आता सरकार घेणार
‘करोनामुक्त गाव’ स्पर्धा
गेल्या काही दिवसात रुग्णसंख्या आटोक्यात आली आहे. मात्र करोनाचा समूळ उच्चाटन झालेलं नाही. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पत्रकार परिषद घेत शिथिलता देण्याची घोषणा केली. मात्र ज्या जिल्ह्यात २० टक्क्यांहून अधिक रुग्णसंख्या आहे, अशा जिल्ह्यात निर्बंध कडक करणयाचे आदेश दिले आहेत. ग्रामीण भागातील करोनामुक्तीच्या कामाला प्रोत्साहन मिळावं यासाठी ‘करोनामुक्त गाव’ स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं आहे. ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी ही घोषणा केली आहे.
गुजरात बोर्डाने जाहीर केलेल्या
बारावीच्या परीक्षा पुन्हा रद्द
केंद्र सरकारने CBSE परीक्षांबाबत निर्णय घेतल्यानंतर लागलीच गुजरात बोर्डाने देखील राज्यातल्या १२वीच्या बोर्डाच्या परीक्षा रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे. विशेष म्हणजे हा निर्णय घेण्याच्या फक्त २४ तास आधी गुजरात बोर्डाने बारावीच्या परीक्षांचं सुधारित वेळापत्रक जाहीर केलं होतं. त्यानुसार १ जुलैपासून बारावी पुनर्परीक्षा आणि बाह्य विद्यार्थ्यांच्या परीक्षा सुरू होणार होत्या. मात्र, केंद्र सरकारच्या निर्णयानंतर गुजरात बोर्डाच्या परीक्षा देखील रद्द करण्यात आल्या आहेत.
१२ आमदारांच्या नियुक्तीबाबत
राज्यपालांकडून दिरंगाई
अनेक मुद्द्यावरून राज्यातील राजकारणात घमासान सुरू आहे. करोना परिस्थिती, मराठा आरक्षण, ओबीसी आरक्षण, लसीकरण आदी मुद्द्यांवरून विरोधक आणि सत्ताधारी यांच्यात सातत्याने कलगीतुरा बघायला मिळत आहे. यातलाच एक राजकारण तापवणारा विषय म्हणजे विधान परिषदेतील राज्यपाल नियुक्त १२ आमदारांचाही आहे. राज्यपालांकडे १२ जणांची नावं पाठवलेली आहेत, मात्र राज्यपाल दिरंगाई करत असल्याचं टीका महाविकास आघाडीकडून केली जात होती. याच मुद्द्यावरून भाजपाने आरटीआय उत्तराचा हवाला देत ठाकरे सरकारवर हल्ला चढवला आहे. राज्यपालांवर टीका करणाऱ्या शिवसेना नेते संजय राऊत यांनाही भाजपाने सवाल केला आहे.
आता शरद पवारांना
भेटले एकनाथ खडसे
राज्याचे विधानसभा विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची भेट घेतल्यानंतर राजकीय वर्तुळात चर्चा रंगली आहे. दरम्यान एकीकडे फडणवीसांच्या भेटीमुळे आश्चर्य व्यक्त होत असतानाच एकनाथ खडसेही शरद पवारांच्या भेटीसाठी त्यांच्या निवासस्थानी पोहोचले आहेत. विशेष म्हणजे देवेंद्र फडणवीसांनी जळगाव दौऱ्यात खडसेंच्या घरी भेट दिली होती. लगेचच खडसे पवारांच्या भेटीसाठी पोहोचल्याने नव्याने चर्चेला सुरुवात झाली आहे.
चीनच्या मदतीने तयार
केली पाकिस्तानने लस
पाकिस्तानने देखील चीनच्या मदतीने करोना लस बनवली आहे. ‘PakVac’ असे या लशीचे नाव ठेवण्यात आले आहे. लस तयार करण्याबाबत पाकिस्तानच्या आरोग्य विभागाने म्हटले आहे की, आम्ही कठीण आव्हानांतून बाहेर येत आहोत. आमच्या मित्रांद्वारे आम्ही अडचणींना संधींमध्ये रूपांतरित करण्याचे कार्य करीत आहोत.
पाकिस्तानचा कर्णधार बाबरचा
चुलत बहिणीशी साखरपुडा
पाकिस्तान क्रिकेट संघाचा कर्णधार बाबर आझमच्या चाहत्यांसाठी खूप चांगली बातमी समोर आली आहे. पाकिस्तानी माध्यमांच्या माहितीनुसार बाबर आझमने साखरपुडा केला आहे. बाबरने आपल्या चुलत बहिणीशी लग्न करण्याचा निर्णय घेतला आहे. पुढच्या वर्षी या दोघांचे लग्न होणार आहे. २६ वर्षीय बाबर तीनही स्वरूपात संघाचे कर्णधारपद सांभाळत आहे.
