कापलेले दोन्ही हातांचे तळवे, डॉक्टरांनी पुन्हा जोडले, सासऱ्याने केला होता तलवार हल्ला

मध्य प्रदेशची राजधानी भोपाळ येथील नर्मदा हॉस्पिटलच्या डॉक्टरांनी अशक्यप्राय वाटणारी गोष्ट शक्य करून दाखवली आहे. दोन्ही हातांचे तळवे मनगटापासून कापलेल्या अवस्थेत एका महिलेला नर्मदा हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले होते. येथे सहा डॉक्टरांच्या पथकाने 9 तासांच्या शस्त्रक्रियेनंतर महिलेचे दोन्ही तळवे मनगटाजवळ जोडले. आता महिलेची प्रकृती ठीक आहे. या अवघड शस्त्रक्रियेनंतर डॉक्टरांची टीमही खूप उत्साहित आहे.

मध्य प्रदेशातील विदिशामध्ये राहणाऱ्या एका महिलेला 11 नोव्हेंबर रोजी गंभीर अवस्थेत भोपाळच्या नर्मदा हॉस्पिटलमध्ये आणण्यात आलं होतं. महिलेच्या सासऱ्याने तिच्यावर तलवारीने हल्ला केला होता. तलवारीपासून स्वत:ला वाचवताना महिलेच्या दोन्ही हातांना गंभीर दुखापत झाली होती. तिच्या दोन्ही हातांच्या मनगटाजवळील रक्तवाहिन्या कापल्या गेल्या, तसंच हाडही तुटलं होतं. यासोबतच महिलेच्या चेहऱ्यावर वार झाल्याने तिच्या चेहऱ्यावरही गंभीर जखमा झाल्या आहेत. सासऱ्याने हा हल्ला का केला, त्याच्यावर कुठली कारवाई करण्यात आली, या विषयी अद्याप माहिती मिळालेली नाही.

ट्रॅमेंटोलॉजिस्ट आणि स्पाइन सर्जन डॉ. राजेश शर्मा, क्रिटिकल केअर स्पेशलिस्ट डॉ. रेणू शर्मा यांच्या नेतृत्वाखाली प्लास्टिक सर्जन, व्हॅस्कुलर सर्जन, अॅनेस्थेशिया स्पेशलिस्ट, फिजिशियन आणि जनरल सर्जन यांच्या पथकाने महिलेच्या हातावर शस्त्रक्रिया सुरू केली. सुमारे 8 ते 9 तास चाललेल्या ऑपरेशननंतर महिलेच्या मनगटापासून लटकलेला हात जोडण्यात आला. यासोबतच तिच्या चेहऱ्यावरील गंभीर जखमाही बऱ्या झाल्या.

मनगटात रक्त वाहून नेणाऱ्या बारीक नसांना खूप नुकसान झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले. त्यामुळे प्लास्टिक सर्जन आणि तज्ज्ञ डॉक्टरांच्या टीमने महिलेवर केलेली शस्त्रक्रिया सुमारे 8 ते 9 तास चालली होती. महिलेचे दोन्ही हात वाचवण्यात पथकाला यश आले आहे. ही शस्त्रक्रिया यशस्वी करणाऱ्यांमध्ये प्लास्टिक सर्जन डॉ विशाल रामपुरी, भूलतज्ज्ञ डॉ प्रशांत यशवंते, फिजिशियन डॉ गोपाल बटणी यांचा समावेश होता.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

scroll to top
error: आपल्याला माहिती कॉपी करण्याची परवानगी नाही.