भारताला आतापर्यंत फ्रान्सकडून 30 राफेल लढाऊ विमाने मिळालीत. भारतीय हवाई दल लवकरच आपल्या राफेल लढाऊ विमानांच्या ताफ्यात सुधारणा करण्यास सुरुवात करेल, असंही सांगण्यात येत आहे. एएनआय या वृत्तसंस्थेनुसार, भारतीय हवाई दलाची उच्चस्तरीय टीम सध्या फ्रान्समध्ये आहे, जी RB-008 विमानाची कामगिरी पाहण्यासाठी एस्ट्रेस एअरबेसवर पोहोचलीय. हे विमान भारतानं विशिष्ट सुधारणांनी सुसज्ज केलेय, अशीही माहिती सरकारी सूत्रांनी दिलीय.
भारतीय हवाई दलाने या सुधारणांना मान्यता दिल्यानंतर लढाऊ विमान अधिक सक्षम करण्यासाठी पुढील वर्षी जानेवारीपासून अपग्रेड सुरू करण्याची योजना आहे. भारताच्या विशिष्ट सुधारणांमध्ये भारतीय गरजेनुसार अत्यंत सक्षम क्षेपणास्त्रे, लो बँड जॅमर आणि सॅटेलाईट दळणवळण प्रणाली यांचा समावेश असेल.
भारताला आधीच 30 राफेल लढाऊ विमाने मिळालीत आणि आणखी 3 विमाने 7-8 डिसेंबरला भारतात पोहोचतील. हवाई दलाच्या सूत्रांनी सांगितले की, कराराच्या वेळापत्रकानुसार हे किट फ्रान्समधून भारतात आणले जाईल आणि दर महिन्याला तीन ते चार भारतीय राफेल आयएसई मानकांमध्ये श्रेणीसुधारित केले जातील. फ्रान्समधून भारतात येणारे शेवटचे विमान RB-008 असेल, ज्याचे नाव माजी हवाई दल प्रमुख एअर चीफ मार्शल आरकेएस भदौरिया (सेवानिवृत्त) यांच्या नावावरून ठेवण्यात आले होते, ज्यांनी उपप्रमुख म्हणून करारावर स्वाक्षरी केली होती.
देशातील विमानाचा पहिला तळ असलेल्या अंबाला एअर फोर्स स्टेशनवर हे विमान अपग्रेड केले जाईल. त्याच वेळी भारतीय हवाई दलाने फ्रान्समध्ये आपल्या जवानांना प्रशिक्षण दिल्यानंतर आपल्या वैमानिकांना देशातच विमानांचे प्रशिक्षण देण्यास सुरुवात केलीय.