महेंद्र गायकवाड की शिवराज राक्षे? कोण होणार महाराष्ट्र केसरी
पुण्यातील स्व. मामासाहेब मोहोळ क्रीडानगरीत ६५ व्या महाराष्ट्र केसरी कुस्तीची स्पर्धा सुरु आहे. काही वेळातच आता अंतिम सामन्याची लढत होणार आहे. संपूर्ण महाराष्ट्राचे या अंतिम लढतीकडे लक्ष लागले आहे. महाराष्ट्र केसरीची अंतिम लढत पुण्याचा महेंद्र गायकवाड आणि शिवराज राक्षे यांच्यामध्ये होणार आहे. मॅट विभागातून अंतिम लढत शिवराज राक्षे आणि नाशिकच्या हर्षवर्धन सदगीर यांच्यात झाली होती. त्यात शिवराज राक्षेचा विजय झाला. तर माती विभागातील अंतिम लढत सोलापूरचा सिकंदर शेख आणि सोलापूच्या महेंद्र गायकवाड यांच्यात झाली होती, त्यात महेंद्रने सिकंदरला आसमान दाखवले. थोड्याच वेळात आता अंतिम सामन्याचा थरार रंगणार आहे.
मनिष सिसोदियांच्या कार्यालयावर सीबीआयची छापेमारी!
दिल्लीचे उपमुख्यमंत्री मनिष सिसोदिया यांच्या दिल्ली सचिवालयातील कार्यालयावर सीबीआयने धाड टाकली आहे. खुद्द मनिष सिसोदिया यांनी याबाबत ट्विटरद्वारे माहिती दिली आहे. या छापेमारीचे नेमके कारण अद्याप समजू शकलेले नाही.“आज पुन्हा एकदा सीबीआयचे अधिकारी माझ्या कार्यालयात आले आहेत. मी त्यांचे स्वागत करतो. त्यांनी माझ्या घरावर छापेमारी केली. कार्यालयातही छापेमारी केली. माझ्या लॉकरची तपासणी करण्यात आली. माझ्या गावापर्यंत त्यांनी चौकशी केली. मात्र माझ्याविरोधात अद्याप काहीही सापडलेले नाही. भविष्यातही काही आढळणार नाही. कारण मी काहीही चुकीचे केलेले नाही. मी प्रामाणिकपणे दिल्लीतील मुलांना चांगले शिक्षण मिळावे म्हणून काम करत आलो आहे,” असे मनिष सिसोदिया आपल्या ट्वीटमध्ये म्हणाले आहेत.
राहुल गांधींनी देशात आर्थिक संकटाचा दिला इशारा
काँग्रेसची भारत जोडो यात्रा सध्या पंजाबमध्ये आहे. आज(शनिवार) या यात्रेद्वारे राहुल गांधी लुधियानाहून कपूरथलापर्यंतचा प्रवास करणार आहेत. या दरम्यान राहुल गांधींनी एक खुले पत्र लिहून देशात कायमस्वरूपी आर्थिक संकट निर्माण होण्याचा इशारा दिला आहे.
राष्ट्रवादीला मोठा धक्का, शरद पवारांच्या निकटवर्तीय खासदाराचं सदस्यत्व रद्द
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला मोठा पक्षाला मोठा धक्का बसला आहे. राष्ट्रवादी काँग्रसचे लक्षद्वीप येथील खासदार मोहम्मद फैजल यांचं लोकसभेतील सदस्यत्व रद्द करण्यात आलं आहे. मोहम्मद फैजल यांना एका प्रकरणात दहा वर्षांची शिक्षा सुनावण्यात आली आहे. त्यानंतर मोहम्मद फैजल यांना अपात्र करण्यात आलं असल्याची माहिती लोकसभा सचिवालयाकडून शुक्रवारी रात्री देण्यात आली.
आफताब पूनावालाने करवतीने केले श्रद्धाच्या मृतदेहाचे ३५ तुकडे, शवविच्छेदन अहवालात धक्कादायक खुलासा
श्रद्धा वालकर हत्या प्रकरणात आता श्रद्धाचा शवविच्छदेन अहवाल समोर आला आहे. ज्यामध्ये आफताबने श्रद्धाची गळा दाबून हत्या केल्यानंतर करवतीने तिच्या मृतदेहाचे तुकडे केले होते ही धक्कादायक बाब उघड झाली आहे. श्रद्धा वालकरच्या मृतदेहाचे ३५ तुकडे करण्यात आले होते. ते तुकडे आफताब रोज जंगलात फेकत होता. महारौलीचं जंगल आणि गुरूग्राम या ठिकाणी तो हे तुकडे फेकत होता. आफताबला अटक केल्यानंतर जे हाडांचे तुकडे त्या ठिकाणी मिळाले त्या हाडांवरून शवविच्छेदन अहवाल काढण्यात आला.
तिसऱ्या सामन्यापूर्वी टीम इंडियाने श्री पद्मनाभस्वामी मंदिरात जाऊन घेतले दर्शन
भारत आणि श्रीलंका संघांत तीन सामन्यांची वनडे मालिका खेळली जात आहे. या मालिकेतील पहिले दोन सामने जिंकून भारतीय संघाने मालिकेत २-० ने अशी विजयी आघाडी घेतली आहे. मालिकेतील तिसरा आणि अंतिम सामना रविवारी होणार आहे. हा सामना तिरुवनंतपुरममधील ग्रीनफील्ड स्टेडियमवर खेळला जाईल. या सामन्यापूर्वी भारतीय संघ श्री पद्मनाभस्वामींचा आशीर्वाद घेण्यासाठी मंदिरात पोहोचला.
SD Social Media
9850 60 3590