आता दरवर्षी पहायला मिळणार
भारत पाकिस्तान क्रिकेट सामना
भारत आणि पाकिस्तान यांच्यातील क्रिकेट सामना म्हणजे क्रिकेट चाहत्यांसाठी पर्वणीच असते. हे दोन्ही संघ आयसीसीच्या स्पर्धांमध्ये एकत्र येतात. मात्र, आता प्रत्येक वर्षी क्रिकेटप्रेमींना या पारंपारिक प्रतिस्पर्ध्यांमधील लढाई पाहता येणार आहे. आयसीसीच्या मंगळवारी झालेल्या बैठकीत मोठे निर्णय घेण्यात आले. यात २०२४ ते २०३१ अशा कालावधीतील सर्व स्पर्धा जाहीर करण्यात आल्या. त्यामुळे फ्युचर टूर प्रोग्राम (एफटीपी) अंतर्गत दरवर्षी टी-२० वर्ल्डकप, एकदिवसीय वर्ल्डकप आणि चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये भारत-पाकिस्तान सामने होतील.
MPSC परीक्षेची जाहिरात न काढल्यामुळे
विद्यार्थी पुन्हा आक्रमक होण्याची शक्यता
महाराष्ट्र लोकसेवा आयोगातर्फे घेण्यात येणाऱ्या MPSC परीक्षेची जाहिरात न काढल्यामुळे आता विद्यार्थी पुन्हा आक्रमक होण्याची शक्यता आहे. राज्यातील कोरोना परिस्थितीमुळे गेल्या दीड वर्षापासून MPSC परीक्षेची जाहिरात काढण्यात आलेली नाही. या वेळकाढू धोरणामुळे अनेक विद्यार्थ्यांची वयोमर्यादा संपुष्टात आली आहे. त्यामुळे आता राज्य सरकारने MPSC परीक्षेची जाहिरात काढण्याबरोबरच वयोमर्यादेतही वाढ करावी, अशी मागणी एमपीएससी स्टुडंट राईट्स संघटनेने केली आहे.
बारावीच्या परीक्षेसंदर्भात
पंतप्रधान निर्णय घेणार
संपूर्ण देशातील विद्यार्थी आणि पालकांचे लक्ष लागून राहिलेल्या बारावीच्या परीक्षेसंदर्भात आता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडूनच महत्वपूर्ण निर्णय घेतला जाण्याची शक्यता आहे. आज दिल्लीत बारावीच्या परीक्षेसंदर्भात केंद्रीय शिक्षणमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली बैठक होणार होती. मात्र, केंद्रीय शिक्षणमंत्री रमेश पोखरियाल यांची तब्येत अचानक खालावल्याने त्यांना एम्स रुग्णालयात दाखल करण्यात आले. ही बैठक लांबणीवर पडण्याची शक्यता निर्माण झाली होती.
ईपीएफओच्या 6 कोटी
खात्यामध्ये व्याज जमा करणार
केंद्रीय श्रम मंत्रालयानं देशातील 6 कोटी नोकरदारांसाठी मोठा निर्णय घेतला आहे. ईपीएफओ म्हणजे कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटना 6 कोटी खातेधारकांच्या खात्यामध्ये व्याज जमा करणार आहे. केंद्रीय श्रम मंत्रालयानं या प्रस्तावाला मंजुरी दिलेली आहे. जुलै महिन्याच्या शेवटी नोकरदारांच्या खात्यात व्याज जमा केलं जाणार आहे.
मान्सूनचा पाऊस वेशीवर;
कोकण किनारपट्टीवर ढगांची गर्दी
केरळमध्ये मान्सुन दाखल झाला आहे. त्यामुळे आता महाराष्ट्रात मान्सुन दाखल होण्याची अनेक जण वाट पहायतायत. सध्या अरबी समुद्रात मान्सुन सक्रीय होण्यासाठी अनुकुल वातावरण आहे. त्यामुळे सध्या कोकणात मान्सूनच्या आगमनाचे संकेत मिळतायत. त्यामुळे कोकण किनारपट्टीवर काळ्या ढगांची गर्दी पहायला मिळतेय. तर मतलई वारे सुद्दा सध्या वेगाने वाहतायत. रत्नागिरीच्या किनारपट्टीवर जमलेले काळे ढग हे मान्सूनच्या आगमनाची वर्दी देत आहेत.
SD social media
9850 60 3590