई खडसे यांच्या खासदार निधीमधून दीड कोटी रुपये जिल्हा शल्यचिकित्सक कार्यालयाला प्राप्त झाले होते. १२० ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर खरेदी करण्याबाबत तांत्रिक समितीने तांत्रिक मान्यता व नियोजन समिती मार्फत प्रशासकीय मान्यताला मंजुरी दिली होती.याबाबतची निविदा जीएम पोर्टलवर टाकण्यात आली होती. त्यानुसार न्यूनतम दर भरणाऱ्या पुरवठादाराला ऑर्डर देण्यात आली.
पाच लिटर पर मिनिट ऑक्सिजन देणाऱ्या मशीनमुळे रुग्णाला फायदा होत नसल्यामुळे दहा लिटर पर मिनिट ऑक्सिजन देणारे ऑक्सिजन कॉन्सनट्रेटर मागवण्यात आले होते. या मशिनी बोगस असल्याचे तक्रारदाराचे म्हणणे होते. त्यासाठी जिल्हा शल्यचिकित्सकांनी समिती नेमली. मात्र परदेशी भाषा असल्याने समितीने हे मशीन सरकारी पॅनलवर असलेल्या यवतमाळच्या अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या तज्ञांना तपासणीसाठी पाठवले होते. त्यांनी दिलेल्या अहवालानुसार, “ऑक्सिजन कॉन्सनट्रेटर मशीन आंतरराष्ट्रीय मानकाप्रमाणे योग्य” असल्याबाबत लेखी कळविले आहे.
चोपड्याला मॅमोग्राफी सुरु; जळगावात लवकरच
जिल्ह्यात दोन मेमोग्राफी मशीन आलेल्या आहेत. कोरोना महामारीपूर्वी या मशीन खरेदी झाले आहेत. त्याची तांत्रिक मान्यता नाशिकचे आरोग्य विभागाचे उपसंचालक यांच्याकडून झाल्यानंतर प्रशासकीय मान्यता जिल्हाधिकाऱ्यांनी दिलेली होती. या मशीन धरणगाव, चोपडा येथे दिलेल्या आहेत. खरेदी झाल्यानंतर कोरोना महामारी सुरू झाल्यामुळे धरणगाव, चोपडा हे रुग्णालय कोविड रुग्णालय म्हणून घोषित झाले होते. त्यामुळे मशीन तेथेच होत्या.
धरणगाव येथील मशीन जिल्ह्याचे ठिकाण असलेल्या जळगावात आणण्यात येणार असून मोहाडी येथील रुग्णालयात ठेवण्यात येईल. पुढील महिन्यात त्याद्वारे रुग्णांवर उपचार सुरू होणार आहेत. या मशीनमुळे स्तनाच्या गाठीचे निदान लवकर करता येते. निदान लवकर झाल्यामुळे उपचार करण्यामध्ये वैद्यकीय पथकाला सुलभता प्राप्त होते. रुग्णाचे आयुष्य सुधारते. एकूण कर्करोग रुग्णांमध्ये स्तनाचा कर्करोग असण्याचे प्रमाण २८ टक्क्यांपर्यंत पोचले आहे. त्यामुळे रुग्णांच्या हितासाठी हे मॅमोग्राफी मशीन खूप महत्त्वाचे आहे. गरीब व गरजू रुग्णांना याचा लाभ होण्यासाठी या मशिनची मागणी नोंदवण्यात आली होती, अशीही माहिती जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. एन.एस. चव्हाण यांनी दिली.